"स्टॅण्डअप'साठी नवउद्योजकांच्या नशिबी हेलपाटेच

तात्या लांडगे
सोमवार, 9 डिसेंबर 2019

- उद्दिष्टाच्या 25 टक्‍केही कर्जवाटप नाही
- बॅंकांनी दिले मंदी अन्‌ थकबाकीचे कारण
- राज्यातील 17 हजार 650 नवउद्योजकांना अर्थसहायाची प्रतीक्षाच

सोलापूर : स्टॅण्डअप इंडिया योजनेअंतर्गत राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने 2019-20 मध्ये सोलापूरसह राज्यभरातील महिला व एससी-एसटी संवर्गातील 23 हजार 222 नवउद्योजकांच्या अर्थसाहाय्याचे उद्दिष्ट बॅंकांना दिले. मात्र, मंदी अन्‌ मुद्रा योजनेतील वाढत्या थकबाकीचा विचार करून मागील नऊ महिन्यांत बॅंकांनी साडेपाच हजार नवउद्योजकांनाच अर्थसाहाय्य केले. शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाला कृतीची जोड देऊन व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवउद्योजकांच्या नशिबी मात्र हेलपाटेच आल्याचे दिसून येत आहे. 

 

हेही आवर्जुन वाचाच...धक्‍कादायक परीक्षा नियंत्रक डॉ. कोकरे कार्यमुक्‍त 

 

अकोला, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, नांदेड, लातूर, नंदूरबार, उस्मानाबाद, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांतील 16 हजार नवउद्योजकांना अर्थसाहाय्य करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र, या जिल्ह्यांनी प्रत्येकी 50 नवउद्योजकांनाही अर्थसाहाय्य केले नसल्याचे समोर आले आहे. स्टॅण्डअप इंडिया योजनेत नवउद्योजकांना अर्थसाहाय्य करण्यात मुंबई शहर राज्यात अव्वल असून एक हजार 308 नवउद्योजकांना अर्थसाहाय्य मिळाले आहे. त्यानंतर पुणे (842), ठाणे (464), नागपूर (461), कोल्हापूर (261), औरंगाबाद (197), नाशिक (170), नगर (127) आणि रत्नागिरी, सांगली, सिंधुदूर्ग, रायगड या जिल्ह्यांनीही प्रत्येकी 100 हून अधिक नवउद्योजकांना अर्थसाहाय्य केले आहे. स्टॅण्डअप इंडियातून नवउद्योग उभारतील आणि त्यातून रोजगार निर्माण होईल, या अपेक्षेने ही योजना मोदी सरकारने सुरू केली. मात्र, बॅंकांनी हात आखडता घेतल्याने नवउद्योजकांना अर्थसाहाय्यासाठी खासगी सावकारांचा दरवाजा ठोठावावा लागत असल्याचे चित्र आहे. 

हेही आवर्जुन वाचाच...कर्जमाफी राहणार ऑफलाईनच ! 

 

...तर मिळेल वेळेत कर्ज 
राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने स्टॅण्डअप इंडिया योजनेअंतर्गत सोलापूर शहर-जिल्ह्यासाठी 676 नवउद्योजकांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी 128 महिला व 39 एससी व एसटी संवर्गातील नवउद्योजकांना अर्थसाहाय्य केले आहे. जागतिक मंदी, वाढत्या थकबाकीमुळे बॅंकांचे कर्जवाटप कमी झाले आहे. नवउद्योजकांनी घेतलेले कर्ज वेळेत फेडल्यास बॅंका अर्थसाहाय्य निश्‍चित करतील. 
- संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर 

राज्यातील "स्टॅण्डअप'ची स्थिती 
एकूण उद्दिष्ट 
23,222 
नऊ महिन्यांत कर्जवाटप 
5,572 
महिला नवउद्योजकांना अर्थसाहाय्य 
4,819 
एससी-एसटी संवर्गातील लाभार्थी 
1,023  
 

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help the newcomer's luck for "standup"