
श्रीगोंदा ः संत शेख महंमद महाराज हे हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक आहेत. एकट्या श्रीगोंदे तालुक्यातील नव्हे, तर राज्यासह परदेशांतील भाविकही त्यांच्या दर्शनासाठी आतुरलेले असतात. दोन्ही धर्मांना जोडणारा हा दुवा आहे.
परदेशांतील अनेक अभ्यासकांनी संत शेख महंमद महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून, कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना कुणी महाराज म्हणते, तर कुणी बाबा संबोधते. त्यांच्या स्थानाला कुणी मंदिर म्हणते, कुणी मठ, कुणी दर्गा; मात्र सगळे जेव्हा एकत्र येतात, त्या वेळी ते केवळ भाविक असतात.
वारकरी संप्रदायातील या मुस्लिम संतकवीने अनेकांना आपल्या प्रतिभेने भुरळ पाडली. त्यांचे येथील मंदिर व दर्गा एकत्र आहे. हिंदू व मुस्लिम समाज एकत्र येऊन यात्रोत्सवासह इतर पारंपरिक उत्सव साजरे करीत असतात. संत शेख महंमद महाराज यात्रोत्सव प्रतिष्ठान व शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट, असे दोन भाग या देवस्थानामध्ये आहेत. आज बाबांची पुण्यतिथी आहे. त्यासाठी ठिकठिकाणचे भाविक आले आहेत.
सोळावे आणि सतरावे शतक
संत शेख महंमद महाराजांचा कार्यकाळ सोळाव्या आणि सतराव्या शतकातील मानला जातो. त्यांना भागवत धर्मात अतिशय मानाचे स्थान आहे. तत्कालीन ऐतिहासिक स्थितीचा विचार केला, तर त्यांच्या ऐक्याच्या कार्याची महती पटते. हिंदू-मुस्लिम समाजांमध्ये टोकाचे मतभेद होते. मात्र, आपल्या समतेच्या विचारांनी बाबांनी दोन्ही समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. भागवत धर्माची व सूफी संतपरंपरा त्यांनी आपल्या विचारांतून आणि कार्यातून पुढे नेली.
छत्रपतींचीही होती बाबांवर श्रद्धा
देहूप्रमाणेच त्या काळी श्रीगोंदेनगरी अध्यात्माचे केंद्र बनली होती. छत्रपती घराण्याची बाबांवर मोठी श्रद्धा होती. मात्र, बाबांच्या समतेच्या कार्याने औरंगजेबही प्रभावित झाला होता. तो मराठ्यांच्या पाडावासाठी दक्षिणेत आला, तेव्हा त्याने वाहिरा येथे भेट देऊन बाबांच्या कार्याची माहिती घेतली. शेख महंमद महाराजांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन औरंगजेबाने तब्बल चारशे एकर जमीन बाबांसाठी दिल्याचा उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजांत सापडतो. सोळाव्या शतकात अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन केले. त्यांनी हिंदीसह मराठीतही अभंगरचना केली आहे.
सर्वसामान्य लोकांसह राज्यकर्तेही त्यांचे भक्त होते. संतमंडळींचा चमत्कारावर विश्वास नव्हता; परंतु त्यांनी काही चमत्कार केल्याच्याही आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहेत. मात्र, बाबांचा भर अंधश्रद्धा निर्मूलनावर होता. त्यांची अभंगरचनाच याचा दाखला आहे.
ऐसे केले या गोपाळे। नाही सोवळे ओवळे।।
काटे केतकीच्या झाडा। आत जन्मला केवडा।।
यातून त्यांची प्रतिभा तर दिसतेच; परंतु बहुजन समाजाविषयीची तळमळही दिसते. सद्गुरू आणि पिराचे ऐक्य सांगताना ते म्हणतात,
सद्गुरू साचे पिरू। दो भाषांचा फेरू।।
नाही बिन्ना तारू। ज्ञान विवेकी।।
ंहिंदू आणि मुस्लिम धर्माचा त्यांनी चिकित्सक अभ्यास केला होता. सर्व धर्म, पंथ एक आहेत. त्यामुळे द्वैतभाव कोणातही नाही, असा समतेचा झेंडा मिरवताना ते अभंगात म्हणतात,
जैसे एका झाडा। पत्रे फांद्या निवडा।।
तैसा भाषा पवडा। गुरू पिरांचा।।
श्रीगोंद्यातील नेते निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ शेख महंमद महाराजांच्या दर्शनाने करतात आणि विजयाची मिरवणूकही येथूनच निघते. मात्र, त्यांचे मंदिर व समाधिस्थळाचा जीर्णोद्धार करण्यात तालुक्यातील सर्वपक्षीय राजकारणी कमी पडल्याचे दिसते.
