"राष्ट्रवादी'च्या मदतीला ईडी व पाऊस धावला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, तसेच जिल्हा सहकारी बॅंक आदी संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत. त्यासाठी कामाला लागा, असा आदेशही दिला. 

नगर ः विरोधी पक्षनेतेपदही राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळणार नाही, असे निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस भाकीत करायचे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला. सामान्यांना विश्वास देऊन पुन्हा विजय खेचून आणला. त्यातच आमच्या मदतीला ईडी व पाऊस धावून आला. नगरचे "सम्राट' बारा शून्यचा नारा देत होते. त्यांच्या हाती साधनसंपत्ती होती. परंतु त्यांच्याही भ्रमाचा भोपळा फुटला, असा टोला राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी लगावला. 

महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, तसेच जिल्हा सहकारी बॅंक आदी संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत. त्यासाठी कामाला लागा, असा आदेशही दिला. 

हेही वाचा ः एकाच अभियंत्यावर दिवाबत्तीचा भार

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांचा आज सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार नीलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, युवा जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड, निर्मला मालपाणी, श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक, शहराध्यक्ष माणिक विधाते आदी उपस्थित होते. 

हेही वाचा ः दरोडेखोरांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

आमदार वळसे म्हणाले, की राजकारणामध्ये कधी काय घडेल हे काही सांगता येत नाही. राजकारणात घाई करून चालत नाही. सावध व जागे राहावे लागते. विरोधात बसणारे आता सत्तारूढ झाले. लोकांच्या अपेक्षासुद्धा वाढल्या आहेत. आता आपल्याला पुढे जाऊन संघर्ष करावा लागेल. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आली आहे. सर्वांनी लक्ष घातले पाहिजे. महाविकास आघाडीचा झेंडा या निवडणुकीत कसा फडकेल, याची व्यूहरचना आखा. आगामी काळात जिल्हा बॅंका, तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यासाठीही तयारीला लागा, असा आदेशही वळसे यांनी दिला. 
या वेळी अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह नवनिर्वाचित आमदारांची भाषणेही झाली. 

वळसेंना मंत्री करण्याचा झाला ठराव 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आजच्या झालेल्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी दिलीप वळसे पाटील यांना मंत्री करण्याचा ठराव मांडला. त्याला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले. 

आमदार पालकमंत्री 

राष्ट्रवादीचे आमदार ज्या मतदारसंघात निवडून आले नाहीत. तेथे शेजारील विजयी आमदाराला संबंधित तालुक्‍याचे पालकत्व देण्यात येणार आहे. त्या मतदारसंघात संबंधित आमदाराने पक्षकार्य करून संघटन वाढविणे अपेक्षित आहे. तसा निर्णय आमदार वळसे यांनी घेतला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the help of NCP, ED and the rain ran