
सांगलीची स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्णपाने : क्रांतिकारकांनी लुटला धुळ्याचा खजिना
- ॲड. के. डी. शिंदे
शिवछत्रपतींनी स्वराज्यासाठी सुरतेचा खजिना लुटला. मराठ्यांनी परप्रांतात जाऊन गाजवलेल्या अनेक मोहिमा-शौर्यकथा इतिहासात आपण वाचतो. असाच पराक्रम सांगलीच्या क्रांतिकारकांनी सहाशे किलोमीटरवर जाऊन धुळ्याच्या खजिना लुटीत केला होता. १३ एप्रिल, १९४४ रोजी ५ लाख ५१ हजार रुपये घेऊन जाणारी इंग्रजांची ट्राम प्रवासी गाडी लुटण्यात आली. प्रतिसरकारच्या क्रांतिकारकांचा हा पराक्रम एखाद्या चित्रपटकथेइतकाच थरारक आहे. त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत क्रांतिस्मारक उभे आहे.
जी. डी. बापू व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुंडल बँक, बिचुद व शेणोली पे स्पेशल ट्रेन लुटल्यानंतर धुळे खजिना लुटीचा बेत आखला. आटपाडीत चरखा संघाचे काम करणारे गांधीवादी नेते धडकू तानाजी ठाकरे यांनी ते सुचवले. तिथे कमी धोका होता, म्हणून क्रांतिसिंहांच्या संमतीने १९४४ च्या मार्च-एप्रिलमध्ये हा बेत ठरला. बापू आणि त्यांचे सहकारी गेले. धुळ्यातील मराठा बोर्डिंगचे व्यवस्थापक व्यंकटराव पाटील यांनी तिथे आसरा दिला.
स्थनिक क्रांतिकारक विष्णू पाटील, उत्तम गिरीधर पाटील, फकीर आप्पा देवरे, रामचंद्र पाटील यांच्याशी बापू, नागनाथअण्णा आणि साताऱ्याहून आलेले रामचंद्र ऊर्फ आप्पासाहेब पाटील-वाळवेकर, कुपवाडचे धोंडिराम माळी, तुकाराम माळी, कुंडलचे आप्पा चंद्रा लाड, अण्णा चंदू एडके, दह्यारीचे ज्ञानोबा जाधव, रामचंद्र पाटील, पुणदीचे किसन पाटील, कवठे एकंदचे निवृत्ती कळके यांची चर्चा झाली. चर्चेत सारा मागमूस काढण्यात आला. सूक्ष्म निरीक्षण करून खजिन्यासह माहिती काढण्यात आली. स्थानिक उत्तमराव पाटील, शंकरराव माळी, ओमकार बापू दिवाण, केशव वाणी, नानासाहेब ढेरे, व्यंकटराव धोबी, चंद्रकांत देवरे, भाऊराव पाटील, धडकू ठाकरे यांनी पूर्ण सहकार्य केले.
आदल्या दिवशी रात्री दहापर्यंत सर्वांनी धुळ्याच्या फुले भवनाजवळील विद्यार्थी वसतिगृहात जमावे, असा सर्वांना निरोप होता. बैलगाडी, टांगा, टॅक्सी अशा जमेल त्या वाहनाने क्रांतिकारक धुळ्याच्या दिशेने येत होते. मांजरा नदीचा पूल ओलांडल्यानंतर पोलिसांनी एका बैलगाडीला रोखले. संशय वाटल्याने त्याने शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न केला. त्यालाच चोप देत सुटका करवून घेत सर्वजण चिमठाणा रेल्वे स्टेशनवर पोचले. तिथे ठरल्याप्रमाणे दोन गट करून सारे पांगले.
खजिन्याची गाडी जवळ आल्यानंतर दोघांनी एकमेकांशी भांडत-भांडत गाडीच्या आडवे यायचे आणि मारामारी करत खाली पडायचे, म्हणजे गाडीचा वेग कमी होईल. लगेच गाडीतल्या लोकांनी पोलिसांना मिठ्या मारून त्यांच्या बंदुका हिसकावून घेऊन खाली फेकायच्या. चालकावर पिस्तूल रोखायचे, तर दुसऱ्याने गाडीतील खजिन्याच्या पेट्या फेकून द्यायच्या. खाली असलेल्यांनी त्या पेट्या फोडून लूट करायची, असा सारा बेत होता.
ठरल्याप्रमाणे सारे गाडीची वाट पाहू लागले, मात्र गाडी येईना. दोन-तीन गाड्या आल्या. ठरल्याप्रमाणे बापू-अण्णांचे मारमारीचे नाटक झाले. मात्र गाडीत आपली मंडळी नाहीत, म्हटल्यावर सारे निराश व्हायचे. वेळ होत गेली तशी धाकधूक वाढली. बऱ्याच वेळाने एक गाडी दिसली आणि पुन्हा नाटकी भांडण सुरू झाले. अगदी पायताण हातात घेऊन मारामारी सुरू झाली. मात्र गाडी जवळ आली वेग कमी होत नाही, म्हटल्यावर झटकन् दोघे बाजूला झाले.
गाडी तशीच पुढे निघून जाणार इतक्यात अण्णांनी धावत्या गाडीत चढत चालकावर गोळ्या झाडल्या. गोळीबार होताच गाडी थांबली. पाठोपाठ गाडीतल्या क्रांतिकारकांनी खजिन्याच्या पेट्या खाली फेकल्या. रावसाहेब कळकेंनी गाडीतल्या टॉमीने त्या पेट्या फोडल्या. खजिना वेगवेगळ्या धोतरात बांधला. ‘शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत जंगलवाटांमधून पसार झाले. उन्हाळ्याचे दिवस होते. बंदुका आणि खजिन्याची गाठोडी वाहून सारे घामेघूम झाले होते. एका विहिरीजवळ हातपाय धुऊन पाणी पिऊन पुढे निघणार, तोच बंदूकधारी पोलिस आले. त्यांच्याशी सामना करीत आगेकूच सुरू होती. एव्हाना पोलिसांनी दीड-दोनशे गावकऱ्यांसह पाठलाग सुरू केला.
पोलिसांच्या या गोळीबारात एक गोळी बापूंच्या पिंढरीतून आरपार गेली. जखमी अवस्थेत ते रात्रभर चालतच राहिले. एका गावात पहाटेला शौचाला जाणारा एक खादीधारी दिसला. अण्णांनी त्याच्याशी थेट ओळख काढली. ते शिक्षक होते आणि गांधीवादी होते. त्यांनी सर्वांना घरी नेले. खाण्याची, आंघोळीची सोय केली आणि त्या अवस्थेत सारे मजल-दरमजल करीत कुंडलला पोचले. धुळे खजिना लुटीने प्रतिसरकारचा देशभर दरारा निर्माण झाला. एक ‘सुवर्णपान’ लिहिले गेले..!