शंभरीतल्या आजोबांची कोरोनावर मात

भगवान शेवडे
Friday, 11 September 2020

वय शंभरीतले. नातवंडांबरोबर निवांत गप्प्पा मारत आनंदी जीवन जगत असताना एक दिवस त्यांना कोरोनाने गाठले; मात्र काटक शरीरयष्टी, खंबीर मानसिकता यामुळे न घाबरता त्यांनी रोगावर मात करत दहा दिवसांच्या उपचारानंतर ते घरी परतले.

मांगले : वय शंभरीतले. नातवंडांबरोबर निवांत गप्प्पा मारत आनंदी जीवन जगत असताना एक दिवस त्यांना कोरोनाने गाठले; मात्र काटक शरीरयष्टी, खंबीर मानसिकता यामुळे न घाबरता त्यांनी रोगावर मात करत दहा दिवसांच्या उपचारानंतर ते घरी परतले. रोजचा व्यायाम, मर्यादित आणि सकस आहार; घरी आल्यागेल्याची विचारपूस करणे, ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली शिराळा तालुक्‍यातील (जि. सांगली ) मांगले गावचे रत्नाकर बळवंत कदम यांनी जपली आहे. 

मे महिन्यात शंभरीत पदार्पण केलेले रत्नाकर कदम आजोबा बारा दिवसांपूर्वी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये स्वत: चालत येऊन दाखल झाले. त्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या नातवाला राहण्याची मुभा रुग्णालय प्रशासनाने दिली होती. सेवानिवृत्त आदर्श शिक्षक असलेल्या त्यांच्या चिरंजीवांचा अहवाल आधीच पॉझिटिव्ह आला, त्यानंतर या आजोबांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार असणाऱ्या आजोबांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबीय काळजीत होते; मात्र आजोबांनीच सर्वांना धीर दिला. दहा दिवस आजोबांनी अतिशय धाडसाने या रोगाविरोधात मुकाबला केला. रोज डॉक्‍टर सांगतील त्या उपचारांना स्वयंशिस्त पाळणाऱ्या आजोबांनी प्रतिसाद दिला. उपचारांना यश आले आणि दहा दिवसांत आजोबा घरी आले. त्यांचे चिरंजीवही आता उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. 

रुग्णालयात असणारे इतर रुग्ण त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येत होते. त्यावेळी या रुग्णांनाही त्यांनी धीर द्यायचे काम केले. रोग किरकोळ आहे, धाडसाने सामना करा, तुम्ही नक्की मात कराल, अशी प्रेरणाही त्यांनी इतरांना दिली. हे करताना स्वतःही त्याच धाडसाने उपचार करून घेतले. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी इतरांनाही आनंदात राहा, धाडसी व्हा, असा सल्ला दिला. त्याचबरोबर रुग्णालयात उपचार करणारे डॉक्‍टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. 

इतर रूग्णांना प्रेरणा देणारा
शंभरीतील आजोबांनी धीराने कोरोना संसर्गाशी केलेला सामना इतर रूग्णांना प्रेरणा देणारा आहे. तुम्ही न घाबरता सामोरे गेलात, तर करोनावर सहज मात करू शकता, हे आजोबांनी यावेळी दाखवून दिले. 
- डॉ. ओंकार पाटील, कोविड केअर सेंटर, या संदर्भात शिराळा ग्रामीण रूग्णालय

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hundred year's grandfather overcame Corona in mangale - sangali