esakal | हे आहेत सांगलीचे कोरोना अपडेट्स...
sakal

बोलून बातमी शोधा

Here are the Corona updates from Sangli

सांगली जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. हे आहेत त्याचे अपडेट्स... 

हे आहेत सांगलीचे कोरोना अपडेट्स...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सिंगापूरहून एकजण निरीक्षणाखाली 

जत : कोरोना विषाणूच्या भीतीने मुंबई, पुण्यासह परदेशात कामानिमित्त असलेले नागरिक परतीच्या मार्गाला लागले असून सिंगापूर येथे मर्चंट नेव्ही मध्ये काम करणारा कुंभारी गावचा रहिवासी शनिवारी पहाटे 2.30 वाजता गावी परतला. त्याला सकाळी 11 वाजता जतच्या दक्षता विभागात आरोग्य तपासणीसाठी आणण्यात आले होते. त्यांना कोणताही त्रास नाही. मात्र, दक्षता म्हणून आरोग्य विभागाने त्यांना चौदा दिवस घराबाहेर पडण्यासाठी मनाई केली आहे. 

तर रविवारी (ता. 22) देशभरात जनता कर्फ्यू लागू होणार आहे. त्यादृष्टीने आज शनिवारी दिवसभर जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आले. एस. टी. बस सेवा पूर्वपणे बंद असल्याने एकही प्रवासी बस स्थानकावर दिसत नव्हता. नेहमी गजबजून जाणारा हा परिसर दिवसभर शांत होता. 
कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये, याबाबत जत तालुका प्रशासकीय पातळीवर दक्षता घेतली जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेमार्फत नागरिकांना कोरोनाच्या धरतीवर आवाहन व जनजागृती मोहीम हाती घेतली जात आहे. तसेच परगावाहून येणाऱ्या नातेवाईकांना कोरोना विषाणूच्या भीतीने आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्याचे काम ही स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून केले जात आहे. कुंभारी येथे आलेल्या सिंगापूर येथील व्यक्तीला तत्काळ आरोग्य तपासणीसाठी जत येथे दक्षता विभागात पाठवून, काळजी घेतली जात आहे. यासह तालुक्‍यात मुंबई, पुण्यासह येणाऱ्या नातेवाईकांची माहिती दक्षता विभागाला कळविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

विट्यातील तरुण विलगीकरण कक्षात 

विटा ः दुबईहून परतलेल्या विट्यातील तरुणास सांगलीतील शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्या तरुणाचे स्वॅपचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 

सकाळी सातच्या सुमारास पंचवीस वर्षीय तरुण एसटी स्टॅंड आवारात फिरत होता. स्थानिक नागरिकांनी चौकशी केली असता तो दुबईहून आल्याचे सांगितले. तेथून काही दिवसांपूर्वी कोलकत्ता येथे आला व नंतर केरळमधून 12 मार्चला मुंबई येथे आला व मुंबईहून आज पहाटे कऱ्हाड येथे येऊन कऱ्हाडमधून खासगी मोटार गाडीने सकाळी सातनंतर विटा बसस्थानकात उतरला. त्यानंतर आरोग्य यंत्रणेला माहिती देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाचे "केव्हिड 19'- प्रतिबंधात्मक पथक' एसटी स्टॅंड जवळील पीर दर्गासमोर आले. त्यांनी त्या तरुणास विलगीकरण कक्षात नेले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधक पथकातील डॉ. दीपाली पाटील व आरोग्य सहाय्यक एच. एम. सोळसे, फिरोज नदाफ यांनी त्या तरुणास रुग्णवाहिकेतून नेले. 

जर्मनीहुन परतलेली महिला विलगीकरण कक्षात 

आष्टा : जर्मनीहुन येथे परतलेल्या एका महिलेस विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्वॅपचे नमुने पुण्याला तापसणीसाठी पाठवले आहेत. 

पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधीत आष्टा परिसरात स्वच्छता मोहीम राबवून निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे. शहरात परदेशातून परतलेल्यांची संख्या 6 झाली आहे. यात मलेशियाहुन तिघे, दुबईहुन दोघे, जर्मनीहुन एक असा समावेश आहे. संबंधीत महिला पतीसह जर्मनी येथे नोकरीला होती. 15 दिवसापुर्वी ती मायदेशी परतली. दोन दिवसांपासून सर्दी, खोकला व इतर लक्षणे दिसू लागल्याने येथील खासगी रुग्णालयात दाखल झाली. तेथे डॉक्‍टरांनी प्राथमिक उपचार करुन सांगली येथील हॉस्पीटलकडे हलवले. आई व मुलीचे स्वॅपचे घेतले असून ते पुढील तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहेत. कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. 

नेपाळ सहलीवरून आलेल्या शेतकऱ्यांवर लक्ष 

इटकरे ः येथून नेपाळ सहलीवर गेलेले आठ शेतकरी मागील पंधरा दिवसांपूर्वी गावाकडे परतले आहेत. आशा वर्कर्स व येलूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. या सर्वांची प्रकृती उत्तम आहे. तरीही त्यांनी घरी किंवा शेतातील घरात थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

परदेशातून आलेले झरेतील नागरिक सुरक्षित 

झरे : कतारहून आलेले झरे (ता. आटपाडी) येथील एका नागरिकाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली. मात्र ते वैद्यकीय तपासणीनंतर ते सुरक्षित असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. 
झरे येथील ही व्यक्‍ती कतार येथे नोकरीला आहेत. ते झरेत परत आल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होऊ लागली. आज आरोग्य विभागाच्या परगावाहून त्यांची तपासणी केली व ते कोरोनापासून सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांना चौदा दिवस त्यांना बाहेर पडण्यास सक्त मनाई केली असून, त्यांच्या हातावर आरोग्य विभागाने "होम क्‍वारंटाईन'चा शिक्का मारला. त्यांना काही सुरक्षिततेबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता कतारमध्ये भीतीचे वातावरण असल्याने व तेथील काही भागांमध्ये कोरोना आल्याने आणि विमानसेवा बंद होणार आहे असे सांगण्यात आल्याने मी तातडीने गावाला आलो. माझी पत्नी पुणे येथे आहे. आम्ही आमचं कुटुंब सर्व सुरक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.