गर्दीत मिसळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना समजवायचे कसे ?

रविंद्र माने 
Thursday, 17 September 2020

सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड होत असताना रस्त्यावरील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही, या गर्दीमध्ये सर्वाधिक दिसत आहेत ते ज्येष्ठ नागरिक !

तासगाव : सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड होत असताना रस्त्यावरील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही, या गर्दीमध्ये सर्वाधिक दिसत आहेत ते ज्येष्ठ नागरिक ! वास्तविक या महामारीच्या काळात ज्येष्ठ वयस्कर मंडळींनी काळजी घेणे अपेक्षित असताना या ज्येष्ठ नागरिकांना समजवायचे कसे ? हा प्रश्न सगळ्यांना सतावतो आहे. 

कोरोनाच्या सापडलेल्या रुग्णांच्या वयोगटांचा विचार केला असता त्यामध्ये चटकन प्रादुर्भाव होणारे 60 वर्षावरील लोक आहेत. शिवाय सर्वाधिक मृत्यूही याच वयोगटातील व्यक्तींचे झालेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ आणि वृद्ध मंडळींनी काळजी घ्यावी असे आवाहन आणि प्रबोधन सुरू असताना बरोबर त्याच्या उलट चित्र दिसत आहे. रस्त्यावर जास्तीत जास्त 60 वर्षावरील नागरिकांचा वावर दिसतो आहे. तासगाव शहरात तर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही रस्त्यावर कधीही पाहिले तर एखादा तरी ज्येष्ठ नागरिक हमखास नजरेस पडल्याशिवाय रहात नाही. बॅंकांच्या दारात उभ्या असलेल्या रांगा मध्ये ज्येष्ठ नागरिक पेन्शननर, वृद्ध स्त्रिया यांची संख्या लक्षणीय दिसते. 

वास्तविक दरमहा बॅंक खात्यात पेन्शन जमा होते ती एटीएम मधून काढता येते असे असताना पैसे काढणे आणि केवळ पासबुक भरून घेण्याचा अट्टाहास या निवृतीवेतनधारकाचा असतो. बाजारात भाजीपाला खरेदीसाठीही या वयोगटातील लोकांचाच भरणा असतो. कोरोना मुळे मंदिरे बंद आहेत पण दररोजच्या नित्यनियमाप्रमाणे मंदिराच्या दारापर्यंत जाऊन येण्यासाठी, सकाळी संध्याकाळी फिरण्याच्या कारणामुळेही हे ज्येष्ठ रस्त्यावर येताना दिसत आहेत. सवय नाही आणि त्रास होतो असे म्हणत या फिरणाऱ्यापैकी बहुतांशी मास्क वापरत नाहीत. शहरातील एका भागात एका जेष्ठ नागरिकाला कोरोना झाल्यानंतर त्यांच्या समवेत कट्ट्यावर बसणाऱ्या प्रत्येकाला कोरोना झाल्याचे दिसून आले आहे. 

विशेष काळजी हवी 
या ज्येष्ठ वयस्कर लोकांना अनेकदा मधुमेह, हृदयविकार अशा सारखे आजार असतात अशा लोकांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. मात्र, घरात वेळ जात नाही, कामाला हातभार , सवय जात नाही अशा कारणांनी जेष्ठ नागरीक घराबाहेर पडताना दिसतात. यांना समजावून कोण सांगणार हा प्रश्न आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to convince senior citizens to join the crowd?