हॉटस्पॉट मणदूरला पाच गावांचा हिरवा हात!; अशी केली मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

मणदूर (ता. शिराळा, जि . सांगली) येथे कोरोनाची संख्या वाढून हॉटस्पॉट बनल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.

शिराळा : मणदूर (ता. शिराळा, जि . सांगली) येथे कोरोनाची संख्या वाढून हॉटस्पॉट बनल्याने दिवसेंदिवस लॉकडाउन वाढू लागल्याने येथील पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. या संकट काळात पशुधन जगवण्यासाठी कोकरूड, माळेवाडी, गुढे, कुसळेवाडी, खिरवडे या गावांनी सात ट्रॅक्‍टर चारा देऊन मदतीचा हात पुढे करून माणुसकी जोपासली आहे. हे पशुधन वाचवण्यासाठी आजूबाजूच्या गावांतून "एक घर एक पेंडी' ही संकल्पना राबवली, तर या मुक्‍या प्राण्यांच्या जीव वाचेल असे आवाहन "सकाळ'ने केले होते. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. याबद्दल 'सकाळ'चे कौतुक होत आहे. 

मणदूर येथे सध्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस रुग्ण वाढू लागल्याने गावबंदीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. गावातील लोकांना बाहेर पडता येत नाही. त्यांना लागणाऱ्या अत्यावश्‍यक सेवेसाठी गावातल्या 22 तरुणांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्या माध्यमातून लोकांना औषध, किराणा, भाजीपाला घरपोच दिला जात आहे. घरोघरी सॅनिटायझर दिले जात आहेत. प्रत्येकाच्या गरजेनुसार त्यांच्या खात्यावरील बॅंकेतून पैसे काढणे, रेशनचे धान्य वाटप घरोघरी स्वयंसेवक करत आहेत. काही कोरोनाबाधित कुटुंब उपचारासाठी गेले असल्याने त्यांच्या जनावरांची देखभाल हे स्वयंसेवक करत आहेत.

पण, गेले महिनाभर जनावरे घरीच बांधून आहेत. बाहेर शेतात व रानात मुबलक चारा असुनही बाहेर जाता येत नाही. त्यामुळे घरात असणाऱ्या सुक्‍या चाऱ्यावर जनावरांना दिवसरात्र काढावी लागत आहे. सतत सुका चारा घालत असल्याने चारा टंचाई भासू लागली आहे. आम्ही मिळल ती चटणी भाकरी खाऊ पण मुक्‍या जनावरांना काय घालायचे हा प्रश्न लोकांना सतावत होता. 

लोकांचे पशुधन चाऱ्यामुळे अडचणीत येत असल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांना मिळताच त्यांनी दुभत्या जनावरांच्यासाठी त्यांच्या "विराज पशुखाद्य'मार्फत 100 पोती मोफत दिली आहेत. त्याचे 200 कुटुंबांना वाटप करण्यात आले. कोकरूड, माळेवाडी, गुढे, कुसळेवाडी, खिरवडे या गावांनी सात ट्रॅक्‍टर चारा दिला आहे. त्यामुळे काही कुटुंबाला आधार मिळाला आहे. 

मणदूरमधील पशूधन 

  •  म्हैस-480 
  •  बैल-40 
  •  गाय-40 
  •  शेळी-130 
  •  एकूण जनावरे 690 
  •  दुधाळ 230

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotspot Mandoor has helped with Fodder by five villages