मुलांत वाढला चिडचिडेपणा, राग व अतिसंताप...कशामुळे?....सविस्तर वाचा 

angry children.jpg
angry children.jpg

इस्लामपूर(सांगली)- मागील वर्षी जिल्ह्यात आलेला महापूर, लॉकडाऊन व कोरोनाची अनिश्‍चित परिस्थिती त्याचा सर्वाधिक मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट झालेय. "शुश्रुषा' सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेच्या मानसतज्ज्ञांनी जिल्ह्यातील 15 वर्षांपर्यंतच्या 8 हजार 892 मुला-मुलींचा मानसशास्त्रीय अभ्यास व सर्वेक्षण केले. तीव्र स्वरूपाच्या मानसिक, भावनिक, वर्तणुक, शैक्षणिक समस्या असणाऱ्या मुलांतील विविध मानसिक व मनोसामाजिक लक्षणांचा शोध घेतला. त्यात 85 टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा, 57 टक्के राग व अती संताप, 52 टक्के मुलांमध्ये भुकेच्या तक्रारी तर 51 टक्के मुलांत सर्वाधिक अतीचंचलतेचे प्रमाण वाढल्याचे दिसून आल्याची माहिती "शुश्रुषा' चे अध्यक्ष मानसतज्ज्ञ कालिदास पाटील यांनी दिली. 


श्री. पाटील म्हणाले,""आजच्या समाजातील अनिश्‍चिततेचा कुटुंबातील सर्व घटकांप्रमाणे मुलांच्या वर्तनावरही विपरीत परिणाम झाला. सर्वेक्षणात चिकित्सालयीन, शालेय, बाल मानसशास्त्रतज्ञ अशा तज्ञ व प्रशिक्षित 25 मानसतज्ज्ञांनी भाग घेतला.'' 
सहभागी क्रांती गोंधळी, अभिजित वाटेगावकर, अक्षय साळुंखे, शैलजा पाटील, जस्मिन मुल्ला, तेजस्विनी साळुंखे, तेजस्विनी पाटील, रब्बना आंबेकरी, पूनम पाटील, आश्विनी पाटील, ज्योती महाडिक, रोहित पाटोळे, संदीप जाधव, ईशा शहा यांनी 9 हजार 85 कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पालक व मुलांशी संवाद साधला. मुलांत अकारण भीती, वारंवार रडणे, कमी झोप, मुलांत न मिसळणे, अंथरूण ओले करणे, अंगठा चोखणे, नखे खाणे, बोलताना अडखळणे, हातपाय थरथरणे, अकारण डोके व पोटदुखी अशा भावनिक, मनोशारीरिक तक्रारींबरोबर चिडचिडेपणा, अतीचंचलता, राग व अतीसंताप, एकाग्रतेचा अभाव व लक्षात न राहण्याच्या सर्वाधिक जास्त समस्या दिसून आल्या. मुलांतील या भावनिक, वर्तणूक व मनोसामाजिक समस्यांचे योग्य वेळी शास्त्रीय निराकरण न झाल्यास त्यांच्या मानसिकतेबरोबरच शिक्षण, आरोग्य व समाज वर्तनावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता ज्येष्ठ मानसतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

श्री. पाटील म्हणाले,"" "शुश्रुषा' या बाबतचा अहवाल लवकरच महाराष्ट्र शासनाला सादर करणार आहे. सून भक्कम उपायासाठी शास्त्रीय प्रकल्प हाती घेणार आहे. सध्या मुलं व पालकांना मानसिक आधार देण्यासाठी जिल्हाधकारी व जिल्हा शल्य चिकत्सक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली 24 तास मोफत हेल्पलाईन कार्यरत आहे.'' 

""मुलांच्या विकासात मानसिक आरोग्याला सर्वाधिक महत्त्व आहे,पालकांनी मुलांच्या वर्तन व भावनिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. अंधश्रध्देच्या आहारी न जाता योग्य वेळी मानसतज्ञाची मदत घ्यावी.'' 

-डॉ. भास्कर शेजवळ, 
मानसशास्त्र विभाग प्रमुख, 
सावित्रबाई फुले विद्यापीठ पुणे. 

""मुलं वरकरणी हसून खेळून वागत असली तरी त्यांच्या मनावर काय परिणाम झाला आहे हे शारीरिक अस्वस्थतेतून दिसून येत असतं. आपत्तींमुळे भीती, असुरक्षितता, अगतिकता अशा भावना मनात निर्माण होतात.या भावना मुलं शब्दातून, बोलण्यातून व्यक्त करतीलच असं नाही.या भावना विविध शारीरिक कृतीतून व्यक्त होतो. मुलांच्या मानसिकतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.'' 

-डॉ. श्रुती पानसे, लेखिका व मानसतज्ञ 

""शिक्षण व्यवस्थेत मुलांच्या मानसिक व भावनिक विकासाला अधिक महत्व द्यायला हवे. ऑनलाईन शिक्षणातून मुलांच्या डोक्‍यात केवळ माहितीचा साठा वाढवू नये. कुटुंब व शाळेत मुलांचे भावनिक विश्व जपल्यास समाजातील आत्महत्या, निराशा व गुन्हेगारी कमी होईल.'' 

-डॉ. संदीप सिसोदे, 
अध्यक्ष, राज्य मानसतज्ञ, असोसिएशन 


 

संपादन : घनशाम नवाथे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com