महागड्या औषध फवारण्यानंतरही प्रादुर्भाव कमी नाही

बाजीराव घोडे-पाटील 
Friday, 15 January 2021

शिराळा तालुक्‍यातील पश्‍चिम भागात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला असून शेतकऱ्यांनसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे.

कोकरूड : शिराळा तालुक्‍यातील पश्‍चिम भागात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला असून शेतकऱ्यांनसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. प्रामुख्याने मका पीक हे या भागातील प्रमुख पीक असून उसामध्ये अंतर पीक म्हणून शेतकरी वर्ग पसंती देतात. 

मात्र कधी धुके, कधी ढगाळ वातावरण या हवामानातील बदलत्या वातावरणामुळे पिकावरील होणाऱ्या अनेक रोगराईच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिकावर होणाऱ्या कीटकनाशके फवारणी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महागड्या औषधांच्या फवारण्या करूनही प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. 

मक्‍याच्या पणावरती पांढरट चट्टे, पाने कुरतडून व सुरळीवरती ही कीड घाला घालत आहे. प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वेगवेगळ्या किडींमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. साधारणपणे अडीच ते तीन फूट पिकाची वाढ झाल्यानंतर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत होता. मात्र, यंदा वीतभर वाढलेल्या मका पिकावरही अमेरिकन लष्करीअळीचा प्रादुर्भाव आहे. मुळाला हुमणी व शेंड्यावर अळी यामुळे कीटकनाशके वापरावरच खर्च होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. 
- तानाजी घोडे, शेतकरी, कोकरूड 

वातावरणातील बदलामुळे या अळीचा प्रादुर्भाव लवकर जाणवू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी "इममेक्‍टीन बेंझोएट' 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यात किंवा 5 टक्के लिंबोळीअर्क किंवा अझेडिरेक्‍टीन 1500 पीपीएम 5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून सूरळीमध्ये जाईल या पद्धतीने फवारणी करावी. किंवा कामगंध, प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. 
- जी. एस. पाटील, तालुका कृषी अधिकारी, शिराळा

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The incidence is not low even after spraying expensive drugs