विषय न शिकवता, समजला नसताना परीक्षा द्यायची कशी?

अजित झळके 
Monday, 21 September 2020

जिल्ह्यातील बहुतांश खासगी आणि सरकारी शाळांमध्ये सध्या घटक चाचणी, सराव चाचणी, शिष्यवृत्तीच्या परीक्षा ऑनलाईन सोडवून घेण्याचा धडाकाच सुरु आहे.

सांगली : जिल्ह्यातील बहुतांश खासगी आणि सरकारी शाळांमध्ये सध्या घटक चाचणी, सराव चाचणी, शिष्यवृत्तीच्या परीक्षा ऑनलाईन सोडवून घेण्याचा धडाकाच सुरु आहे. विद्यार्थ्यांना विषय न शिकवता, त्यांना तो समजला नसताना त्यांनी परीक्षा कशी द्यायची? विद्यार्थी गोंधळात आहेत; शिक्षक तर रेटा लावत आहेत... अशा स्थितीत शिक्षणाचा केवळ सोपस्कार चालला आहे... 

कोरोना संकट काळात यंदा दिवाळीपर्यंत शाळा भरणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यानंतरही त्या भरतील, याविषयी याघडीला तर शंकाच आहेत. त्यामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते. अशावेळी शाळा सुरू रहाव्यात, शिक्षकांच्या हाताला काम रहावे, विद्यार्थी व्यग्र रहावेत, यासाठी ऑनलाईन शिक्षण प्रणाली राबवली जात आहे. ती शंभर टक्के फेल नक्कीच नाही, मात्र सुमारे 25 ते 30 टक्के विद्यार्थ्यांकडे यासाठीच्या सुविधाच उपलब्ध नाहीत. ज्यांच्याकडे आहेत, त्यांना विषय समजला नसताना ते परीक्षा देत आहेत. गणित आणि विज्ञानसारख्या काठीण्यपातळी जास्त असलेल्या विषयांबाबत ऑनलाईन शिक्षण कामाचे आहे का? याचे उत्तर कुणाकडेच नाही. काही शाळांनी, शिक्षकांनी झूम, गुगल मीटचा उपयोग करून तास घेतले आहेत. ते परिणामकारक ठरतात का? विद्यार्थ्यांना विषय समजतो का, याचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. ही सारी गोंधळाची परिस्थिती आहे. 

शिक्षकांनी चाचणी सोडवण्यासाठी रेटा लावला आहे. ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत, असे विद्यार्थी गोंधळलेले आहेत. या पद्धतीने शिक्षण घेऊन उपयोग काय, असा सवाल काही पालकांनी उपस्थित केला आहे. वास्तविक, जिल्हा परिषदेने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण व्यवस्थेचा तटस्थपणे सर्वे करण्याची गरज आहे. या शिक्षण व्यवस्थेत किती विद्यार्थी पूर्णवेळ सहभागी झाले, किती विद्यार्थ्यांना विषय ऑनलाइन समजला, याची उघड चर्चा व्हायला हवी. अन्यथा, सोपस्कार पार पाडून एक वर्ष पुढे जाईल, मात्र विद्यार्थ्यांच्या नुकसानीचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. 

राज्य सरकार गोंधळलेले 
राज्य सरकार शिक्षण व्यवस्थेबाबत पुरते गोंधळून गेले आहे. पाचवीच्या तुकडीचा विषय त्याचे ताजे उदाहरण आहे. हा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याचा आदेश दोन दिवसांपूर्वी निघाला. मात्र याची माहितीच शिक्षण मंत्र्यांना नव्हती; त्यांनी मग त्याला स्थगिती दिली. या गोंधळात शाळा आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला, हेही नाकारून चालणार नाही.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to take an exam without teaching the subject?