विरोध असेल तर मिरज हायस्कूलच्या जागेचा ठराव खंडित करू : उपमहापौर आनंदा देवमाने

प्रमोद जेरे
Wednesday, 30 September 2020

मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणाची जागा व्यापाऱ्यांना देताना हायस्कूलच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होणार असेल, तर आपण स्वतः याबाबतचा ठराव खंडित करू, असे आश्वासन उपमहापौर आनंद देवमाने यांनी मिरज हायस्कूल बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळास आज दिले. 

मिरज (जि .  सांगली) : मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणाची जागा व्यापाऱ्यांना देताना हायस्कूलच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होणार असेल, तर आपण स्वतः याबाबतचा ठराव खंडित करू, असे आश्वासन उपमहापौर आनंद देवमाने यांनी मिरज हायस्कूल बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळास आज दिले. 

याबाबत मिरज हायस्कूल बचाव कृती समितीच्या सदस्यांनी दिलेली माहिती अशी, उपमहापौर देवमाने हे एका बैठकीसाठी महापालिकेच्या मिरज कार्यालयात आले असता कृती समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन त्यांना हा ठराव खंडित करण्याची विनंती केली. यावेळी उपमहापौर देवमाने यांनी आपण हा ठराव महापालिकेचे आर्थिक हित साधण्यासाठी सभेसमोर आणला. परंतु त्यामुळे हायस्कूलच्या अस्तित्वास बाधा येत असेल, तर आपण स्वतः हा ठराव खंडित करू. अद्याप या ठरावाचे इतिवृत्त लिहिलेले नाही, असेही महापौर देवमाने यांनी स्पष्ट केले. 

अण्णाबुवा शॉपिग सेंटरमधील दुकानधारकांना मिरज हायस्कूलच्या क्रिडांगणाची जागा देण्याच्या ठरावाचा विषय मिरज हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेल्या उपमहापौर आनंदा देवमाने यांनी आयत्या वेळचा विषय म्हणून घाईगडबडीत मंजूर करून घेतला.

या ठरावाविरोधात मिरजेतील सामाजिक संघटना व माजी विद्यार्थ्यांनी मिरज हायस्कूल बचाव कृती समितीची स्थापना केली आणि महापालिकाविरोधात लढा उभारला. याबाबत आज (ता. 29) भेटलेल्या शिष्ट मंडळात ऍड. ए. ए. काझी, तानाजी रुईकर, जावेद पटेल, मुस्तफा बुजरुक, संतोष माने, डॉ. प्रशांत लोखंडे, असिफ निपाणीकर, शंकर परदेशी, बाळासाहेब पाटील यांचा समावेश होता. 

ठराव रद्द होईपर्यंत लढा सुरुच 
मिरज विभागीय कार्यालयात उपमहापौर आनंदा देवमाने यांच्या भेटीवेळी ठराव खंडित करण्याबाबत सविस्तर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठराव रद्द करण्याची मागणी ठामपणे केली. शिवाय हा ठराव रद्द होईपर्यंत हा लढा सुरुच राहणार असल्याचेही स्पष्ट केले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If oppose is there, we will stop the decision of Miraj High School land: Deputy Mayor Ananda Devmane