पुन्हा धडकी : चांदोलीत संततधार; धरणातून विसर्गात वाढ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

चांदोली धरण परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासांत 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वारणावती (जि. सांगली) : चांदोली धरण परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासांत 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सकाळी आठ वाजेपर्यंत 569 क्‍युसेक होता. तो दुपारी चार वाजता 800 क्‍युसेक करण्यात आला आहे. यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. 

शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागातील सोनवडे, मणदूर, आरळा, करुंगली, गुढे पाचगणी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. संततधार पावसामुळे धरणाच्या पाण्याची पातळी 603.80 मीटर झाली असून, पाणीसाठा 15.44 टीएमसी झाला आहे. त्याची टक्केवारी 44.89 अशी आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भात शेतीमध्ये पाणी साठून राहिले आहे. या परिसरात वारंवार वीज गायब होत आहे. सध्याचा पाऊस ऊस व भात पिकांना उपयुक्त ठरत आहे. डोंगरही हिरवेगार बनले असून, हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.

मागील काही दिवसांत सूर्याचे दर्शन झालेले नाही. डोंगरमाथा, तसेच गुढे पाचगणीचा पठार धुक्‍याने व्यापून गेला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainging Chandoli; Increase in discharge from the dam