
"कोरोना'च्या पार्श्वभूमीवर यंदा पूरग्रस्त म्हणून नागरिकांना एकत्र ठेवणे अवघड आहे. पूरपट्ट्यातील नागरिकांना आपली व्यवस्था स्वतःच करावी, असे आवाहन सांगली प्रशासनाने केले आहे.
सांगली : संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिका सज्ज आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपत्ती नियोजन आराखडा तयार केला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, पाच बोट हाऊस अशी सज्जता करतानाच
कृष्णा नदीने 20 फुटांची पातळी ओलांडताच पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या जातील. "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर यंदा पूरग्रस्त म्हणून नागरिकांना एकत्र ठेवणे अवघड आहे. पूरपट्ट्यातील नागरिकांना आपली व्यवस्था स्वतःच करावी, असे आवाहन केले आहे.
गेल्या वर्षीच्या महापुराचा अनुभव आणि त्रुटींचा विचार करून यंदाचा आपत्ती नियोजन आराखडा आयुक्त नितीन कापडणीस यांनी तयार केला आहे. गतवर्षी अचानक पाणी वाढल्याने तातडीने नियोजन करताना त्रुटींही झाल्या. त्यातून धडा घेत यंदाचा पूर नियंत्रण आराखडा तयार केला. अग्निशामक विभागाचे प्रमुख चिंतामणी कांबळे यांची टीम सज्ज आहे. महापालिकेने सर्व आपत्कालीन यंत्रणेसह मनुष्यबळ, स्वयंसेवी संस्था, तसेच आपत्ती मित्र यांच्याशी समन्वय साधून त्यांचेही मत घेण्यात आले आहे.
यंदा कृष्णा नदीची पाणीपातळी 20 फूट ओलांडताच महापालिकेची यंत्रणा पुरपट्ट्यातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन करणार आहे. पूरपट्ट्यातील लोकांना आपत्ती पूर्व प्रशिक्षण दिले जात आहे. आपत्ती काळात आपत्कालीन सेवेसाठी स्वतंत्र पथकही असेल. कोणतीही जीवित हानी होणार नाही यासाठी प्रशासन काळजीपूर्वक प्रयत्न करीत आहे. पुराच्या स्थितीत शहराचा पाणीपुरवठा नियमित ठेवण्याचा प्रयत्न आहे. आणीबाणीच्या काळात मोबाईल यंत्रणा सुरळीत राहावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
आपत्तीसाठी सज्ज यंत्रणा
एकूण फायर कर्मचारी 62, अग्निशामक गाड्या 7, एक रेस्क्यू व्हॅन, 50 लाईफ जॅकेट, 25 लाईफ रिंग, वुड कटर 10, यांत्रिक फायबर बोटी 7, ओबीएम मशीन 7. मंगलधाममध्ये 15 दिवसांत वेदर मॉनिटरिंग स्टेशन सुरू होईल. आपती नियोजन प्रशिक्षणाचा हॉलही कार्यरत होईल. पाणी पातळी वाढत चालल्यास 15 ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेरेद्वारे पूरपातळी रेषेवर वॉच राहणार.
नागरिकांनी या गोष्टी कराव्यात
कृष्णा नदीने 25 फुटाची पातळी ओलांडल्यानंतर नागरिकांनी सुरक्षितस्थळी आपले साहित्य, जनावरांसहित स्थलांतरित व्हावे. मुख्य मार्गावरील दुतर्फा पार्क केलेल्या गाड्या रिकाम्या जागी लावाव्यात. महत्वाची कागदपत्रे किंवा साहित्य वेळीच हलवावे.