सरकार स्थापनेनंतर 'या' इमारतीचे हाेणार उदघाटन ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

कऱ्हाड ः विधानसभा निवडणुकीसाठी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचा वापर करण्यात आला. प्रशस्त इमारतीतून दोन विधानसभा मतदारसंघाच्या कामाची सूत्रे तेथून हलवता येणे शक्‍य झाले. मात्र, निवडणुका संपल्याने आता या इमारतीला उद्‌घाटनाबरोबरच प्रशासकीय कार्यालये सुरू होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. प्रांत, तहसीलसह अन्य शासकीय कार्यालये या एकाच इमारतीत येणार असल्याने लोकांची मोठी सोय होणार आहे.
 

कऱ्हाड ः विधानसभा निवडणुकीसाठी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचा वापर करण्यात आला. प्रशस्त इमारतीतून दोन विधानसभा मतदारसंघाच्या कामाची सूत्रे तेथून हलवता येणे शक्‍य झाले. मात्र, निवडणुका संपल्याने आता या इमारतीला उद्‌घाटनाबरोबरच प्रशासकीय कार्यालये सुरू होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. प्रांत, तहसीलसह अन्य शासकीय कार्यालये या एकाच इमारतीत येणार असल्याने लोकांची मोठी सोय होणार आहे.
 
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासकीय इमारतीच्या कामाला मंजुरी देत निधी मंजूर केला. त्यानंतर 2014 मध्ये या इमारतीच्या कामाचे भूमिपूजनही श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन भाजप व शिवसेना युती सत्तेत आली. गेल्या काही दिवसांपासून इमारतीचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, निवडणुकीच्या धामधूमीमुळे त्याच्या उद्‌घाटनाकडे दुर्लक्ष झाल्याची स्थिती होती. वास्तविक इमारतीचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस झाले. मात्र, फर्निचर व इलेक्‍ट्रिकल कामाची निविदा विलंबाने निघाल्याने काम लांबले गेल्याची चर्चा आहे. त्यातूनही इमारतीचे काम पूर्णत्वास आले.

विधानसभा निवडणुकीचे कामकाज याच इमारतीतून करण्याची परवानगी घेत तेथून निवडणूक काम सुरू केले. त्यानुसार नव्याने होणाऱ्या प्रांत कार्यालयात कऱ्हाड दक्षिण विधानसभा व तहसील कार्यालयात कऱ्हाड उत्तरचे कामकाज चालले. त्यामुळे प्रांताधिकारी उत्तम दिघे हे कऱ्हाड दक्षिणचे निवडणूक अधिकारी असल्याने व तहसीलदार अमरदीप वाकडे कऱ्हाड उत्तरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असल्यामुळे उद्‌घाटनापूर्वीच दोघांनाही कक्षाचा ताबा घेण्याची संधी त्यानिमित्ताने मिळाली.

सध्या निवडणुकीचे कामकाज संपले असले, तरी पूर्वीप्रमाणे जुन्या ठिकाणीच प्रांत व तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. मात्र, निवडणूक काळात सुमारे महिनाभर या इमारतीत वावरलेल्या अधिकाऱ्यांनाही जुन्या ठिकाणी मन रमणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळेच पूर्णत्वास आलेल्या इमारतीचे उद्‌घाटन होऊन प्रत्यक्षात कामाला केव्हाचा मुहूर्त मिळणार याकडे शहरासह तालुक्‍याचे लक्ष लागून आहे. या इमारतीत केवळ प्रांत व तहसील कार्यालय न राहता तेथे अन्य शासकीय कार्यालयेही आहेत.

इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगची सुविधा असल्याने तालुक्‍यातील नागरिकांसाठी एकाच इमारतीत सर्व शासकीय कार्यालये सहजरीत्या उपलब्ध होणार आहेत. मात्र, या इमारतीच्या उद्‌घाटनासचा मुहूर्त केव्हा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सध्या सुरू असलेल्या सरकार स्थापनेच्या घोळानंतर या इमारतीच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. मात्र, तोपर्यंत काही कार्यालयांनी जुन्या कार्यालयातील सामानांची हलवाहलव सुरू करून ती नव्या कार्यालयात आणण्याचे काम सुरू झाल्याचेही समजते. त्यामुळे डिसेंबर पूर्वी की नव्या वर्षात नवीन इमारतीत शासकीय कार्यालयांचे स्थलांतर होणार याकडे तालुक्‍याचे लक्ष लागून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The inauguration of this building may be after the formation of the government ?