आटपाडी, जतला पावसाचा तडाखा; ओढे हाउसफुल्ल, डाळिंबांना फटका

घनशाम नवाथे
Sunday, 20 September 2020

सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील आटपाडी, जत, खानापूर तालुक्‍यांत काल (ता. 18) सायंकाळी जोरदार पाऊस पडला. आटपाडी परिसरात परतीच्या पावसाने जोरदार झोडपले.

आटपाडी : सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील आटपाडी, जत, खानापूर तालुक्‍यांत काल (ता. 18) सायंकाळी जोरदार पाऊस पडला. आटपाडी परिसरात परतीच्या पावसाने जोरदार झोडपले. आटपाडी मंडलात अतिवृष्टी झाली. 138 मिलिमीटर पाऊस झाला. आतापर्यंत विक्रमी 730 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ओढे-नाले भरून वाहताहेत. डाळिंब झाडे उन्मळून पडली असून, बागांमध्ये पाणी साचले आहे. घरांच्या पडझडीत एक महिला गंभीर जखमी झाली. तळघरात पाणी साचल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसाचा रब्बी हंगामाला फायदा होईल. 

काल एकाच दिवसात आटपाडी मंडलात विक्रमी 138 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दिघंचीत 90 आणि खरसुंडीत 56 मिलिमीटर पाऊस झाला. आटपाडी मंडलात आतापर्यंत विक्रमी 730 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा तालुका अवर्षण प्रवण तालुक्‍यात येतो. तालुक्‍याची पावसाची सरासरी 275 ते 300 मिलिमीटर आहे. यंदा मात्र पावसाने कहर केला. खरसुंडी आणि दिघंची मंडलात 650 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धुमाकूळ घातलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड सुरू झाली. यात शेटफळे येथे अंगावर भिंत कोसळून इंदाबाई शंकर गायकवाड (वय 75) गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारांसाठी तातडीने सांगलीला हलविले आहे. 

धुमाकूळ घातलेल्या पावसाने तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड सुरू झाली. अनेक गावांचे लहान पूल, नाले वाहून गेले आहेत. काल येथील सागर मळ्यात पावसामुळे भिजलेली भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली सापडून दोन सख्ख्या लहान बहिणींचा जागीच मृत्यू झाला. त्याअगोदर ओढापात्रात माय-लेकरांचा बुडून मृत्यू झाला. बाळेवाडी येथेही दोन सख्ख्या जुळ्या भावांचा एकाच वेळी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यंदा पावसामुळे तीन दुर्घटनांत सहा जणांचा बळी गेला आहे. अद्यापही पाऊस थांबून-थांबून पडत असून, घरांची पडझड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 

झरे परिसरात घरांची पडझड 
झरे ः परिसरात काल (ता. 18) दुपारपासून तुफान पावसाने बॅटिंग केली. त्यात माळवदीसह अनेक घरांची पडझड झाली. घरांच्या जुन्या भिंती ढासळल्या. नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. झरे, विभूतवाडी परिसरात जुन्या काळातील अजूनही काही माळवद घरे आहेत. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने भिंतीत पाणी घुसून त्या ढासळल्या आहेत. कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ज्यांची पावसात घरे पडली आहेत, अशा सर्वांचे पंचनामे करणार असल्याचे गावकामगार तलाठी संतोष पवार यांनी सांगितले. सध्या सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडलेले आहेत. पावसात ज्या नागरिकांची घरे पडली आहेत, त्यांना शासनाकडून भरीव मदत मिळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अधिक माने यांनी केली आहे. 

जत तालुक्‍यात जोरदार पाऊस 
जत : दुष्काळी जतसह पूर्व भागात पावसाने जोर धरला आहे. गेल्या सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण व सायंकाळी धो-धो पावसाच्या सरी, हा नित्यनियमाने पावसाचा अनुभव येथील जनतेला आला. जत शहरासह वळसंग, माडग्याळ, संख, उमराणी, बिळूर या भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. या ठिकाणचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला. या पावसामुळे तालुक्‍यात बाजरी, उडीद पिकांची काढणी लांबली असून, रब्बी पिकांची कामे खोळंबली आहेत. मात्र, या पावसाने कोठेही नैसर्गिक आपत्ती घडली नाही. दरम्यान, जत तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, जत पूर्व भागात पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. 

खानापूरला उडीद, मूग, सोयाबीन, भुईमुगाचे नुकसान 
विटा ः शहरासह खानापूर तालुक्‍यात सलग दोन-तीन दिवस होत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांमध्ये पाणी साचून राहिले आहे. तालुक्‍यात आठ दिवसांपासून सकाळी उन्हाचा तडाखा व सायंकाळी विजेच्या कडकडासह दमदार पाऊस होत आहे. काल खानापूर घाटमाथा, लेंगरे परिसरात सुमारे तीन तास पाऊस झाला. त्यामुळे ओढे-नाल्यासह खानापूरचा तलाव, अग्रणी नदी भरून वाहू लागली आहे. शेतात पाणी साचले. खरिपातील कडधान्ये सध्या पाण्यात आहेत. लेंगरेसह मादळमुठी, देविखिंडी, वलखड, वेजेगाव, साळशिंगे परिसराला पावसाने झोडपून काढले. याठिकाणीही कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आळसंद परिसरात मात्र पावसाने हुलकावणी दिली. गार्डी, माहुली, पारे परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. यंदा पावसाने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यामुळे रब्बी हंगामात गहू, हरभरा, शाळू व मका पिकांना या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे. 

आटपाडी तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस 
सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 9.44 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत व कंसात 1 जूनपासून आजअखेर झालेला पाऊस मिलिमिटरमध्ये असा ः मिरज 14.7 (521.4), तासगाव 0.3 (435.8), कवठेमहांकाळ 0.4 (496.5), वाळवा-इस्लामपूर 0.0 (603.8), शिराळा 0.0 (1288.5), कडेगाव 0.5 (532.2), पलूस 0.7 (439.2), खानापूर-विटा 15 (675.2), आटपाडी 94.7 (648.7), जत 11.9 (331.5). 

संपादक : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in Atpadi, jat, khanapur Taluka; hit the pomegranate & other crops