आजारांची वाढली भीती!  आजार अंगावर काढण्याकडे कल

Increased fear of other diseases due to Corona
Increased fear of other diseases due to Corona

सांगली ः कोरोना साथीच्या भीतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोक आजार अंगावर काढत आहेत. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला आदी आजारांवर उपचार घेण्यास टाळाटाळ होत आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणा सध्या कोरोनाची तपासणी आणि उपाचारांत व्यस्त असल्याने साथीच्या अन्य आजारांकडे काहीसे दुर्लक्षच होत आहे. डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया आदी आजारांचे काही रुग्ण आढळले; मात्र ही साथ नाही. सहा महिन्यांत अन्य आजारांचे प्रमाणही कमी झालेय. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावागावांत दक्षता घेतली गेली. औषध फवारणी झाली. सक्तीने मास्क वापरला जात आहेत. प्रतिकार शक्ती वाढवणारा आहार घेत आहेत. त्याचा हा फायदा. आता हवामानातील अजब बदलांत काही ठिकाणी तापाचे रुग्ण आहेत. मात्र ती साथ नाही, असे जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले. 

प्रत्येक आजार कोरोना असत नाही
आजार कोणताही असो, घाबरायचे कारण नाही. लोकांनी आपली तत्काळ तपासणी करून घ्यावी. प्रत्येक आजार कोरोना असत नाही. अन्य आजार अंगावर काढणे कधीकधी जीवघेणे ठरू शकते. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आता सर्व सुविधांनी युक्त आहेत. पुरेसे मनुष्यबळ आहे. 
- डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा आरोग्याधिकारी 

साथ कुठेही नाही

कोरोना संकट काळात अन्य आजारांच्या रक्त तपासण्या कमी झाल्या आहेत. आम्ही नियमित लोकसंख्येच्या 10 टक्के तपासण्या करत असतो. त्या कमी झाल्या असल्या तरी साथ कुठेही नाही. लोकांना आजारी पडताच रुग्णालयात यावे, यासाठी आवाहन तर करतोच आहे. शिवाय कोरोनाशी संबंधित पथके नियमित घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. त्यामुळे साथीच्या आजारांकडे अजिबात दुर्लक्ष झालेले नाही. 
- डॉ. मिलिंद पोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी, सांगली 

खानापूर : अन्य आजारांवर नियंत्रण 
विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्‍यात सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाय योजनांमुळे कोरोना व्यतिरिक्त डेंगी, चिकनगुनियासारखे रोग वा आजार पसरले नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न प्रशासन, नगरपरिषद व आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहेत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पाटील म्हणाले, ""विटा शहरात कायमस्वरूपी स्वच्छता राखण्याचे काम नागरिकांच्या सहकार्याने सुरू आहे. डेंगी, चिकनगुनियासारखे रोग व आजार पसरण्याची शक्‍यता कमी आहे. कंटेनर सर्वेक्षण सुरू आहे. डबकी किंवा उघड्यावरच्या पाण्यात ऑईल टाकून डास होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. स्वच्छता विषयक जागृतीही केली जात आहे. कोरोना नियंत्रणासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्या तरी अन्य साथीचे आजार होऊ नयेत म्हणूनही काळजी घेतली जात आहे. डेंगी किंवा चिकनगुनियासारख्या आजाराला सामोरे जावे लागू नये म्हणून आवश्‍यक उपाययोजना केल्या जात आहेत.'' 
खानापूर तालुक्‍यात कोरोना व्यतिरिक्त अन्य रोग वा आजारांचे रुग्ण सध्या आढळत नाहीत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे यांनी सांगितले. 

कवठेमहांकाळ : प्रतिबंधात्मक उपाययोजना 
कवठेमहांकाळ : दिवसेंदिवस शहरासह तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत असताना, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन योग्य उपाययोजना राबवत आहे. तालुक्‍याचे केंद्र असलेल्या कवठेमहांकाळ शहरात डेंगी, मलेरिया, चिकनगुनियाच्या प्रसारास प्रतिबंध घालत सर्वच प्रभागातून जंतुनाशक फवारणीचे नियोजन झाले. लोकसंख्या वाढ, शहराच्या विस्तारामुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. 
शहरात सतरा प्रभाग आहेत. सर्वच प्रभागात डेंगी, मलेरिया, चिकनगुनियाची साथ कमी-जास्त प्रमाणात असली तरी ती आटोक्‍यात राहण्यासाठी नगरपंचायतीने जंतुनाशक फवारणी केली आहे. कोरोना बाधितांची संख्या शहरात जास्त असल्याने संसर्ग रोखण्यासाठी नगरपंचायतीने कंबर कसली आहे. नागरिकही खबरदारी घेत आहेत. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच ठिकाणी नगरपंचायत साथरोगाचा प्रतिबंध करण्यास झटत आहे, असे आरोग्य व स्वच्छता समिती सभापती अय्याज मुल्ला यांनी सांगितले. 

