रूग्ण दगावल्यास विल्हेवाट शास्त्रशुध्द पध्दतीने लावा

विष्णू मोहिते
Wednesday, 29 July 2020

उपचारादरम्यान रूग्ण दगावल्यास मृतदेहाची विल्हेवाट शास्त्रशुध्द पध्दतीने लागेल याबाबत दक्ष रहा. यात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक बाबींचे तंतोतंत पालन करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिले. 

सांगली : राज्यात कोरोना बाधितांची संख्या व मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधितांवरील उपचारासाठी खासगी हॉस्पीटल अधिग्रहित करण्यात येत आहेत. उपचारादरम्यान रूग्ण दगावल्यास मृतदेहाची विल्हेवाट शास्त्रशुध्द पध्दतीने लागेल याबाबत दक्ष रहा. यात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक बाबींचे तंतोतंत पालन करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिले. 

खासगी हॉस्पीटल कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून घेणे व देखरेख ठेवणे यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत असताना डॉ. चौधरी बोलत होते. महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे उपस्थित होते. 

डॉ. चौधरी यांनी अतिसौम्य लक्षणे असणारे किंवा लक्षणे नसणारे कोरोना बाधित रूग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल सेंटरमध्ये येऊ नयेत व त्यांना कोविड केअर सेंटरमध्येच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी कोविड केअर सेंटर्सना आवश्‍यक सामग्री त्वरीत उपलब्ध करून द्यावी, असे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. अधिग्रहित हॉस्पीटल्समध्ये ज्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना सेवा आदेश देण्यात आलेत त्यांनी त्या ठिकाणी सेवा सुरू केली अथवा नाही याचा आढावा महानगरपालिका आयुक्तांनी त्यांच्या स्तरावरून घ्यावा, असेही स्पष्ट केले. अधिग्रहित हॉस्पीटल्सनी कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी आवश्‍यक असणाऱ्या बाबींची उपलब्धता त्वरीत करून घेण्याबाबत संबंधित हॉस्पीटल व्यवस्थापनाला सांगावे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If the patient is cheated, dispose of it in a scientific manner

Tags
टॉपिकस
Topic Tags: