esakal | इस्लामपुरात शिवसेनेला विश्‍वासात न घेतल्यास योग्य वेळी निर्णय घेऊ : शंभूराजे देसाई यांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

shamburaje desai.jpg

इस्लामपूर (सांगली)-  इस्लामपुरात शिवसेनेला स्थानिक मंत्री विश्वासात घेत नसतील तर योग्य वेळ येताच त्यावर निर्णय घेतला जाईल, असा इशारा देतानाच पदवीधर निवडणुकीत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समन्वयाने काम सुरू असल्याची ग्वाही गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज येथे दिली. 

इस्लामपुरात शिवसेनेला विश्‍वासात न घेतल्यास योग्य वेळी निर्णय घेऊ : शंभूराजे देसाई यांचा इशारा

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर (सांगली)-  इस्लामपुरात शिवसेनेला स्थानिक मंत्री विश्वासात घेत नसतील तर योग्य वेळ येताच त्यावर निर्णय घेतला जाईल, असा इशारा देतानाच पदवीधर निवडणुकीत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समन्वयाने काम सुरू असल्याची ग्वाही गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज येथे दिली. 

पदवीधर निवडणूक पार्श्वभूमीवर आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्थानिक मंत्री शिवसेनेला विश्वासात घेऊन काम करत नसल्याची तक्रार आहे, यावर काय भूमिका घेणार? या प्रश्नावर मंत्री देसाई यांनी हे मत मांडले. 

मंत्री देसाई म्हणाले, ""राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार श्री. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. महाविकास आघाडीने निवडणुकीचे चांगले नियोजन केले आहे. अजितराव घोरपडे आणि आमदार बाबर यांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या पुढाकाराने लवकरच तालुकानिहाय शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडीच्या स्वतंत्र समित्या स्थापन केल्या जातील. सर्वांच्या समनव्यातून ही निवडणूक आम्हीच जिंकू.'' 

ते म्हणाले, ""पूर्वनियोजित बैठकांमुळे आज इस्लामपूर शहरातील महाविकास आघाडीच्या मेळाव्याला शिवसैनिक उपस्थित राहू शकले नाहीत. आम्ही सर्व एक आहोत. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये रोज चर्चा, संपर्क आणि समन्वय आहे. आवश्‍यक त्या सुधारणा केल्या जात आहेत. भविष्यातील निवडणुकांमध्ये वरिष्ठ स्तरावरून जो निर्णय होईल, त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल.'' आमदार अनिल बाबर, माजी आमदार अजितराव घोरपडे, जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, नितीन बानूगडे-पाटील, संजय विभूते, बजरंग पाटील आदींसह दिगंबर जाधव, नगरसेवक शकील सय्यद, किरण सावंत, सुवर्णा मोहिते, प्रतिभा शिंदे, सुभाष मोहिते, सागर मलगुंडे, राहुल टीबे, कमलेश शहा, घनश्‍याम जाधव, किरण सावंत, नंदकुमार निळकंठ, युवराज निकम, वर्षा निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

मिरज, पलूसच्या कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश- 
गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत मिरज येथील भाजपचे कार्यकर्ते पोपट घोरे यांनी कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. पलूसचे माजी ग्रामपंचायत सदस्य दिपक शिंदे यांनीही समर्थकांसह पक्षप्रवेश करुन शिवबंधन बांधले.