शिराळा : साथींचा फैलाव नाहीच 
शिराळा : शिराळा तालुक्‍यात कोरोना शिवाय इतर साथीचे रुग्ण किरकोळ स्वरूपात आहेत. आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्व्हे सुरू आहे. वेळीच योग्य ती उपाययोजना केली जात असल्याने इतर साथीच्या आजाराचा फैलाव रोखण्यास मदत झाली आहे. 
आठवड्यातून एक वेळ कोरडा दिवस पाळला जावा, याबाबत घरोघरी प्रबोधन सुरू आहे. ग्रामपंचायत व नगरपंचायतीमार्फत औषध फवारणी सुरू आहे. आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्व्हे सुरू आहे. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच डेंगीचे रुग्ण आढळून येत आहे. वेळीच उपचार करण्यास मदत होत आहे. आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेतल्याने डेंगीच्या साथीत फैलाव झाला नाही. शिराळा तालुक्‍यात कोरोना रुग्णाच्या संख्येत या चार दिवसात घट होऊ लागली आहे. लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळू लागलाय. 

पलूस : आरोग्य विभागाचे सतर्क 
पलूस : तालुक्‍यात कोरोना व्यतिरिक्त सध्या तरी इतर आजाराची कोणतीही साथ नाही. तरीही आरोग्य विभाग सतर्कतेने काम करीत आहे, असे पलूस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार यांनी दिली. पलूस तालुक्‍यातील सर्व गावांसह नगरपालिका हद्दीत सहा-सात महिन्यांपासून कोरोना पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य विभाग, नगरपालिका, ग्रामपंचायतींनी स्वच्छतेची काळजी घेतली आहे. स्वच्छ पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यात आले. प्रशासन, स्वयंसेवी संस्थांनी गावांत औषध फवारणी केली. इतर साथींचा तालुक्‍यात प्रभाव दिसला नाही. नागरिकही आरोग्याबाबत चांगलेच सतर्क झाले. आरोग्याबाबत योग्य ती दक्षता घेत आहेत. सर्दी, ताप, खोकला या नेहमीच्या आजाराचा थोडा जरी संसर्ग झालेला असला तरी, स्थानिक डॉक्‍टर व मेडिकलमधून औषध घेत आहेत. घरगुती, आयुर्वेदिक उपायोजना नागरिक करीत आहेत. सध्या तरी पलूस तालुक्‍यात कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराची साथ कुठेही दिसून येत नाही. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात इतर साथीचे आजार आढळलेत. 

आटपाडी : गावागावांत औषध फवारणी 
आटपाडी ः कोरोना बाधितांची संख्या 1800 वर पोचली असली तरी पावसाळी वातावरण असतानाही आटपाडी तालुक्‍यात मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया आणि इतर साथीचे आजार अजूप तरी पसरलेले नाहीत. अनेक गावात ग्रामपंचायतींनी कोरोना पार्श्वभूमीवर औषध, धूर फवारणी झाली आहे. आटपाडी तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या अठराशेवर पोहोचली आहे. त्यावर उपचार आणि उपाययोजनेसाठी ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रे दिवसरात्र राबत आहे. या वर्षी तालुक्‍यात सरासरी 750 मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली. बहुतांश ओढे वाहू लागले. पिण्याच्या पाण्यात बदल झाला. दीड महिन्यापूर्वी काही गावात सर्दी, पडसे, ताप आणि कणकणीचे रुग्ण आढळले होते. काही गावात प्रमाण जास्तही होते. त्यावर नियंत्रण मिळाले आहे. आरोग्य विभागाच्या धोरणांमुळे लोकांत जागृती वाढली. अनेक जण पिण्याच्या पाण्याबाबत दक्षता आहेत. एकत्र येण्याचे प्रमाणही कमी झाल्याने साथ रोगांवर नियंत्रण आले. रुग्ण आढळल्यास उपाय योजनांसाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. 

वाळवा : साथीच्या आजारांवर नियंत्रण 
इस्लामपूर : वाळवा तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. अन्य साथीचे आजारदेखील नियंत्रणात आलेत. कोरोना संसर्गाविरोधात यंत्रणा राबवताना अन्य आजारांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा वाळवा तालुका आरोग्य विभागाने केला आहे. कोरोनाचा हाहाकार सुरू असताना अन्य साथींनीदेखील डोके वर काढले. मात्र वाळवा तालुक्‍यातील ही संख्या आटोक्‍यात राहिली. न्यूमोनिया आणि कोरोनाने लोकांत भीती निर्माण केली. काही प्रमाणात डेंगी आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळले. पेठ, महादेववाडी, वाळवा, नेर्ले, कासेगाव, कामेरी या भागात डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढली होती. नियमित सर्वेक्षण सुरूच राहिल्याने आणि योग्य वेळी उपचार शक्‍य झाल्याने आजार नियंत्रण ठेवल्याचा दावा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी केला. दरम्यान, जून-जुलै महिन्यात डेंगीचे रुग्ण वाढले होते. जूनमध्ये डेंगीचे 40 तर जुलैमध्ये 79 रुग्ण होते. ऑगस्टमध्ये ते 66 झाले. सप्टेंबरमध्ये नोंद अवघी 7 आहे. इस्लामपूर नगरपालिकेकडून नियमित औषध फवारणी सुरूच असल्याचे अधिकारी श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. 

