कोल्हापुरात‌‌ पावसाचा कहर; पंचगंगेला अभूतपूर्व महापूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - पावसाचा कहर आजही कायम राहिला. काल (ता. 5) रात्रभर कोसळणारा पाऊस, त्याच वेळी राधानगरी धरणातून बाहेर पडणारे पाणी, पंचगंगेच्या महापुराने कहर केला आहे. दरम्यान जिल्ह्यातील 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राजाराम बंधाऱ्यावर सकाळी सात वाजता 51 फुट तीन इंच इतकी पाणी पातळी होती. 2005 मध्ये 50 फुट पाण्याची पातळी होती. 

कोल्हापूर - पावसाचा कहर आजही कायम राहिला. काल (ता. 5) रात्रभर कोसळणारा पाऊस, त्याच वेळी राधानगरी धरणातून बाहेर पडणारे पाणी, पंचगंगेच्या महापुराने कहर केला आहे. दरम्यान जिल्ह्यातील 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राजाराम बंधाऱ्यावर सकाळी सात वाजता 51 फुट तीन इंच इतकी पाणी पातळी होती. 2005 मध्ये 50 फुट पाण्याची पातळी होती. 

ग्रामीण भागासह शहराच्या विविध भागांतही महापुराचे पाणी मुसंडी घेत घुसले आणि ठिकठिकाणचे प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले. अनेक वसाहतींमध्ये पुराच्या पाण्याने ठिय्या मारला आहे. अग्निशमन दलाने दिवसभरात पुरात अडकलेल्या सुमारे ८०० लोकांना सुरक्षितस्थळी हलविले. या सर्व पार्श्‍वभूमीवर एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती सुरक्षा दल)ची दोन पथके रात्री कोल्हापुरात दाखल झाली.

महापुरातून...

  • कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित
  • शहरातील रामानंदनगर ओढ्यालगतच्या घरांत शिरले पाणी.
  • शहरातील शाहुपुरीतील कुंभार गल्लीत शिरले पुराचे पाणी.
  • शहरातील खाऊ गल्लीत झाङ कोसळले. यात आठ ते दहा टपऱ्यांचे मोठे नुकसान. 
  • आरे (ता करवीर) गावाला पुराने वेढले. तुळशी नदीचे पाणी गावात घुसले. संपूर्ण गावाचे स्थलांतर. 
  • खिद्रापूर येथील पुर परिस्थिती बिकट. लोकांचे स्थलांतर. 
  • २५ जुलै १९८९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीची आठवण म्हणून पंचगंगा हॉस्पिटलजवळ उभारलेल्या स्मृती स्तंभाजवळ मध्यरात्री पाणी आले.
  • तावडे हॉटेल ते जकात नाका या दरम्यान पाणी आल्याने हा मार्ग रात्री एकच्या दरम्यान वाहतुकीस बंद करण्यात आला.

दरम्यान, रात्री साडेअकराच्या दरम्यान पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक महापुराचे पाणी आल्याने सांगली फाट्याजवळ बंद करण्यात आली. त्याच वेळी जिल्हा प्रशासनाने उद्या (ता. ६) व बुधवारी (ता. ७) सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. आता दोन शीघ्र दरवाजे दोन फुटांनी उघडले आहेत. त्यामुळे धरणातून १३ हजार ४०० क्‍युसेक विसर्ग सुरू झाला आहे, त्यामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातही पाणी शिरल्याने २००५ मधील महापुराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अजूनही पाऊस थांबायला तयार नसल्याने लोकांमध्ये पावसाची धडकी भरली आहे. महापुराच्या पाण्याने जिल्ह्याला विळखा घातला आहे. जिल्ह्यातील १०७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ५० गावांतील ४६ हजार घरांतील वीजपुरवठा खंडित 
झाला आहे. 
 सलग दहा दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीने आजही जिल्ह्याचे कंबरडे मोडले. शहरासह शहर परिसरातील मोठ्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. जिल्ह्यातील १३५३ कुटुंबांतील ५८५१ लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. हातकणंगले तालुक्‍यातील सर्वाधिक ५१८ कुटुंबांतील २२८२ व्यक्तींचा त्यात समावेश आहे. पन्हाळा, शाहूवाडी, आजरा तालुक्‍यांतील भूस्खलन सत्र सुरूच राहिले. पुरामुळे बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा चार दिवस बंद ठेवला जाणार आहे. 
भोगावतीसह पंचगंगा नदीचे पाणी कोल्हापूर शहरासह परिसरातील सर्वच गावांमध्ये शिरले आहे. जिल्ह्यातील १२० हून अधिक गावांत पाणी शिरले आहे. पुराच्या पाण्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. जिल्ह्यातील १०७ बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची दोन पथके दाखल झाली आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४९ फूट ११ इंचांपर्यंत आहे. 

