(व्हिडीओ) : करमाळ्याचा हॉकीपटू करतोय श्रीगोंद्यात रोजंदारी

hockey player from Karmala works at Shrigonde marathi news
hockey player from Karmala works at Shrigonde marathi news

श्रीगोंदे : तो वर्गात असला, की हुशार विद्यार्थी असतो नि मैदानात उतरला, की उत्तम खेळाडू. महाविद्यालयासाठी त्याने अनेकदा हॉकीचे सामने एकहाती जिंकून दिलेत. राज्यस्तरावरही त्याने नैपुण्य दाखवलेय. शिक्षणाबरोबरच खेळावरही त्याचे अतोनात प्रेम आहे. कारण, हॉकी खेळानेच त्याची शिक्षणाची वाट सुकर केली. हे क्रीडाप्रेम जपण्यासाठी तो अक्षरक्ष: रोजंदारी करतो. कुठल्याही चित्रपटाच्या पटकथेत चपखल बसावा असा हा "सीन'. परंतु हे दृश्‍य आहे, मढेवडगावातील बांधावर राबणाऱ्या तरुणाचे, खेळाडूचे नि त्याच्या स्वप्नाचे! 

सचिन महादेव जाधव, नावाचा तरुण या कथेचा नायक आहे. वडील अपंग. आई शेतमजुरी करून कसातरी प्रपंच चालविते. सचिन हा मूळचा करमाळा तालुक्‍यातील. सध्या तो मढेवडगाव ते श्रीगोंदे रस्त्याच्या दुतर्फा मढेवडगाव ग्रामपंचायतीने लावलेल्या झाडांच्या देखभालीचे काम करतोय. गोरागोमटा, देखणा व रुबाबदार तरुणास असे अंगमेहनतीचे काम करताना पाहून रस्त्याने जाणारे प्रवासी थबकतात. आस्थेने त्याची विचारपूस करतात. घाम गाळायला कसली आली लाज, असे म्हणत सचिन स्वत:ला कामात झोकून देतो.

आईच्या खांद्यावरच सगळी धूरा

वडील अपंग असल्याने आईनेच कुटुंबाची धुरा खांद्यावर घेतलीय. रोजंदारी करून तिने सचिनला शिकविण्याची जिद्द बांधली. मात्र, शिक्षणासाठी पुरेसा पैसा नसल्याने अखेर हे कुटुंब बागायती भागात, म्हणजे श्रीगोंद्यात स्थलांतरित झाले. बारावीनंतर सचिनला बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानात प्रवेश घेण्याचे जाणकारांनी सुचविले. मात्र, तेथील प्रवेशशुल्काचा प्रश्‍न उभा राहिला. सचिनमधील गुणवत्ता संस्थाचालक व शिक्षकांनी हेरली. "तू शीक; प्रवेशशुल्काचे काय करायचे, ते आम्ही पाहू,' असे प्रोत्साहन सचिनच्या पाठीवर थाप टाकून प्राचार्यांनी दिले. 

हॉकी स्पर्धांमध्ये चमक

प्राचार्यांच्या आधारामुळे त्याला बारा हत्तींचे बळ मिळाले. तेथे शिकताना त्याने हॉकीचे धडे गिरविले. हॉकी स्पर्धेत चमक दाखविण्यास सुरवात केली. राज्यस्तरीय स्पर्धेत तो महाविद्यालयाकडून खेळला. संघ हरला; मात्र सचिनचा खेळ बहारदार होता. या खेळीने त्याचे प्रवेशशुल्क माफ झाले. सध्या सचिन मढेवडगाव येथे झाडांची निगा राखण्याचे काम करतो. सकाळच्या सत्रात हे काम केल्यावर दिवसभर तो रोजंदारीने कामाला जातो. 

भाऊ, वडिलांचा खर्च भागवितात

मढेवडगावात काम करून हे मायलेक करमाळा तालुक्‍यात गावी राहणाऱ्या भावाच्या शिक्षणाचा व वडिलांच्या उपचाराचा खर्च भागवितात. "काम करण्याची माझी तयारी आहे. कष्टातूनच मोठे होता येते, यावर माझा विश्वास आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानाने केलेल्या सहकार्यामुळे मला भविष्य असल्याची जाणीव झाली,' असे तो सांगतो. 
 

सचिनची कष्टाची तयारी 

करमाळा येथून आलेल्या सचिनची माहिती घेतली आणि त्याला काम दिले. त्याची कष्टाची तयारी आहे. इतर तरुणांनीही त्याच्याकडून आदर्श घ्यावा. 
- महानंदा मांडे, सरपंच, मढेवडगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com