कोरोनामुळे ब्रेक लागलेल्या चाळीसवर गृहप्रकल्पांना आता दसऱ्याचा मुहूर्त 

जयसिंग कुंभार
Sunday, 2 August 2020

कोरोनाच्या टाळेबंदीमुळे ब्रेक लागलेल्या नवीन गृहप्रकल्पांना प्रारंभ करण्यासाठी आता दसऱ्याचा मुहुर्त असेल.

सांगली : कोरोनाच्या टाळेबंदीमुळे ब्रेक लागलेल्या नवीन गृहप्रकल्पांना प्रारंभ करण्यासाठी आता दसऱ्याचा मुहुर्त असेल. महापालिका क्षेत्रात सुमारे चाळीसहून अधिक गृहप्रकल्पांचा प्रारंभ तेव्हा होईल. टाळेबंदीत नव्या फ्लॅटसाठी झालेली चौकशी आणि खरेदी या नव्या आशेची चुणूक दाखवणारी असल्याचे मत बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केले. 

टाळेबंदीत जणू जगच थांबले. दरवर्षी महापालिका क्षेत्रात सुमारे 1200 नव्या फ्लॅटस्‌ची विक्री होत असते. आधीच मंदीच्या झळा आणि त्यात मार्चपासून लागलेल्या टाळेबंदीने बाजारपेठच ठप्प झाली. जिल्ह्यात रेरा कायद्यांतर्गत 175 गृहप्रकल्पांची नोंदणी झाली आहे. त्यातील सुमारे दिडशेंवर केवळ महापालिका क्षेत्रातच सुरु आहेत. साधारण पाडव्याला आणि दसऱ्याला विक्री आणि नोंदणीची धांदल असते. याचवेळी नव्या प्रकल्पांचे भुमीपूजनही होत असते. कोरोनात हा काळ सरला. त्यामुळे गेल्या चार महिन्यात नवे गृहप्रकल्प सुरुच झाले नाहीत. जुन्याच प्रकल्पाची पुर्तता करण्यास व्यावसायिकांनी प्राधान्य दिले आहे. रेरा कायद्यानुसार प्रलंबित प्रकल्पांना नऊ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे मात्र त्याआधीच जुने प्रकल्प पुर्ण होतील अशी खात्री व्यावसायिकांनी व्यक्त केली. 

मात्र गेल्या महिन्याभरात पुन्हा एकदा बाजारपेठ हळूहळू गती पकडत आहे. कोरोनाच्या टाळेबंदीत हक्काच्या घराबद्दल लोक संवेदनशील झाले आहेत. विशेषतः पुण्या-मुंबईकडील मंडळीकडून सांगली-मिरजेत आपल्या गावाकडं निवाऱ्याची सोय असावी अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या चौकशी झाल्याने बाजारपेठ सुरळीत होताच नव्याने मागणी वाढेल असा अंदाज आहे. जवळपास नव्याने 40 गृहप्रकल्पाची मंजुरी प्रक्रिया सध्या विविध स्तरावर सुरु असून येत्या दसऱ्याचा मुहूर्त साधून त्यांना प्रारंभ होईल असे चित्र आहे. 

कोरोना आपत्तीत फ्लॅटचे दर स्थीरच राहिले आहेत. सध्या सोन्याचे वाढलेले दरही स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे ठरले आहेत. कमी उत्पन्न गटातील ग्राहकांना समोर ठेवून शहरात नव्याने काही गृहप्रकल्प सुरु आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान मिळवून अगदी आठ लाखात पाचशे चौरस फुटाचा फ्लॅट द्यायचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायांचा आहे. अशा गृहप्रकल्पांना मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. सांगली शहर परिसरातील उत्पन्न स्तर लक्षात घेऊन यापुढे अशा घरकुलांना मागणी वाढेल असाही अंदाज व्यक्त होत आहे. बांधकाम व्यावसायिकही त्यासाठी पुढे येतील असे सध्याचे चित्र आहे. 

कोरोनाचा काळ सरताच फ्लॅटची मागणी वाढेल असे सध्याच्या चौकशीतून जाणवते. टाळेबंदीतही महापालिका क्षेत्रातील सुमारे तीनशेंवर फ्लॅटची विक्री झाली. हे सुचिन्हच आहे. दसऱ्यानंतर नव्या गृहप्रकल्पांना सुरवात झाल्यानंतर हे चित्र झपाट्याने बदलेल असे वाटते.
- दिपक सूर्यवंशी, क्रेडाई, राज्य कार्यकारणी सदस्य 

कमी उत्पन्न गटासाठीच्या घरकुलांना मागणी वाढेल असे चित्र आहे. हक्काचं घर हवं ही भाडेकरूंची भावना कोरोना आपत्तीनंतर जाणवते. त्यांच्यासाठी घरे द्यावी लागतील. 
- अमर गोखले, बांधकाम व्यावसायिक 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: housing projects Now is the time for Dussehra