तुमची काळजी घेणारा कोणी असेल तर माघारीस तयार : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभेसाठी जिल्ह्यातील भाजपच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. 

सातारा  : जिल्ह्यात कोणावरही अन्याय होत असेल, तर तो मी कदापि सहन करणार नाही. अजूनही मी लोकसभेचा अर्ज भरलेला नाही. माझ्यापेक्षा तुमची अधिक काळजी घेणारा कोणी असेल, तर सांगा. माझी माघार घेण्याची तयारी आहे. मी त्यांचा प्रचारक म्हणून काम करेन, असे स्पष्ट करत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभेसाठी जिल्ह्यातील भाजपच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे, अशी ग्वाही दिली. 

भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार व उदयनराजे समर्थकांची एकत्रित बैठक साताऱ्यात आज झाली. त्या वेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, ऍड. भरत पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, महेश शिंदे, दत्ताजी थोरात, अविनाश फरांदे, सुवर्णा पाटील, सुनील काटकर, विक्रमबाबा पाटणकर, रंजना रावत, सिद्धी पवार, विजय काटवटे, विकास गोसावी उपस्थित होते. 

उदयनराजे म्हणाले, ""वेगवेगळ्या पक्षात माझे मित्र असले, तरी मैत्री ही मैत्रीपुरतीच राहील. आता निवडणूक जाहीर झाल्याने अफवांचा सुळसुळाट होत आहे. आज जे माझ्यासोबत आहेत, ते माझ्यासोबतच राहतील. जे राहणार नाहीत ते नाहीत. भाजपचे जेवढे आमदारकीचे उमेदवार आहेत. शंभूराज देसाई, अतुल भोसले, मनोज घोरपडे, महेश शिंदे, आमचे लाडके बंधू शिवेंद्रसिंहराजे असतील. या सगळ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन. निवडणूक आहे म्हणून बोलतोय असे नाही. निवडणुका होत राहतात. ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. कोणाला निवडून द्यायचे, हे तुमच्या हातात आहे. मी लोकशाही मानणारा आहे. माझ्यावर एवढ्या केसेस आहेत; पण केसेस का आहेत, याचा विचार केला का? मला अन्याय सहन होत नाही. हा माझा स्वभाव दोष असेल. जिल्ह्यात कुठेही, कोणावरही झालेला अन्याय सहन करणार नाही. स्त्री ही आदीशक्ती असून, तिच्यावर अन्याय होत असेल तर तो मी कसा सहन करेन?'' मी अजून अर्ज भरलेला नाही. माझ्यापेक्षा तुमची काळजी घेणारा एखादा असेल तर माझी माघार असेल. मी त्यांचा प्रचारक म्हणून काम करण्यास तयार आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. ते माझे मित्र असून, मला कॉलेजला चार वर्षे सिनिअर होते. आम्ही अजूनही मैत्री जपली आहे. वाईट काळात माझ्यासाठी भाजपचे लोक धावून आले. मागचे सर्व विसरून आपण वर्तमानात राहण्याचा विचार करूया. आपण जो न्याय द्याल तो मान्य असेल, मला कधीही अंतर देऊ नका. आय लव्ह यू, असे आवाहनही त्यांनी केले. 

अतुल भोसले म्हणाले, ""कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ उदयनराजेंच्या पाठीशी ताकदीने राहील. राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी कऱ्हाड, पाटणमधून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या तीन मतदारसंघांकडे आपल्याला अधिक लक्ष द्यावे लागेल.'' 
विक्रम पावसकर म्हणाले, ""अल्प कालावधीत आपल्याला विधानसभा व लोकसभा निवडणुकीचे युद्ध लढायचे आहे. शत्रू पिसाळलेला आहे. सातारा शहरात झालेल्या राष्ट्रवादीच्या रॅलीत आपण त्यांची वागणूक बघितली आहे. लहान मुलांप्रमाणे ते वागत होते. आता जागृत राहून तन, मन आणि धनाने काम करायचे आहे. त्यामुळे सर्वांनी पूर्ण ताकदीने निवडणुकीत सहभागी होऊन भाजपच्या उमेदवारांना निवडून आणायचे आहे.'' या वेळी शेखर चरेगावकर, रंजना रावत यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. 

बैठकीकडे शिवेंद्रसिंहराजेंची पाठ 

जिल्हा भाजप व उदयनराजे समर्थकांची एकत्र बैठक आज साताऱ्यात घेण्यात आली. या बैठकीस भाजपमधून विधानसभेसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार उपस्थित होते. मात्र, शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित नव्हते. त्यांची अनुपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. 
या संदर्भात त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ""मी साम टीव्हीच्या कार्यक्रमात होतो. तेथे उशीर झाल्याने भाजपच्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही,'' असे त्यांनी स्पष्ट केले. 

दोन्ही राजे मंगळवारी अर्ज भरणार

भाजपच्या वतीने येत्या मंगळवारी (ता. 1) उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. त्यासाठी सातारा शहरातून रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विक्रम पावसकर यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If there is anyone who cares for you i will withdrawa says Udayanraje