मी या गॅंगचा...त्या गॅंगचा ! 

हेमंत पवार
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

गुंडांच्या सावलीखाली शस्त्रांच्या आकर्षणाने वाढत असलेल्या युवकांच्या या टोळ्या दिवसेंदिवस घट्ट पाय रोवू लागलेल्या आहेत.

कऱ्हाड ः महाविद्यालयीन युवकांतही आता "गॅंगवॉर'ची ठिणगी पडत आहे. ओठावर मिशी नसतानाही वर्चस्व सिध्द करण्यासाठी एखाद्याच्या जिवावर उठण्याएवढे धाडस त्यांच्यात निर्माण झाले आहे. गुंडांच्या सावलीखाली शस्त्रांच्या आकर्षणाने वाढत असलेल्या युवकांच्या या टोळ्या दिवसेंदिवस घट्ट पाय रोवू लागलेल्या आहेत. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे महाविद्यालय, बस स्थानक, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ परिसरात युवकांच्या भांडणाच्या घटना सातत्याने घडत आहेत. 

काल रात्री शहरात भररस्त्यावर झालेल्या गोळीबारासारख्या घटनेतून कऱ्हाडच्या "गॅंगवॉर'ने पुन्हा अधोरेखित झाले आहे. या "गॅंगवॉर'ला कायस्वरूपी हद्दपार करण्यासाठी वाढणाऱ्या या युवकांच्या टोळ्यांवर वेळीच नियंत्रण आणल्यास अशा घटनांना पायबंद नक्कीच बसेल. गेल्या काही वर्षांत कऱ्हाड शहर शांत होते. मात्र, अधूनमधून डोके वर काढणाऱ्या या "गॅंगवॉर'ला कायमचे हद्दपार करायचे असेल तर केवळ "फॅशन' म्हणून गुंडांच्या सावलीखाली वाढणाऱ्या महाविद्यालयीन युवकांच्या टोळ्यांवर पोलिसांनी "वॉच' ठेवण्याची गरज आहे. केवळ गावठी कट्टे, पिस्तूल, तलवार यांसारख्या हत्याऱ्यांच्या आमिषाला बळी पडून पोलिस "रेकॉर्ड'वरील गुंडांच्या मागे फिरणाऱ्या या युवकांची पावले गुंडगिरीकडे वळत असल्याचे शहरात चित्र आहे. त्यामुळे कॉलेज परिसरात किरकोळ भांडणे झाली तरीही आपले वर्चस्व दाखवण्यासाठी संबंधित युवक शहरातील गुंडांना "ऑन दि स्पॉट' बोलावून घेऊन त्यांचे वर्चस्व ते सिध्द करत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातून गुंडांच्या सावलीखाली या युवक टोळ्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यातूनच मी या गॅंगचा... तो त्या गॅंगचा... असे शिक्केच युवकांनी स्वतःवर मारून घेतले आहेत. त्यातूनच त्यांच्यात खटका उडून एखाद्याच्या जिवावर उठण्याएवढे धाडस त्यांच्यात येऊ लागलेले आहे. शहरातील अनेक ठिकाणी असे चित्र दिसते. शैक्षणिक "करिअर'चा विचार न करता केवळ मी "भाई' आहे, या अविर्भावात वावरणाऱ्या युवकांना पोलिसांनी वेळीच आवरण्याची गरज आहे. तर अशा रस्त्यावरच होत असलेल्या गोळीबारासारख्या मोठ्या घटनांना चाप बसणे शक्‍य होईल. 

शस्त्रे येतात कुठून? 

पोलिसांनी यापूर्वी केलेल्या कारवाईतून रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह काही अल्पवयीन तरुणांकडेही शस्त्रे आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक तरुण केवळ शस्त्रांच्या आकर्षणाने भाईगिरी करण्यासाठी या "गॅंगवॉर'मध्ये येत असल्याचेही पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शस्त्रे येतात कुठून आणि त्यांना ते पुरवते कोण? याचा छडा लावून त्यावर निर्बंध आणण्यासाठी पोलिसांनी त्यांचाही पंचनामा करणे गरजेचे आहे. 

आई-वडील अनभिज्ञच 

पदरमोड करून, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन अनेक आई-वडील आपल्या मुलांना कॉलेजला पाठवतात. हजारो रुपयांची कॉलेजची फी ते भरतात. मात्र, त्यांच्या मुलांवर पाहिजे त्या प्रमाणात लक्ष नसल्याने थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावरच आई- वडिलांना आपल्या मुलाचे कारनामे कळतात. तोपर्यंत ते अनभिज्ञच असतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I belong to this gang ... of that gang !