' सायबर क्राइम ' चे लोण दारापर्यंत ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून नागरिकांत जागृती करण्यात येत आहे. समाज माध्यमांचा वापर करताना नागरिकांनी गांभीर्यपूर्वक करावा. 
- उमेश हजारे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, सातारा. 

सातारा : फेसबुक, इन्स्टाग्राम व अन्य सोशल मीडियाचा वापर करून लग्नाचे आमिष दाखवणे, वाढलेल्या ओळखीचा फायदा घेऊन विनयभंग करणे, लोकेशन ट्रेस झाल्याने घरांत चोरी करणे, पैशाची आवश्‍यकता पाहून कर्ज देण्याची फसवणूक अशा प्रकारच्या गुन्ह्यांची जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांत नोंद झालेली आहे. त्यामुळे "सायबर क्राइम'चे लोण आपल्या दारापर्यंत येऊन ठेपल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना नागरिकांनी दक्षता घेणे अत्यंत आवश्‍यक बनले आहे. 

फेसबुक व इन्स्टाग्रामबाबतीत दक्षता 

अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या मैत्रीच्या विनंतीस मान्यता देऊ नका. चॅटिंग करू नका. आपल्या फेसबुक अकाउंटमधील अकाउंट प्रायव्हसी चेक करून त्यामध्ये योग्य व आवश्‍यक ते बदल करा. आपली वैयक्तिक, कौटुंबिक माहिती, फोटो प्रसारित करू नका. फेसबुकद्वारे तुमचे सध्याचे लोकेशन कोठे आहे, याबाबत माहिती प्रसारित करू नका, कारण आपण प्रसारित केलेल्या माहितीवरून अनेक वेळा आपल्या अनुपस्थितीत आपल्या घरात चोरी, घरफोडीसारखे प्रकार घडू शकतात. फेसबुक व इन्स्टाग्रामवर गरजेशिवाय स्वत:च्या संपर्क माध्यमांची माहिती पोस्ट करू नका. तुमच्या अकाउंटचा पासवर्ड इतर कोणाबरोबरही शेअर करू नका. 

व्हॉटस्‌ऍप वापरताना हे करा 

व्हॉटस्‌ऍपच्या वापरातूनही आपल्या माहितीचा गैरफायदा घेण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे व्हॉटस्‌ऍपवर अपलोड केलेले फोटो फक्त आपल्या संपर्कात असलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त इतरांना अवरोधित करा. स्टेटस टाकताना वैयक्तिक माहिती, लोकेशन टाकण्याचे शक्‍यतो टाळा. 

क्रेडिट - डेबिट कार्डची माहिती सांगू नका 

आपल्या कार्डचा 16 अंकी सीव्हीव्ही नंबर, नंबर, कार्ड वैधता नंबर किंवा पिनबद्दलची माहिती इंटरनेट किंवा टेलिफोनवर कोणत्याही व्यक्तीला देऊ नका. जर समोरील व्यक्ती ही बॅंकेच्या नावासहित सर्व माहिती सांगून बॅंक अधिकारी, कर्मचारी असे भासवून आपल्या कार्डसंबंधी माहिती विचारत असला, तरी माहिती देऊ नका. कोणतीही बॅंक फोनवरून अशी माहिती मागत नाही. 

मोबाईल वापरताना ही दक्षता घ्याच 

तुमच्या मोबाईला नेहमीच पासवर्ड ठेवा. मोबाईलमध्ये कमीतकमी एप्लिकेशन्सचा वापर करा. खरेदी पावती असल्याशिवाय जुने फोन विकत घेऊ नका. आपल्या मोबाईलच्या हॉटस्पॉट, वायफायला पासवर्ड ठेवा. महत्त्वाची कागदपत्रे मोबाईलमध्ये फोटो स्वरूपात ठेवू नका. मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास तात्काळ पोलिस ठाण्यात कळवा, तसेच त्यातील सिमकार्ड बंद करा. 

ऑनलाइन खरेदीत घ्या काळजी 

ऑनलाइन खरेदी करताना खरेदी करावयाचे संकेतस्थळ खरे असल्याची खात्री करा. खरेदी करताना आपल्या कार्डची माहिती देऊ नका. खरेदी करताना शक्‍यतो कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडा, तसेच तुम्हाला लॉटरी लागलेली आहे किंवा लकी विजेते ठरला आहात अशा व्हॉटस्‌ऍप मेसेजवर, तसेच एसएमएसवर विश्वास ठेवू नका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased in number of cyber crime these days