नॉन कोविड, विलगीकरण रुग्णांना "इम्युनिटी बुस्टर' ; खास कीटची सोय

अजित कुलकर्णी
Wednesday, 16 September 2020

कोरोनाला आटोक्‍यात आणण्यासाठी सर्व यंत्रणा रात्रंदिवस काम करत असताना काही सामाजिक संस्थांनीही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम सुरु केले आहे. कोरोनाचा संसर्ग होउ नये व झालाच तर घरच्या घरी उपचारासाठी ना नफा ना तोटा तत्वावर इम्युनिटी बुस्टर कीट देण्यात येत आहेत. 

सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेकांनी नानाविध उपाययोजना केल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात हाताला काम नसलेल्या लोकांच्या पोटापाण्यासह निवाऱ्याची सोय करण्यापासून ते आता रुग्णांना बेड मिळवून देण्यापर्यंत अनेकांचे हात झटत आहेत. कोरोनाला आटोक्‍यात आणण्यासाठी सर्व यंत्रणा रात्रंदिवस काम करत असताना काही सामाजिक संस्थांनीही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम सुरु केले आहे. कोरोनाचा संसर्ग होउ नये व झालाच तर घरच्या घरी उपचारासाठी ना नफा ना तोटा तत्वावर इम्युनिटी बुस्टर कीट देण्यात येत आहेत. 

कोरोनाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरु आहे. बाधित रुग्णांना यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे वेळेवर उपचार मिळणे दुरापास्त बनले आहे. त्यासाठी घरीच उपचार करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. अशा गृह विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी राष्ट्रीय संघटन मंडळ व सांगली सायकल स्नेही ग्रुपतर्फे विशेष सेवा देण्याचे काम सुरु आहे.

साधारण 14 दिवसांच्या या विलगीकरण काळात लागणारी औषधे, सॅनिटायझर, मास्क, पल्स ऑक्‍सिमीटर, डिजीटल थर्मामीटर, आयुर्वेदिक काढा या वस्तूंचे तयार कीट अल्प दरात देण्यात येत आहे. शिवाय फोनवरुन तज्ञ डॉक्‍टरांशी रुग्णाचा संवाद घडवला जातो. रुग्णाचे समुपदेशन करुन त्याचे मानसिक बळ वाढवण्याची जबाबदारीही संघ स्वयंसेवक घेत आहेत. वेळ पडल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे रुग्णाला आधार देण्याचे काम करण्यासह तब्येतीचाही आढावा घेतला जातो.

राष्ट्रीय संघटन मंडळाचे शैलेंद्र तेलंग, सांगली सायकल स्नेहीचे हेमंत पाटील, भूषण रत्तू यांच्यासह शहर समन्वयक निलेश लोकरे, गिरीश जोशी, सुनील मालगावे, संदीप तेरदाळे, विकास चव्हाण यासाठी सक्रिय आहेत. 

मराठा उद्योजक परिवार वाटणार 5 हजार कीट 
मराठा उद्योजक परिवाराने नॉन कोविड रुग्णांसाठी मास्क, नॅनो सॅनिटायझर मशीन, पल्स ऑक्‍सिमीटर, थर्मामीटर, स्टिमर, व्हेपरायझर, व्हीटॅमीन सी व झिंक अशा इम्युनिटी बुस्टर वस्तूंचे कीट नाममात्र दरात वाटण्याचे नियोजन केले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्यांना हे कीट अत्यंत फायदेशीर असल्याने सुमारे 5 हजार कीट वाटपाचे नियोजन केले आहे. संस्थापक संदीप पाटील, विजयसिंह चव्हाण, विठ्ठलदास पाटील, बाळमुकुंद पाटील, अभिजीत पाटील, मोहन खोत, अक्षय साळुंखे,अर्चना शिंदे, अनिकेत गुरव, कृष्णा जामदार यांच्यासह मान्यवरांच्या सहकार्यातून नॉन कोविड रुग्णांसाठी हा बुस्टर फायदेशीर ठरत आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Immunity booster" for non-covid, isolated patients; special insect facility in Sangali