पुरावे दिल्यास मी तत्काळ राजीनामा देईन : आमदार राम सातपुते 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

आधारहीन आरोपांबाबत काहीच बोलू शकत नाही. माझ्यावर गुन्हा सिद्ध करावा अथवा आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिल्यास मी तत्काळ राजीनामा देईन, असा इशारा आमदार राम सातपुते यांनी या वेळी दिला.

सोलापूर : भीमा -कोरे प्रकरणात माझ्यावर कोणतेही गुन्हे नाहीत. विरोधकांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही. आधारहीन आरोपांबाबत काहीच बोलू शकत नाही. माझ्यावर गुन्हा सिद्ध करावा अथवा आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिल्यास मी तत्काळ राजीनामा देईन, असा इशारा आमदार राम सातपुते यांनी या वेळी दिला. संविधानाच्या चौकटीला अनुसरून नव्या सरकारने तरुणांवरील गुन्हे माफ करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. संविधानाच्या विरोधात माझा बाप उभारला, तरीही मी माफ करत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आमदार सातपुते म्हणाले

दरनिर्वाहानिमित्त माझे कुटुंब गावोगावी फिरत पुण्यात स्थायिक झाले. मात्र, माळशिरस तालुक्‍याच्या मातीशी नाळ तुटली नाही. आता आमदार म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली. आगामी पाच वर्षांत शेतकरी, सुशिक्षित तरुण, कुस्तीगीरांसह महिलांचे प्रश्‍न सुटतील, असा विश्‍वास आमदार राम शिंदे यांनी व्यक्‍त केला. मी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता असल्याने जनतेत घुसून काम करण्याची तयारी ठेवली आहे. तालुक्‍यातील रस्ते, पालखी मार्ग आणि बेरोजगारी ही समस्या सोडविण्यावर भर असेल. नागरिकांच्या समस्या खूप छोटी असते. मात्र, ती सुटण्यासाठी वेळ लागतो. त्यांच्यासाठी मी उपलब्ध असेन, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. तत्पूर्वी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी आमदार सातपुते यांचे स्वागत केले. 

सर्वकाही माझ्या सासरच्यांनीच केले.... 
मी एक सामान्य कार्यकर्ता असून माझे घर माती अन्‌ पत्र्याचे आहे. मी चार महिन्यांपूर्वी त्याच घरात राहत होतो. मी इंजिनिअर असल्याने सासरच्यांनी मला मुलगी दिली. माझ्या सासरवाडीतील मंडळींना त्यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या हॉटेलात करावा वाटला. माझ्या पत्नीचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. पैसा आहे म्हणून त्यांनी मोठा थाट केला. त्यामुळे सोशल मीडियावर जुने घर आणि हॉटलेमधील माझ्या कार्यक्रमाचे जे फोटो व्हायरल झाले ते दोन्हीही खरेच आहेत. मात्र, वैयक्‍तिक आयुष्यात डोकावणे चुकीचेच आहे, असे आमदार श्री. सातपुते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I will resign immediately : MLA Ram Satpute