शिवराय एका चित्रपटात मांडणे अशक्य ; चिन्मय मांडलेकर

चिन्मय मांडलेकर; मराठी प्रेक्षकांच्या प्रगल्भतेवर माझा विश्‍वास
चिन्मय मांडलेकर
चिन्मय मांडलेकरsakal

प्रश्‍न- गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने ऐतिहासिक विषयांवर लक्ष केंद्रीत केले आहे, याचे

कारण काय? श्री. मांडलेकर- भालजी पेंढारकर यांनी शिवकालावर तब्बल ११ चित्रपट केले होते. त्यानंतरच्या ४० वर्षांत शिवरायांवर चित्रपट आले नाहीत. मध्यंतरी ‘सर्जा’, ‘रमा-माधव’ असे चित्रपट आले. मात्र, ९० च्या दशकात विनोदी चित्रपटांची लाट आली आणि तोच ट्रेंड झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना वाटायचे, या विषयावर चित्रपट बनू शकतो. पुढे आम्हाला कळायला लागले, तेव्हा ‘टायटॅनिक’ आला होता. तेव्हा वाटले बुडालेले ते जहाज लोकांना कळू शकते, तर पावनखिंडीतील शौर्य का कळू नये? त्या विचारातून दिग्पाल लांजेकर यांनी शिवरायांवरील चित्रपटांवर काम सुरू केले. त्यापैकी ‘फर्जंद’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मग आमचे बळ वाढले. कोरोनानंतरच्या काळात ‘पावनखिंड’ला मिळालेले प्रेम अफाट आहे. यापुढील आमचा टप्पा ‘शेर शिवराज’ आहे. तो या चित्रपट मालिकेतील शिवरायांचा सर्वांत मोठा पराक्रम सांगणारा आहे. लोक याचे भरभरून स्वागत करतील.

प्रश्‍न- छत्रपती शिवराय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यांच्यावर चित्रपट काढताना थोडा ताण होता का?

श्री. मांडलेकर- खरं तर याचे उत्तर दिग्पाल छान देईल. मात्र, मी पहिल्या दिवसापासून या प्रक्रियेत त्याच्याबरोबर होतो. दिग्पाल इतिहासाचा गाढा अभ्यासक आहे. तो कुठल्या एका विचारधारेतून आलेला नाही. गड-किल्ल्यांचे अभ्यासक निनाद बेडेकर यांच्याबरोबर तो खूप गडांवर फिरला आहे. चित्रपट करण्याआधी त्याचा प्रचंड अभ्यास करणे, गावांत जाणे, वंशजांना भेटणे, कागदपत्रे पाहणे हे संशोधन करतोच. त्यामुळे त्याच्या सर्व चित्रपटांत इतिहास नेमस्तपणाने मांडला गेला आहे.

प्रश्‍न- छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायची आहे, हे पहिल्यांदा समजल्यावर काय भावना होत्या?

श्री. मांडलेकर- मी तेव्हा ‘तू माझा सांगाती’ मालिका करीत होतो. दिग्पालने मला ‘फर्जंद’ची पटकथा वाचायला दिली. मी थक्क झालो. चांगल्या निर्मात्यासाठी थांब, असे मी त्याला सांगितले. काही दिवसांनी चित्रपट करायचे नक्की झाल्यावर दिग्पालने मला या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका तू करशील का, असे विचारले. त्या वेळी माझ्याकडे शब्द नव्हते. डोळ्यांत पाणी होते. या राज्यात दिवसातून किमान एकदा तरी प्रत्येकाला शिवरायांची प्रतिमा, पुतळा दिसतोच. त्या प्रतिमेला माझ्याकडून तडा जाणार नाही, ही जबाबदारी मोठी आहे.

प्रश्‍न- एकीकडे शिवरायांची भूमिका आणि दुसरीकडे ‘काश्‍मीर फाईल्स’मध्ये अतिरेकी बिट्टा तुम्ही साकारलात. एवढ्या टोकाच्या भूमिका साकारताना प्रेक्षक ते स्वीकारतील का, अशी भीती वाटली नाही का?

श्री. मांडलेकर- माझ्या पत्नीने आधी हा प्रश्‍न मला विचारला होता. मी तेव्हाही तेच म्हणालो आणि आजही माझे तेच मत आहे, की माझा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या प्रगल्भतेवर खूप विश्‍वास आहे. दोन टोकाच्या भूमिका करायला मिळाल्या, हा महत्त्वाचा विषय आहे. हल्ली लोक कशावरही बायकॉट करतात. सोशल मीडिया पाहताना असे वाटते, की अरे, किती वाईट जग आहे. परंतु, जरा बाहेर फिरून येतो तेव्हा वाटतं, अरे हे जग वाईट नाहीय.

प्रश्‍न- दक्षिणात्य चित्रपटांच्या तुलनेत मराठी कमी पडतेय का?

श्री. मांडलेकर- आपलं मार्केट छोटं आहे. महाराष्ट्रभर चित्रपट प्रदर्शित झाला, असे आपण म्हणतो, तेव्हा तो मुंबई, पुणे, ठाणे, पश्‍चिम

महाराष्ट्रातच दिसतो. विदर्भात

खूप कमी शो होतात. तळकोकणात चित्रपटगृहेच नाहीत. चित्रपटासाठी पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत, त्यासाठी आपणास आणखी दहा वर्षे लागतील, असे वाटते.

प्रश्‍न- ‘शेर शिवराज’बद्दल

काय सांगाल?

श्री. मांडलेकर- शिवरायांवरील चित्रपटांच्या अष्टकातील हा चौथा चित्रपट आहे. अफजल खान वधाच्या घटनेवर आधारित तो आहे. त्याचा काही भाग प्रतापगडावरही चित्रीत झाला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा, असे मी आवाहन करतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अफाट होते. ते एका चित्रपटात मांडणे निव्वळ अशक्य आहे. तोच विचार करून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवरायांवरील चित्रपटांचे अष्टक म्हणजे आठ चित्रपटांची मालिका करण्याचे ठरविले आहे. त्यातील चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ भेटीला येतोय. या चित्रपटात मला शिवराय साकारता येतात, याहून मोठे भाग्य नाही, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘कॉफी वुईथ सकाळ’मध्ये त्यांनी संवाद साधला. सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी स्वागत केले. या वेळी ‘शेर शिवराज’मधील सहकलाकार विक्रम गायकवाड आणि अक्षय वाघमारे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com