मजुरी करता करता पती-पत्नी लागले चोऱ्या करायला!

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

सोलापूर - मजुरी करणाऱ्या राम आणि उषाची एकदा कामाच्या ठिकाणी ओळख झाली. एकत्र मजुरी करताकरता दोघांनी अधूनमधून चोऱ्या करायला सुरवात केली. ऐश करण्यासाठी सहज पैसे मिळू लागल्याने ते पुणे सोडून इतर शहरातही हात मारू लागले. गेल्या आठवड्यात चोरी करण्यासाठी सोलापुरात आल्यानंतर मात्र त्या दोघांना गजाआड जावे लागले.

सोलापूर - मजुरी करणाऱ्या राम आणि उषाची एकदा कामाच्या ठिकाणी ओळख झाली. एकत्र मजुरी करताकरता दोघांनी अधूनमधून चोऱ्या करायला सुरवात केली. ऐश करण्यासाठी सहज पैसे मिळू लागल्याने ते पुणे सोडून इतर शहरातही हात मारू लागले. गेल्या आठवड्यात चोरी करण्यासाठी सोलापुरात आल्यानंतर मात्र त्या दोघांना गजाआड जावे लागले.

बेगम पेठ परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक खालिद शेख यांच्या घरात चोरी केल्याप्रकरणात पोलिसांनी राम सोन्या कांबळे ऊर्फ जाधव (वय 21, रा. पत्राशेड मार्केटशेजारी, पिंपरी, पुणे) व उषा राम कांबळे (वय 24, रा. यशवंतनगर, नुराणी मशिदीजवळ, पुणे) या दोघांना अटक केली आहे. ते दोघे सध्या पोलिस कोठडीत आहेत. राम आणि उषाने यापूर्वी केलेल्या चोरीच्या घटनांची चौकशी पोलिस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुरी करणाऱ्या राम आणि उषाची ओळख पुण्यात कामावर असताना झाली. गेल्या दोन वर्षांपासून ते एकत्र असून पती-पत्नी असल्याचे सांगत आहेत.

सात डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हे दोघे खालिद शेख यांच्या घरात घुसले. शेख हे काही वेळासाठी घराबाहेर गेले होते. राम आणि उषाने घरातील दागिने, रोकड चोरले होते. काही वेळातच शेख घरी आले. त्यांना दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये चोर असल्याचा अंदाज त्यांना आला. त्यांनी बाहेरून कडी लावली. घरमालक आल्याचे लक्षात आल्यानंतर राम हा चोरीचा ऐवज घेऊन छतावर गेला. त्याने गादी फाडून चोरीचा मुद्देमाल लपवून ठेवला, तर उषा हिने खोलीत स्वत:ला कोंडून घेतले आणि दागिने अंगावरील कपड्यात लपविले. शेख यांनी पोलिसांना बोलाविले. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. सात डिसेंबर रोजी या दोघांनी अशोक चौक परिसरातील आणखी एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला आहे. ते तीन दिवसांपासून रेल्वे स्थानकावर मुक्कामाला होते. बंद घरे शोधून चोरी करण्यासाठी ते सोलापुरात आले होते.

राम आणि उषा दोघेही सराईत गुन्हेगार असून सहज पैसा मिळवून ऐश करण्यासाठी ते या क्षेत्राकडे वळाले आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. नागरिकांनी अशा चोरट्यांकडून आपल्या घराचे संरक्षण करण्यासाठी सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी वॉचमनची नियुक्ती करावी.
- शैलेश खेडकर, पोलिस उपनिरीक्षक 

Web Title: Husband and wife to start thefting when wokring on wages