ताज्या नोंदीच नाहीत 
इस्लामपूरसारख्या एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरात खरेतर रोजच्या रोज कोणत्याही आजाराशी संबंधित रुग्णांच्या नोंदी होणे आवश्‍यक आहे. प्रत्यक्षात शहरातील खासगी रुग्णालयाकडून वेळेत अशा नोंदी कळवल्या जात नाहीत, अशी खंत पालिकेच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. ग्रामीण भागातून असंख्य रुग्ण येतात. त्यांच्या नोंदींची सवय रुग्णालयांना लावणे गरजेचे आहे. 

तासगाव : डॉक्‍टर, रुग्णांचे आजारांकडे दुर्लक्ष 
तासगाव : गेली चार पाच महिने डेंगी, व्हायरल फिवर, चिकनगुण्याचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनामुळे डॉक्‍टर, रुग्णांचेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनामुळे दुखणे टाळण्याकडे रुग्णांचा कल आहे, अशा प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. तासगाव शहर आणि तालुक्‍यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना दुसरीकडे डेंगी आणि व्हायरल फिवर सारख्या आजाराचे रूग्ण वाढत आहेत. दवाखान्यात उपचारासाठी येणारे बहुतांश रुग्ण अशा प्रकारचे असल्याचे चित्र आहे. व्हायरल फिवरमुळे कुटुंबेच्या कुटुंबे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. गल्लीबोळात चिकनगुण्याच्या तापाने चार दोन रुग्ण आजारी असल्याचे दिसते. डेंगी कोरोनापेक्षा धोकादायक असूनही डेंगी प्रतिबंधात्मक उपाय होताना दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्येक दवाखान्यात आठवड्याला सरासरी दोन रुग्ण डेंगी सदृश तापाचे सापडताहेत. दुसरीकडे दुखणे अंगावर काढण्याकडे रुग्णांचा कल वाढला आहे. किरकोळ ताप आला, जर कोरोना निघाला तर काय करायचे या भीतीने रुग्ण दवाखान्यात येण्याचे टाळत आहेत, अशी प्रतिक्रिया डॉ. विनय परदेशी यांनी व्यक्त केली. 

जत : साथींचा फैलाव कमी 
जत : गेल्या दोन महिन्यांत कोरोना रुग्णांसह डेंगी, चिकनगुनिया व मलेरिया या साथीने तोंड वर काढले होते. सर्दी, ताप, जुलाब अशा अनेक समस्या नागरिकांत होत्या. मात्र, आजच्या स्थितीला जत तालुक्‍यात डेंगी, चिकनगुनियाचे दहापेक्षा कमी रुग्ण सापडलेत. गेल्यावर्षी ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत 200 ते 300 हून अधिक जणांना चिकनगुनिया, डेंगीची लागण झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत आजच्या घडीला कोणत्याही साथीचा फैलाव झालेला नाही. दरम्यान, जत तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे. त्यासोबत कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्याही घटली आहे. तालुक्‍यात दरवर्षी प्रमाणे पावासाचे प्रमाण कमी होत असताना चिकनगुनियाचे, डेंगी व मलेरियाने पीडित रुग्ण आढळून येतात. यंदा साथीचा प्रादुर्भाव म्हणावा असा दिसत नाही. तालुक्‍यात सध्याच्या घडीला दहा-वीसपेक्षाही कमी रुग्ण दिसून आलेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर यांनी दिली. 

कडेगाव : मोहिते वडगावला डेंगीचा एक रुग्ण 
कडेगाव : तालुक्‍यात कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाच मोहिते वडगाव येथे डेंगीचा एक रुग्ण आढळला आहे. तालुक्‍यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दोन हजार 258 वर पोहोचला आहे. तालुक्‍यात सध्या परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या रेकॉर्डवर जरी चिकनगुनियाचे रुग्ण नसले तरी खासगी हॉस्पिटलमध्ये असा त्रास असलेले रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंत्रणा दक्ष असली तरी इतर आजारांकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याची स्थिती आहे. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी घेतलेली काळजी अन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी मदतगार ठरली आहे. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com