गुडेवारांशी माझे भांडण नाही - सुरेश खाडे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

"गेल्या महिन्यात मी जिल्हा परिषदेत आलो होतो. तेंव्हा गुडेवार यांची भेट घेतली. त्यांना मी चांगले काम करत असल्याने शुभेच्छा दिल्या. कारवाई करताना हयगय करू नका, भले भाजपचा दोषी असला तरी चालेल, असे सांगितले होते.

सांगली ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याशी माझे भांडण नाही. आमचा बांधाला बांध नाही. ते प्रामाणिक अधिकारी आहेत, याबद्दल दुमत नाही. परंतू, पदाधिकारी आणि सदस्यांसोबत त्यांनी थोडे समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा आहे, अशी भूमिका आमदार सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केली. 

जत तालुक्‍यातील एका विषयासंदर्भात श्री. खाडे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या कक्षात आज बैठक झाली. त्याला श्री. गुडेवार हेही उपस्थित होते. कालच आमदार खाडे यांनी गुडेवार यांच्या बदलीसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठवलेले पत्र समोर आले होते. त्याबद्दल जिल्ह्यातून नाराजीचा सूरही उमटला. त्यानंतर श्री. खाडे यांनी थोडी संयमित भूमिका घेतली. 

ते म्हणाले, ""गेल्या महिन्यात मी जिल्हा परिषदेत आलो होतो. तेंव्हा गुडेवार यांची भेट घेतली. त्यांना मी चांगले काम करत असल्याने शुभेच्छा दिल्या. कारवाई करताना हयगय करू नका, भले भाजपचा दोषी असला तरी चालेल, असे सांगितले होते. आजही माझी तीच भूमिका आहे. परंतू, जिल्हा परिषदेत थोडी नाराजी आहे. पदाधिकारी आणि सदस्यांशी गुडेवार यांचा संवाद नाही, असे चित्र समोर आले आहे. सदस्यांनीच ते आमच्यापर्यंत पोहचवले. त्या सदस्यांनी जिल्ह्यातील सर्वच आमदारांना ते सांगितले. काही आमदारांनी त्याची दखल घेत गुडेवार यांच्या बदलीची मागणी करणारे पत्र दिले. ती पत्रे घेऊन सदस्य मला येऊन भेटले. मलाही पत्र द्या, अशी विनंती केली. मी आमदारांची पत्रे पाहिली आणि विषय गंभीर दिसत असल्याने मीही पत्र दिले. वास्तविक, गुडेवारांच्या कामाबद्दल माझी काही तक्रार नाही. आम्ही विरोधी आमदार आहोत. आमच्या पत्राने सरकार थोडीच बदली करणार आहे. यातून एक गोष्ट नक्की, की गुडेवार आणि सदस्यांमध्ये समन्वय राहिले पाहिजे, वाढला पाहिजे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I have no quarrel with Gudewar - MLA khade