सांगलीत मुसळधार पावसाने शहर, परिसर जलमय

विष्णू मोहिते 
Thursday, 1 October 2020

सांगली : शहर व परिसरात आज दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. प्रमुख रस्ते, शिवाजी मंडईसह सखल परिसर जलमय झाला.

सांगली : शहर व परिसरात आज दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. प्रमुख रस्ते, शिवाजी मंडईसह सखल परिसर जलमय झाला. दलदल, चिखलापासून मोकळा श्‍वास घेणाऱ्या नागरिकांना आज पुन्हा तासभर मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. सकाळापासून कडक उन व दुपारनंतर मुसळधार पाउस असा दुहेरी अनुभव नागरिकांना आला. दरम्यान, जोरदार पावसामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. 
शहरातील सीतारामनगर, शामरावनगर, कोल्हापूर रस्ता परिसरातील नागरिकांना पावसामुळे पुन्हा चिखलवाटा तुडवत घर गाठावे लागले. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शामरावनगर परिसर आधीच जलमय झाला आहे. त्यात आजच्या पावसाने पुन्हा भर पडली. 

आठवडाभरात पावसाने उघडीप दिल्याने समाधान व्यक्‍त होत होते. आज दुपारनंतर आकाशात ढगांची दाटी झाली. सुरवातीला रिमझिम बरसणाऱ्या पावसाने तासभर जोरदार बॅटिंग केली. सकाळपासून ऑक्‍टोबर हिटचा अनुभव घेणाऱ्या नागरिकांना पावसाच्या सरींनी गारवा दिला. पावसाने स्टेशन चौकासह मारुती चौक, वखारभाग, स्टॅंड परिसरात पाणी साचले होते. शिवाजी मंडईतही फूटभर पाणी साठले होते. त्यामुळे सायंकाळी गर्दीने फुलणारा बाजार बंद होता. मारुती चौकात ड्रेनेजचे काम नुकतेच करण्यात आले असले तरी पाणी अजूनही साठून राहत असल्याचे पावसाने स्पष्ट झाले. 

दरम्यान, ग्रामीण भागात सायंकाळी चार वाजल्यानंतर पावसाची रिपरिप सुरु होती. पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, ऊडीद, भुईमूग काढणीत व्यत्यय आला. सोयाबीनची कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू झाला आहे. सोयाबीन पावसात भिजू नये, यासाठी शेतकरी दक्षता घेत होते. कापणी, काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. ती वेळेत होण्यासाठी धडपड सुरु आहे. पावसाने यात व्यत्यय येत असल्याने शेतकरी धास्तावलेत. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Sangli flooded the city and the area