निविदा मान्यतेच्या वेळी भाजप नेत्यांना दोष कसे दिसू लागले?

बलराज पवार 
Saturday, 17 October 2020

भाजपची सत्ता असताना घनकचरा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया झाली. या प्रकल्पाबाबत महासभा घेऊन त्यावर चर्चा करावी अशी मागणी सर्व पक्ष करत असताना भाजप नेते गप्प होते.

सांगली : भाजपची सत्ता असताना घनकचरा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया झाली. या प्रकल्पाबाबत महासभा घेऊन त्यावर चर्चा करावी अशी मागणी सर्व पक्ष करत असताना भाजप नेते गप्प होते. मग निविदा मान्यतेच्या वेळी भाजप नेत्यांना त्यात दोष कसे दिसू लागले? त्यांनीच आणलेले आयुक्त जनहित विरोधी का वाटू लागले? घनकचरा प्रकल्पाबाबत भाजप जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, स्थायी समिती सदस्य दिग्विजय सूर्यवंशी आणि नगरसेवक सागर घोडके यांनी पत्रकार बैठकीत केला. 

घनकचरा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा ठराव महापालिकेच्या स्थायी समितीने केला होता. तो विखंडित करण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी शासनाला पाठवला आहे. यावर भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांनी घनकचरा प्रकल्पाचा बाजार होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. यावर आज राष्ट्रवादीने टीका केली. 

श्री. बागवान म्हणाले, भाजपच्या नेत्यांना डीपीआर मंजुरीवेळी किंवा टेंडर काढताना हे दोष का दिसले नाहीत? आता निविदा प्रक्रियेला मान्यता देण्याच्यावेळीच कसे काय दोष दिसायला लागले? ठेकेदाराशी काय बिनसले की भारतीय जनता पार्टीला हा प्रकल्प जनहीत विरोधी वाटू लागला? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. 

श्री. सूर्यवंशी म्हणाले, घनकचरा प्रकल्प मंजूर करताना त्यातील त्रुटी पाहिल्या नव्हत्या का? या प्रकल्पावर महासभा घेऊन त्यावर साधक बाधक चर्चा करावी अशी मागणी केली जात असताना भाजपचे नेते गप्प होते. स्थायी समितीमध्ये विषय त्यांनीच मंजुरीसाठी आणला असताना तो थांबवण्यासाठी आपल्याच सदस्यांना व्हीप बजावण्याची वेळ यांच्यावर आली. आयुक्त यांचे, सत्ता यांची असे असताना या प्रकल्पाबाबत जनतेची दिशाभूल केली जात आहे. 

राष्ट्रवादीकडून आयुक्‍तांची पाठराखण 
आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा आहे का? या प्रश्‍नावर श्री. बागवान म्हणाले, या प्रकल्पाबाबत आमचा कोणता इंटरेस्ट नाही. आयुक्तांनी ठराव शासनाला विखंडित करण्यासाठी पाठवला आहे. त्यावर शासन जो काय निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे, असे स्पष्ट करत त्यांनी अप्रत्यक्षपणे आयुक्तांची पाठराखण केली. संबंधित निविदा प्रक्रिया चांगली की वाईट हे पण स्पष्ट राष्ट्रवादीकडून स्पष्ट नाही.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How did the BJP leaders find fault with the tender?