esakal | Shivjayanti 2020 VIDEO : हा गड का रडतो छत्रपती शंभूराजेंसाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

Dharmaveer gadh in shrigonda

गडाच्या बाजूला असणाऱ्या सरस्वती नदीलगत पाच लाख सैन्याचा तळ उभारण्यात आला. आजही त्या जागेला छावणी असे संबोधले जाते. संभाजीराजेंना पकडल्यानंतर मोगलांचा आनंद गगनात मावत नव्हता. बहादूरगडावर औरंगजेबाच्या स्वागतासाठी नवी कमान उभारण्यात आली होती. आजही ती तशीच आहे.

Shivjayanti 2020 VIDEO : हा गड का रडतो छत्रपती शंभूराजेंसाठी...

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रबखानने घातपाताने संगमेश्वरमध्ये पकडले. 3 फेब्रुवारी 1689 हा तो महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस होता. शंभूराजेंना पकडल्यानंतरही औरंगजेब धास्तावलेलाच होता. त्याने शंभूराजेंना अकलूजला न ठेवता श्रीगोंदे तालुक्‍यातील पेडगाव येथील बहादूरगडला (आजचा धर्मवीरगड) आणले.

15 फेब्रुवारी रोजी राजेंना पेडगावच्या किल्ल्यात औरंगजेबापुढे उभे केल्याची नोंद इतिहासात आहे. त्याच दरम्यान संभाजी राजेंची करडी नजर, तो ताठ बाणा साखळदंडांत जखडले तरी कमी झालेला नव्हता. औरंगजेबाचे तेच दुखणं होतं. 

गड खजिल आहे

मोगलांच्या ताब्यातून शंभूराजेंना सोडविण्यासाठी मराठे आपापल्या परीने प्रयत्न करीत होते. मात्र, बहादूरगडावर राजेंना नमविण्यासाठी औरंगजेबाने अनन्वित अत्याचार सुरू केले. त्या वेदना आजही हा धर्मवीरगड सोसत आहे. त्या दुःखदायी घटनेचा साक्षीदार असणारा हा गड आजही खजील होऊन शंभूराजांसाठी अश्रू ढाळत असल्याचा भास होतो. स्वराज्य रक्षक संभाजी राजे यांच्या जीवनावर एका वाहिनीवर सध्या मालिका सुरू आहे. त्यात अकलूज आणि श्रीगोंद्यातील पेडगावच्या बहादूरगडाचा उल्लेख आला आहे. आज किंवा उद्या तो एपिसोड दाखविला जाईल. 

औरंगजेब मराठ्यांना घाबरला
अकलूजच्या तळावर औरंगजेबाला सुरक्षित नव्हते. त्याला मराठ्यांची मोठी दहशत वाटत असल्यामुळे मोगल घाबरले. त्या वेळी श्रीगोंद्यातील बहादूरगड मोगलांच्या ताब्यात होता. त्यामुळे अकलूजला असणारे मोगलांचे पाच लाखांचे सैन्य जेरबंद संभाजीमहाराजांना घेऊन बहादूरगडाच्या दिशेने निघाले. पकडल्यानंतर बारा दिवसांनी म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी पेडगावच्या बहादूरगडावर संभाजीराजेंना औरंगजेबासमोर उभे करण्यात आले. 

शंभूराजेंना पकडल्याचा मोगलांना आनंद

गडाच्या बाजूला असणाऱ्या सरस्वती नदीलगत पाच लाख सैन्याचा तळ उभारण्यात आला. आजही त्या जागेला छावणी असे संबोधले जाते. संभाजीराजेंना पकडल्यानंतर मोगलांचा आनंद गगनात मावत नव्हता. बहादूरगडावर औरंगजेबाच्या स्वागतासाठी नवी कमान उभारण्यात आली होती. आजही ती तशीच आहे.

जीभ हासडली तरी राजे डगमगले नाहीत 

साखळदंडांनी जखडलेल्या राजेंना औरंगजेबासमोर उभे केले. त्या वेळी त्या खुर्चीवरून क्रूर औरंगजेब गालिचावर खाली बसला आणि राजेंच्या नजरेला नजर देऊ लागला. त्याही अवस्थेत राजेंची ती करडी नजर त्याला भीती दाखवून गेली. त्याने राजेंना काही प्रश्‍न विचारले. मात्र, त्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे मिळत नव्हती. त्यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने राजेंची जीभ कलम करण्याचा आदेश दिला. तो थरार पाहून मोगल सैनिकही शहारले. 

मराठी बाण्यापुढे औरंगजेब घाबरला

जीभ कलम झाली, तरीही शंभूराजेंची करडी नजर औरंगजेबाला भीती दाखवीत होती. तो त्यांच्या नजरेला नजर देईना. त्याने राजेंचे डोळे काढण्याची शिक्षा दिल्यानंतरही राजे डगमगले नाहीत. त्याही अवस्थेत मराठ्यांचा हा पराक्रमी राजा ताठ मानेने उभाच होता. त्यामुळे घामाघूम झालेल्या औरंगजेबाने राजेंना विदुषकाची टोपी घालून उंटावर उलटे बसवले. मराठ्यांवर दहशत बसविण्यासाठी धिंड काढली. पेडगावचा किल्ला सोडून भीमा नदीकाठच्या गावातून राजेंचे एकेक अवयव काढत तुळापूर येथे राजेंना नेण्यात आले. हे अंतर 95 किलोमीटर आहे.

बलिदानाची आठवण

पेडगावच्या धर्मवीरगडावर राजेंना साखळदंडांत जखडून ठेवलं होतं. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची कबुली हा किल्ला आजही देत असल्याचे आपल्याला दिसेल. राजेंना ज्या ठिकाणी उभे करण्यात आले, त्या जागी असणारा स्तंभ शिवभक्तांचे, पर्यटकांचे रक्त आजही गरम करतो. अघोरी अत्याचार केल्यानंतरही संभाजी हे राजासारखेच वागले. त्यांच्या बलिदानाची आठवण राहावी, म्हणून इतिहासप्रेमींनी वेगळ्या प्रकारे स्मृती जागृत ठेवल्या आहेत. बहादूरगड ते वढू बुद्रुक अशी यात्रा काढली जाते. त्यात हजारो शिवप्रेमी युवक सहभागी होतात. या गडावर रात्रभर शिव व शंभूविचाराचा जागर केला जातो. शिवदुर्ग संवर्धन समिती वृक्षारोपणासारखे उपक्रम राबविते.

loading image