विसर्जनात नेत्यांनी सांधला गटबांधणीचा धागा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

  कऱ्हाडला बाबांचा गाजला "सेल्फी'; विधानसभेच्या तोंडावर संपर्काचा प्रयत्न

कऱ्हाड ः कृष्णा नदीत केवळ शहरातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सार्वजनिक गणेश मंडळे त्यांच्या मूर्ती विसर्जित करतात. त्यामुळे तो सोहळा अखंड 18 तासांपेक्षाही जास्त काळ चालतो. त्या सोहळ्यात सहभागी होऊन अनेक नेत्यांनी त्यांच्या गटाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याचे काल दिवसभरातील घटनांनी अधोरेखित केले. त्यात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, आमदार बाळासाहेब पाटील यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. 

विधानसभेच्या तोंडावर आलेल्या गणेशोत्सवामध्ये नेत्यांनी अधिकाधिक लोकसंपर्क ठेवण्यासाठी प्रयत्न केले. गणेश विसर्जन मिरवणुकीत मात्र नेते कटाक्षाने दिसले. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवसभरात मिरवणुकीचा अंदाज घेतला. सायंकाळी सातनंतर ते मिरवणुकीमध्ये गाठीभेटीसाठी बाहेर पडले. चावडी चौकात स्वागत कक्षातही ते काही काळ बसले. त्या वेळी त्यांची तेथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्याशी भेट झाली. त्यांनी तेथे काही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चाही केली. मात्र, ती अत्यंत हलक्‍या आवाजात होती. त्यानंतर ते आझाद चौकातील नवजवान गणेश नवरात्र उत्सव मंडळांच्या आरतीसाठी निघाले. वाटेत जे मंडळ भेटेल त्यांच्याशी चर्चा करत ते जात होते. एका मूर्तीचे दर्शनही त्यांनी घतेले. आझाद चौकात नवजवान आरतीसाठी ते आले. त्यापूर्वीच तेथे पालिकेतील यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादवही उपस्थिती होते. आमदार चव्हाण येणार आहेत, ते कळाल्यानंतर तेही काही काळ थांबले. त्या मंडळाच्या आरतीसाठी दर वर्षी त्यांची उपस्थिती असते. आमदार चव्हाण आल्यानंतर आरती सुरू झाली. त्या वेळी दोन निरंजने करण्यात आली होती. एक श्री. चव्हाण व व दुसरे श्री. यादव यांच्या हाती देण्यात आले. आरतीत आमदार चव्हाण यांच्या समवेत यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादवही सहभागी झाल्याने शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. श्री. यादव यांनी नुकताच मेळावा घेऊन नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण व श्री. यादव यांच्या एकत्रीकरण चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार चव्हाण यांच्यासोबत श्री. यादव यांचे विरोधक इंद्रजित गुजरही होते, तेही आरतीत सहभागी झाले होते. त्यामुळे शहरात वेगळीच चर्चा सध्या रंगली आहे. विसर्जनानिमित्ताने आमदार चव्हाण व श्री. यादव यांच्यात झालेल्या हस्तांदोलनाचीही चर्चा आहे. या वेळी आमदार चव्हाण यांनी त्यांची विचारपूस केली. त्यानंतर आमदार चव्हाण यांच्या एका बाजूला यशवंत विकास आघाडीचे नेते श्री. यादव व दुसऱ्या बाजूला इंद्रजित गुजर अशा स्थितीत आमदार चव्हाण यांना लोकांसमवेत "सेल्फी' काढला. त्याचीही शहरात सध्या जोरदार चर्चा आहे. लोकांसमवेत "सेल्फी' काढल्यानंतर आमदार चव्हाण यांनी गणेशमूर्तीसोबतही "सेल्फी' काढला. त्या वेळीही लोकांनी गणपती बाप्पा मोरया...च्या घोषणा दिल्या. "सेल्फी'नंतर तेथे उपस्थित महिलांशीही आमदार चव्हाण यांनी चर्चा केली. उंडाळकर गटाचे नेते ऍड. उदयसिंह पाटील यांनीही मिरवणुकीत सहभागी होत कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेतला. चावडी चौकातील स्वागत कक्षात त्यांनी बराच वेळ ठाण मांडला होता. त्या वेळी त्यांनी येणाऱ्या मंडळांचे स्वागत केले. त्या वेळी त्यांनी काही मंडळांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी पायीही मिरवणुकीत फेरफटका मारला. त्या वेळी अनेक मूर्तींचे दर्शनही घेतले. 

 

नागरिकांच्या गर्दीनेही नेते आकर्षित 

शहरातील विविध गणेश मंडळांच्या रात्रीच गाठीभेटी घेण्याचे आमदार चव्हाण, बाळासाहेब पाटील व ऍड. पाटील- उंडाळकर यांनी ठरवले होते, असेच जाणवते. दिवसभरात त्यांनी माहिती घेतली होती. मात्र, गर्दी झाल्यानंतर सायंकाळी सहानंतर प्रत्येक नेते त्यांच्या सोयीने बाहेर पडत होते. सर्वच नेत्यांनी मंडळांचे स्वागत केले. काहींनी मंडळांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. मात्र, सायंकाळी वाढणाऱ्या गर्दीनेही नेत्यांना आकर्षित केले होते. त्यामुळेच ते रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीत ठाण मांडून होते. 

कऱ्हाड ः आझाद चौकातील नवजवान गणेश मंडळांची आरती झाल्यानंतर जमलेली गर्दी पाहून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनाही "सेल्फी' काढण्याचा मोह आवरला नाही. त्या वेळी त्यांनी काढलेल्या "सेल्फी'ला लोकांनी हात उंचावून दाद दिली. त्या वेळी त्यांच्या डाव्या बाजूला पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव, तर उजवीकडे इंद्रजित गुजर होते. त्याचीही शहरात चर्चा आहे. (सुरेश डुबल ः सकाळ छायाचित्रसेवा) 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the immersion the leaders took 'Selfie'