संत कबिराचा अवतार
सोळाव्या- सतराव्या शतकातील संतांच्या मांदियाळीत श्रीगोंद्याच्या संत शेख महंमद महाराजांचे स्थान उच्च आहे. अगदी शेख महंमद महाराज यांचा उल्लेख रामभक्त कबीराचा अवतार असा केल्याने, अध्यात्मातील त्यांचे स्थान किती वरचे होते, याचा प्रत्यय येतो. शेख महंमद महाराजांचा जन्म व समाधी काळाविषयी अभ्यासकांमध्ये एकमत दिसत नाही, तरी उपलब्ध साधनांच्या आधारे त्यांचा जन्म साधारण 1575मध्ये धारूरच्या किल्ल्यावर झाल्याचे मानले जाते. त्यांचे वडील राजमहंमद यांचे मूळ गाव वाहिरा (ता. आष्टी, जि. बीड) असल्याचे सांगितले जाते.
सोळाव्या शतकात संत शेख महंमद महाराजांनी केलेल्या सांप्रदायिक कार्याचा गौरव आजही होत आहे. शेख महंमद महाराजांच्या अभंगांमध्ये अफझलखानाच्या स्वारीचा वेढा आणि पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती लपविल्याचा उल्लेख येत असल्याने, महाराज इ. स. 1659पर्यंत हयात होते, असे अभ्यासकांना वाटते.
मालोजीराजे आणि चकनामा
मालोजीराजे भोसले यांनी केलेल्या चकनाम्याची घटना इ.स. 1595च्या सुमाराची आहे. दौलताबादहून श्रीगोंद्याला येण्यापूर्वी शेख महंमद महाराजांची कीर्ती या परिसरात होती. शेख महंमद महाराज यांचे वडील दौलताबादच्या किल्ल्यावर हवालदार म्हणून बादशहाच्या चाकरीत होते. तेथेच शेख महंमद महाराजांना गुरुपदेश चांदबोधले ऊर्फ चंद्रभट ऊर्फ कादरी चॉंदसाहेब यांच्याकडून मिळाला.
संत शेख महंमद महाराजांचे श्रीगोंद्यात आगमन
नगरच्या निजामशाहीत मालोजीराजे कर्तबगार सरदार होते. आद्यकवी परमानंद यांच्या शिवभारत ग्रंथानुसार पांडे पेडगाव हा मालोजीराजेंकडे मकासा म्हणून होता. चांदबीबीच्या काळात मालोजीराजे यांनी शेख महंमद यांना गुरू मानले आणि श्रीगोंद्यात आणले. त्यांना येथे मठ बांधून दिला. मठासाठी जमीन इनाम दिली. महाराजांनी श्रीगोंद्यात मकरंदपुरा पेठही वसवली. इ. स. 1595 मध्ये मालोजीराजे गुरूंच्या सान्निध्यात एक वर्ष मुक्कामी होते, असे अभ्यासक सांगतात.
संजीवन समाधी
श्रीगोंदे शहरात मध्यभागी शेख महंमद महाराजांचे समाधिस्थळ आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे येथेही शेख महंमद महाराज यांची संजीवन समाधी आहे. याच समाधिस्थळाला श्रीगोंदेवासी ग्रामदैवताचा मान देतात. दर वर्षी होणाऱ्या यात्रोत्सवात हिंदू व मुस्लिम बांधव एकत्र येत सण साजरा करतात.
याच दरम्यान ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सात दिवस पारायण होते. या वेळी राज्यातील प्रख्यात कीर्तनकार येतात. महाराजांच्या समाधिस्थळी होणाऱ्या चंदनलेप कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम एकत्र असतात. त्याचा मान मोटे पाटील कुटुंबाला असतो. महाराजांचे वंशज शेख कुटुंब या यात्रोत्सवात सहभागी होते. शहरातील मुस्लिम महिला कुराणपठण करतात. कव्वालीचा कार्यक्रम महत्त्वाचा असतो.
सुरूवात बाबांच्या दर्शनाने
शेख महंमदबाबांनी लिहिलेल्या योगसंग्राम ग्रंथाचे पारायण होते. श्रीगोंद्यातील कोणत्याही शुभकार्याची सुरवात बाबांच्या समाधीच्या दर्शनाने केली जाते. यात राजकारणी मंडळी आघाडीवर आहेत. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊनच सभा सुरू होतात. जो उमेदवार विजयी होईल, त्याचा सत्कार बाबांच्या मंदिरात होतो.