स्थलांतरित केलेली कुटुंबे 
करवीर : सुतारमळा, जामदार क्‍लब, शुक्रवार पेठ, डॉ. प्रभू हॉस्पिटल, बापट कॅंप, हळदी, आंबेवाडी, चिखली, गाडेगोंडवाडी, साबळेवाडी आणि शिंदेवाडी येथील ३१३ कुटुंबांतील ११८९ व्यक्तींचा समावेश आहे. 
हातकणंगले ः इंगळी, इचलकरंजी व शेळके मळा, रुई, शिरोली पुलाची, निलेवाडी, चंदूर, भेंडवडे, घुणकी, हालोंडी, खोची आणि भादोले या गावांमधील ५१८ कुटुंबांतील २२८२ लोक.
शिरोळ : नृसिंहवाडी, कुरुंदवाड, कवठेसार, जुने दानवाड, शिरढोण, हेरवाड, अर्जुनवाड, दानोळी, टाकवडे आणि धरणगुत्ती या गावांतील ३६५ कुटुंबांतील १६१३ व्यक्तींना स्थलांतरित केले आहे. 
पन्हाळा : बाजार भोगाव, बादेवाडी, आपटी, काखे, देसाईवाडी, पाटपन्हाळा, देवठाणे, पोर्ले तर्फ बोरगाव, कसबा ठाणे, पुशिरे-बोरगाव आणि कोडोली येथील १४० कुटुंबांतील ६८३ लोक स्थलांतरित. 
चंदगड : कडलगे बुद्रुक, तांबुळवाडी आणि मौजे होसूर गावांतील तीन कुटुंबांतील २६ व्यक्ती. 
शाहूवाडी : थेरगावमधील एका कुटुंबातील दोन व्यक्ती. 
भुदरगड : शेणगाव, गारगोटी, फणसवाडीमधील तीन कुटुंबांतील ९ व्यक्ती स्थलांतरित.
राधानगरी : फेजिवडे, लोंडेवाडी आणि आवळी येथील ५ कुटुंबातील २३ व्यक्तींना स्थलांतरित केले आहे. 

* दृष्टिक्षेपात 
- पावसाचे रौद्ररूप कायम  
- २००५ च्या महापुराच्या आठवणी ताज्या
- पंचगंगेची पातळी ४९.११ फूट, २००५ ला ५० फूट पातळी होती
- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक चिखली, शिरोळमध्ये दाखल
- लोकांत भीतीचे वातावरण, जनजीवन गारठले
- राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट एक फुटाने उघडले
- काळम्मावाडी धरणातूनही ११ हजार १०० क्‍युसेक विसर्ग  
- गगनबावडा तालुक्‍यात २४ तासांत २६२ मिलिमीटर पाऊस
- शहरात अनेक ठिकाणी नागरी वस्तीत घुसले पाणी
- बालिंगा पंपिंग स्टेशन पाण्याखाली, चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
- अनेक घरांत पाणी घुसले, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
- लोकांबरोबरच जनावरांचे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर
- शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद, इतरत्र वाहतुकीची कोंडी
- १२० हून अधिक गावांत पाणी शिरले, जनजीवन कोलमडले
- शाहूवाडीतील सहा गावांचा संपर्क तुटला
- १५ हजारांहून अधिक लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
- स्थलांतरित लोकांना स्वयंसेवी संस्थांकडून चहा, पाण्याची व्यवस्था
- पन्हाळा, शाहूवाडीत रस्त्यांना मोठ्या भेगा, वाहतूक शंभर टक्के बंद
- एसटीचे ३० मार्ग बंद, वाहतूक ठप्प
- कोल्हापूरहून जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द
- भरपावसातही विमानसेवा सुरू, वेळाने उड्डाणे

घडामोडी 
* गांधीनगर पोलिस ठाणे हद्दीतील वळिवडे येथील लोकांना रविवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान स्थलांतरित केले. 
* दोनवडे येथील हृदयविकाराने त्रस्त झालेल्या रुग्णाला सीपीआरमध्ये आणले. 
* आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पहाटे दोनला गवत मंडई येथील लोकवस्तीची आणि जयंती नाला पंपिंग स्टेशनची पाहणी केली. 
* सिद्धार्थनगर समाजमंदिर येथे पहाटे तीनला सात कुटुंबातील ३० लोकांचे स्थलांतर केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains in Kolhapur District