महापालिका क्षेत्रात 18 रुग्णांची वाढ; चार नवे कंटेन्मेंट झोन

बलराज पवार
Tuesday, 14 July 2020

सांगली महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात एकूण 18 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर मिरजेतील दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

सांगली : महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात एकूण 18 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर मिरजेतील दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या 118 वर पोचली आहे. शहरात आज नव्याने चार कंटेन्मेंट झोन करण्यात आले. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये चार नवे रुग्ण आहेत. तर 12 रुग्ण कोरोनाबाधितांच्या संपर्कातील आहेत. 

महापालिका क्षेत्रात आजही रुग्ण संख्या वाढती राहिली. काल (रविवारी) अवघे दोन रुग्ण सापडल्याने संख्या कमी होईल असे वाटत असतानाच आज एकदम 18 रुग्ण आढळल्याने पुन्हा चिंतेत भर पडली. सांगली शहरात आज 12 रुग्ण सापडले. तर मिरजेत सहाजण आढळले. यापैकी मिरज येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. 

सांगलीत आज चांदणी चौकात एकूण पाचजणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहे. हे सर्वजण याआधी सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. एका डॉक्‍टरच्या संपर्कात आले होते. शिवाय ते एकाच कुटुंबातील आहेत. त्या बरोबरच कलानगरमध्येही आज चार जण एकाच कुटुंबातील कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. या कुटुंबातील एक युवती चीनमधून परतली आहे. त्यांनी याची माहिती लपवून ठेवली होती. मात्र या कुटुंबातील एका वृध्दाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. आज त्याच कुटुंबातील आणखी चौघेजण पॉझिटीव्ह आले. याचबरोबर संजयनगर येथील एक तृतीयपंथीसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. वानलेसवाडी परिसरातील दोघेजण कोरोनाबाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे सांगलीत एकूण 12 जण आज कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले. 

मिरजेतील पाटील गल्ली आणि सैनिक नगर येथील दोघे तर मिरज नदिवेस परिसरात राहणाऱ्या एका पतसंस्थेचा कर्मचारी सुद्धा पॉझिटिव्ह आला असून त्याचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच पार्श्‍वनाथ नगरमधील एका रुग्णाच्या संपर्कात आलेले चौघेजण पॉझिटीव्ह आले. त्यामुळे मिरजेत आज एकूण सहाजण कोरोनाबाधित झाले. आजचे वाढीव नवे रुग्ण चार असल्याने तेथे कंटेन्मेंट झोन करण्यात आले. आजअखेर मनपा क्षेत्रात 45 कंटेन्मेंट झोन सुरू आहेत. 

आयुक्त नितीन कापडणी, उपायुक्त स्मृती पाटील यांनी कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या परिसरात भेट देऊन पुढील खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase of 18 patients in the Sangali municipal area; Four new containment zones