ही मंडळी इतर वेळी मात्र दुर्लक्ष करतात, असे धाडसाने म्हणावेसे वाटते. कारण, बाबा ज्या ठिकाणी बसून उपदेश देत होते, ती वास्तू आता मोडकळीस आली आहे. छत पडण्याच्या अवस्थेत आहे. मंदिरातील काही भिंतींचा भाग कोसळला आहे. हे बांधकाम मातीत असल्याने जास्त दिवस तग धरणार नाही. मंदिराचे प्रवेशद्वार व परिसरात सुशोभीकरण झालेले नाही.
देहूतील मंडपाची आग विझविली श्रीगोंद्यातून
देहू येथे संत तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरू होते, त्या वेळी मंडपास अचानक आग लागली. इकडे श्रीगोंद्यातही शेख महंमदबाबा यांचे प्रवचन सुरू होते. मात्र, अंतर्ज्ञानी बाबांना देहूतील ती आग दिसली. त्यांनी श्रीगोंद्यातूनच ती विझविली. त्या प्रयत्नात बाबांच्या हाताला जखम झाली, अशी आख्यायिका आहे.
बाबा-तुकाराम महाराज भेट
संत शेख महंमद महाराज पंढरपूरची वारी करीत असल्याचा दाखला आहे. शिवाय, संत तुकाराम महाराज हे शेख महंमद महाराजांना भेटण्यासाठी शहरातील गणपती मळा (मांडवगण रस्ता) येथे आल्याचेही दाखले मिळतात. तेथे त्यांनी संत शेख महंमदबाबा यांच्यासह राऊळबुवा, गोदडबुवा व प्रल्हाद महाराज यांच्याशी आध्यात्मिक चर्चा केली, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
शेख महंमदबाबांचे ग्रंथ
योगसंग्राम, पवनविजय व निष्कलंक प्रबोध हे ग्रंथ ही महाराजांची रचना आहे. बाबांच्या जन्मोत्सवात योगसंग्राम ग्रंथाचे पारायण होते.
श्रीगोंद्यातील शेख महंमद महाराज मंदिर
नगर-दौंड महामार्गापासून पूर्वेला बारा किलोमीटर, सिद्धटेकपासून साधारण 35 किलोमीटर व नगरपासून सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीगोंदे शहरात संत शेख महंमदबाबा ऊर्फ महाराज यांचे मंदिर आहे. पूर्व व उत्तरमुखी असलेल्या मंदिरात बाबांची समाधी दक्षिणमुखी आहे. आत हिंदू व मुस्लिम समाजाच्या एकात्मतेचा संदेश देणारे दृश्य आहे. बाबांनी पत्नीसह संजीवन समाधी घेतली. बाबांचे गुरू चांदबोधले महाराज यांची प्रतीकात्मक समाधी तेथेच आहे. समाधी मंदिराबाहेरील बाबांच्या नारायण नावाच्या घोड्याचीही समाधी आहे. बाबांच्या समाधिस्थळाच्या प्रवेशद्वारात मोदोकाकांची समाधी आहे.
बाबांच्या मठातील अन्य उत्सव
दर गुरुवारी व एकादशीला रात्री भजन, तसेच मुस्लिम भगिनी मठात कुराणपठण करतात.
मोहरमच्या सणाला ताबूत तयार करण्याचे काम मुस्लिम बांधव करतात.
एकाच ठिकाणी हिंदूंचे मंदिर आणि मुस्लिमांचे कुराणपठण होणाऱ्या या स्थळाला आध्यात्मिक वारसा आहे. मात्र, मंदिरासह परिसराचा विकास झालेला नाही.
राजकीय इच्छाशक्ती हवी
तालुक्याचे ग्रामदैवत मानले जाणाऱ्या संत शेख महंमदबाबांच्या समाधिस्थळाच्या परिसराला सरकारी मदत मिळवून देण्यासाठी काही निर्णय होणे आवश्यक आहे. येथे येणारा राजकीय नेता, येऊन गेलेला प्रशासकीय अधिकारी नतमस्तक होतो. मात्र, किरकोळ अडचणींवर मात करीत या स्थळाचे महत्त्व अधोरेखित केले, तर महाराष्ट्रासह देशातील भाविकांचा, तसेच अभ्यासकांचा ओघ श्रीगोंदेनगरीकडे वळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.