Video : तिरंगी रंगला पांडुरंग; विठ्ठलाच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट

अभय जोशी 
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

आम्ही पुण्यातून २५ कार्यकर्ते आणि ८ कारागिरांनी पंढरपूरला जाऊन अगोदरच्या दिवशी दिवसभर ही सजावट केली. यासाठी एस्टर, झेंडू आदी टनभर फुले लागली. २६ जानेवारी, माघ एकादशी, एक मे या दिवशीही आम्ही अशी सजावट केली आहे.
- सचिन चव्हाण, अध्यक्ष, श्रीमंत मोरया प्रतिष्ठान, पुणे.

पंढरपूर : सर्वसामान्य भक्तांच्या सुखदुःखात रंगणारा महाराष्ट्राचा लोकदेव पंढरीचा पांडुरंग आज देशभक्तीच्या तिरंगी रंगात रंगला. सावळ्या विठुरायाच्या गाभाऱ्यात आज पुण्याच्या मोरया प्रतिष्ठानतर्फे तिरंगी फुलांची आकर्षक आरास साकारण्यात आली. 

गेल्या काही दिवसांपासून विविध सण आणि उत्सवांच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात अशी सुंदर फळाफुलांची सजावट करण्यात येत आहे.

आंब्याच्या सीझनमध्ये तब्बल ११ हजार हापूस आंबे तर, डाळिंबाच्या सीझनमध्ये शेकडो डाळिंबानी वैशिष्ट्यपूर्ण आरास करण्यात आली. हापूस आंब्याच्या आराशीच्या दिवशी मंदिरात हापूस आंब्याचा सुवास दरवळत होता. फळाफुलांनी आकर्षक सजावट केली की, लाडक्या राजस सुकुमाराचे रूप आणखीनच उठून दिसते.

वर्षातील प्रमुख सणांच्या या दिवशी विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला वेगवेगळे पारंपारिक पोशाख करून सोन्याचे अलंकार घालण्याची प्रथा आहे. गेल्या १५-२० वर्षांपासून आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि आषाढी, कार्तिकी यात्रा झाल्यावर प्रक्षाळ पूजेच्या दिवशी फुलांची सजावट एवढ्यापुरतीच मंदिरातील सजावटीचा भाग मर्यादित होता.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी गेल्या दोन वर्षांत सातत्याने फळाफुलांची नाविन्यपूर्ण आकर्षक सजावट करण्यास जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले. बहुतांश वेळा वेगवेगळ्या भाविकांकडूनच अशा प्रकारची सजावट केली जात असल्याने मंदिर समितीवर खर्चाचा भार पडत नाही. 

पुण्यातील फुल विक्रेते वर्षानुवर्षे आषाढी आणि कार्तिकी प्रक्षाळ पूजेच्या दिवशी विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा सजवतात. मंदिर समितीच्या सहकार्यामुळे मागील दोन वर्षापासून पुण्यातील भुजबळ कुटुंबियांकडून आषाढी एकादशी दिवशी देखील फुलांची सुरेख सजावट केली जात आहे.

यंदा आषाढी एकादशी दिवशी गुलछडी ,लीलेनियम ऑर्चिड, अंथेरियम अशा अनेक प्रकारच्या सुमारे अडीच ते तीन टन फुलांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला. त्यामुळे मंदिरातील वातावरण बहरून गेले होते.

आंब्याच्या सीझनमध्ये तब्बल ११ हजार हापूस आंब्यांनी विठुरायाचा गाभारा सजविण्यात आला होता . डाळिंबाच्या सीझनमध्ये शेकडो डाळिंबाची आरास करण्यात आली होती.
श्री राम नवमी दिवशी मंदिरात विड्याच्या पानांची आरास करण्यात आली तेव्हा आणि एके दिवशी तुळशीच्या पानांनी मंदिर सजवण्यात आले होते. रंगीबेरंगी फळा फुलांतील विठुरायाचे साजिरे रूप पाहणे हादेखील वेगळाच अनुभव ठरत आहे. विठुरायाचे हे अनोखे रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची साहजिकच गर्दी होत आहे.

आम्ही पुण्यातून २५ कार्यकर्ते आणि ८ कारागिरांनी पंढरपूरला जाऊन अगोदरच्या दिवशी दिवसभर ही सजावट केली. यासाठी एस्टर, झेंडू आदी टनभर फुले लागली. २६ जानेवारी, माघ एकादशी, एक मे या दिवशीही आम्ही अशी सजावट केली आहे.
- सचिन चव्हाण, अध्यक्ष, श्रीमंत मोरया प्रतिष्ठान, पुणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: independence celebration in Pandharpur Vitthal Mandir