मालगावमध्ये पाया खणताना सापडल्या ऐतिहासिक जैन मूर्ती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

मालगाव येथे जैन मंदिराचा पाया खणताना ऐतिहासिक जैन मूर्ती सापडल्या आहेत. संगमरवर आणि पितळेच्या या मूर्ती भगवान पार्श्वनाथ, चंद्रप्रभू, क्षेत्रपाल आणि पद्मावती यांच्या आहेत.

मिरज : मालगाव येथे जैन मंदिराचा पाया खणताना ऐतिहासिक जैन मूर्ती सापडल्या आहेत. संगमरवर आणि पितळेच्या या मूर्ती भगवान पार्श्वनाथ, चंद्रप्रभू, क्षेत्रपाल आणि पद्मावती यांच्या आहेत.

यापैकी सात मूर्तींवर शिलालेख असून, त्यावरून संवत 1548 मधील या मूर्ती असल्याचे मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. या मूर्ती सापडल्याने जिल्ह्याच्या जैन धर्मीयांचा इतिहासात मोलाची भर पडली आहे. 

मालगाव येथे असलेले जुने जैन मंदिर पाडून तेथे नवीन मंदिर बांधण्यात येत आहे. शनिवारी पाया खणण्याचे काम सुरू होते. पाया खणत असताना जमिनीत काही मूर्ती आढळल्या. त्याठिकाणी आणखी खोल खणल्यावर संगमरवर, पितळ यामधील विविध मूर्ती आढळून आल्या.

या मूर्तींचा अभ्यास मिरज येथील इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांनी केला. यापैकी सहा मूर्ती संगमरवरामध्ये, एक मूर्ती काळ्या पाषाणात आहे. भगवान चंद्रप्रभू आणि भगवान पार्श्वनाथांच्या या मूर्ती आहेत. याच ठिकाणी पितळेच्या पार्श्वनाथ, क्षेत्रपाल आणि पद्मावती यांच्या मूर्तीही सापडल्या आहेत. या मूर्तींवर शिलालेख आहेत. मानसिंगराव कुमठेकर यांनी या लेखांचे वाचन केले. काही भक्तांनी संवत 1548 मध्ये म्हणजे सुमारे 1490 इसवी मध्ये या मूर्ती दान दिल्याचे या लेखात म्हटले आहे. या मूर्ती सापडल्याने मालगावच्या इतिहासात मोठी भर पडणार आहे. 

या मूर्ती जैन धर्मीयांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असून, मिरज इतिहास संशोधन मंडळाच्यावतीने याचा आणखी अभ्यास करणार असल्याचे मानसिंगराव कुमठेकर यांनी सांगितले. यातून मालगांवमधील जैन धर्मीयांचा इतिहास नव्याने उलगडणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Historic Jain idols were found while excavation a foundation in Malgaon

टॅग्स