पंचायत समिती सदस्यांच्या मानधनासाठी चंद्रकांत पाटील करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पंचायत समिती सदस्यांच्या मानधनासाठी चंद्रकांत पाटील करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा
कोल्हापूर - पंचायत समिती सदस्यांना मानधन सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, याबाबत उद्याच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. सर्वसामान्य हिताच्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पंचायत समिती सदस्यांनी नीट पोहचवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.  

कागल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ हे होते. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, खासदार संजय मंडलिक, शिक्षण अर्थ समितीचे सभापती अंबरिषसिंह घाटगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, माजी आमदार संजय घाटगे आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला पंचायत समितीचे उपसभापती विजय भोसले यांनी सर्वांचे स्वागत तर सभापती राजश्री माने यांनी प्रास्ताविक करून विविध मागण्या केल्या. 

सर्वसामान्य माणसापर्यंत राज्याच्या, जिल्ह्याच्या विविध योजना पोहचविण्यासाठी पंचायत राजला यशवंतराव चव्हाण यांनी चालना दिली. गावासाठी लागणाऱ्या विविध गोष्टींची निर्मिती, विकास गावची माणसं करतील. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचा विचार केला. ज्याप्रमाणे सभापती, उपसभापती यांना मानधन आहे त्याप्रमाणे पंचायत समिती सदस्यांना मानधन मिळायला हवं. त्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. सरपंचांच मानधन 5 हजार रूपये केले आहे. कोतवाल, पोलीस पाटील यांचेही मानधन वाढवलं आहे. तसेच मानधन पंचायत समिती सदस्यांनाही मिळावे यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर त्यांना विकास निधी देण्याबाबतही विचार करू, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. 

नाविन्यपूर्ण योजनेतून नुतन इमारतीवर सौरउर्जा बसविण्यात येईल असे सांगून मंत्री पुढे म्हणाले, जुन्या इमारतीच्याबाबत काय करता येईल याबाबत विचार करून आराखडा सांगावा. त्यासाठीही प्रयत्न करू. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार मिळणार आहेत. पतीच्या निधनानंतर पत्नीलाही हे मानधन मिळणार आहे. आयुष्यमान कार्ड असल्यास 5 लाखापर्यंतची आरोग्य सेवा मोफत मिळणार आहे. शासनाच्या अशा विविध सर्वसामान्यांच्या फायद्याच्या योजना पंचायत समिती सदस्यांनी नीट लोकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, पंचायत समितीला अधिकार देण्यासाठी घटनेत दुरूस्ती करावी लागेल. त्यासाठी प्रयत्न करावा. कागल तालुक्‍यातील आपत्तीग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याची आवश्‍यकता आहे. काही ठिकाणी पक्की घर बांधून देण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी हात सैल सोडून सहकार्य करावे. पंचायत समितीची नुतन वास्तू तालुक्‍याच्या वैभवात भर घालणारी आणि सर्वसामान्य लोकांना आधार देणारी आहे. 

जिल्हा परिषदस सदस्य मनोज फराकटे, युवराज पाटील, शिल्पा खोत, शिवानी भोसले, पंचायत समिती सदस्य अंजना सुतार, विश्वास कुराडे, जयदिप पोवार, मुरगूड नगराध्यक्ष राजेखानजमादार उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com