Video : कोल्हापुरात पुन्हा हाय अलर्ट; पंचगंगेच्या पातळीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

आंबेवाडी आणि चिखली परिसरातील पूरग्रस्तांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे परिसरात हाय अलर्ट दिला आहे. दुसऱ्यांदा आलेल्या पुराचे पाणी गावाच्या जवळ आल्याने महापुराची दहशत अनुभवलेल्या येथील ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू झाले आहे. शंभरावर कुटुंबांनी सोनतळी व इतर भागात स्थलांतर केले. आठवड्यापासून जोर धरल्यामुळे प्रयाग चिखली परिसरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे.

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी आज (रविवार) सकाळी आठ वाजता 38.5 फुटांवर पोचल्यामुळे कोल्हापुरात नदीकाठच्या गावांत हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून, पावसाचा जोर असल्याने आणखी पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

आंबेवाडी आणि चिखली परिसरातील पूरग्रस्तांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे परिसरात हाय अलर्ट दिला आहे. दुसऱ्यांदा आलेल्या पुराचे पाणी गावाच्या जवळ आल्याने महापुराची दहशत अनुभवलेल्या येथील ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू झाले आहे. शंभरावर कुटुंबांनी सोनतळी व इतर भागात स्थलांतर केले. आठवड्यापासून जोर धरल्यामुळे प्रयाग चिखली परिसरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततचा दमदार पाऊस आणि धरणातील विसर्ग यामुळे पुराची पातळी झपाट्याने वाढत असून, पुराचे पाणी प्रयाग चिखली परिसरातील गावागावांतील वेशीवर येऊन धडकले आहे.  

राजाराम बंधाऱ्यावरून आज 49, 635 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग असल्यामुळे पुन्हा भीतीचे सावट गडद झाले आहे.  पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे गौरी-गणपती विसर्जनावर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळाला. एनडीआरएफचे ४४ जवान दाखल झाले असून, १४ कोल्हापुरात तर ३० शिरोलीत तळ ठोकून आहेत. इशारा पातळी गाठण्यासाठी अवघा अर्धा इंच फूट कमी आहे. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. धरण क्षेत्रात आणि डोंगराळ भागात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्‍यता आहे. 

गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा तालुक्‍यात धुवाँधार पाऊस झाला. त्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर असल्यामुळे घाटावर आज गौरी-गणपती विसर्जन करण्यावर मर्यादा आल्या. पात्रातील पाणी संजय गायकवाड पुतळ्यापर्यंत आल्यामुळे शहरातील शुक्रवार पेठेतील पूरग्रस्तांचेही डोळे पाण्याकडे लागून राहिले आहेत. 

 

जिल्ह्यातील ६५ बंधारे पाण्याखाली 
पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे ७, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे व शिरगाव हे ५, तुळशी नदीवरील बीड, आरे व बाचणी हे ३, कुंभी नदीवरील कातळी, सांगशी, शेणवडे, कळे, मांडुकली व वेतवडे हे ६, कासारी नदीवरील यवलूज, ठाणे आवळे, पुनाळ-तिरपण, वाळोली, बाजारभोगाव व करंजफेण हे ६, धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे हे २, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, दानोळी, मांगले सावर्डे, कोडोली, चावरे, तांदूळवाडी, शिरगाव व खोची हे ९, कडवी नदीवरील कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे व बाचणी हे ४, दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकूड, बाचणी, सुळंबी, तुरंबे व वाळवा हे ७, वेदगंगा नदीवरील गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेळोली, कुरणी, बस्तवडे व सुरुपली हे ८, हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, गिजवणे, निलजी व खणदाळ हे ४, घटप्रभा नदीवरील तारेवाडी, अडकूर, सावर्डे व हिंडगाव हे ४ बंधारे पाण्याखाली आहेत.

प्रमुख धरणांतून विसर्ग (क्‍युसेकमध्ये)
१)राधानगरी धरण - विसर्ग 8540 क्युसेक
२)तुळसी धरण - विसर्ग - 1956 क्युसेक
३) कुंभी धरण- विसर्ग-1850 क्युसेक्
४) कासारी धरण - विसर्ग-1100 क्युसेक
एकूण पंचगंगा खोरे - 14874  क्युसेक
५) वारणा धरण - विसर्ग - 13150 क्युसेक
६) दुधगंगा - विसर्ग-13200 cusecs
७) कोयना धरण - विसर्ग-70404 क्युसेक्

अलमट्टी विसर्ग १८२००० क्युसेक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall in Kolhapur water level in Panchganga river increased like flood situation