
स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सोशल डिस्टन्सिंग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत हे काम करावे. हातावर पोट असलेल्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना मदत करावी. कोणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.''
संगमनेर ः कोरोनाच्या दिवसेंदिवस गडद होत असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मदतीसाठी कॉंग्रेस सक्रिय आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात मदतीचे आवाहन केल्यानंतर, आज पक्षाचे मंत्री, नेते, जिल्हाध्यक्ष, आमदार यांच्यासह 500 पदाधिकाऱ्यांशी "ऑडिओ ब्रिज'द्वारे संवाद साधला. गरीब जनता, हातावर पोट असणारे कामगार, विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना मदत करण्याचे आवाहन थोरात यांनी केले. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
थोरात म्हणाले, ""अडचणीच्या काळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची कॉंग्रेसची परंपरा आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी कॉंग्रेस सेवा दलाचे 50 प्रशिक्षित कार्यकर्ते तयार आहेत. युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून 10 हजार बाटल्या रक्त जमा करण्यात येत आहे. तसेच युवक कॉंग्रेसमार्फत प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधे गरजूंपर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सोशल डिस्टन्सिंग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत हे काम करावे. हातावर पोट असलेल्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना मदत करावी. कोणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.''
राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम, आमदार कुणाल पाटील, झिशान सिद्दिकी यांनी अत्यंत चांगले काम केल्याचे सांगत थोरात यांनी त्यांचे कौतुक केले.
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ""या कठीण परिस्थितीत विविध सामाजिक संस्था व जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून समन्वय ठेवावा. बांधकाम मजुरांना महामंडळामार्फत रोख रक्कम तत्काळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.'' माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ""हे शतकातले सर्वांत मोठे संकट आहे. देशातील विमानवाहतूक बंद करेपर्यंत 1 जानेवारीपासून 12 लाखांपेक्षा जास्त प्रवासी परदेशातून आले आहेत. कोरोनाची लक्षणे 15 दिवस दिसत नसल्याने लोक क्वॉरंटाईन करून घेत नाहीत. आपल्या आसपास कोणी परदेशातून आले असल्याची माहिती असल्यास, त्यांना डॉक्टरांकडे नेऊन तपासणी करावी.''
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमध्ये फ्ल्यू ओपीडी सुरू करण्यात आल्या आहेत. सामाजिक संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. पुढचे आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.