VIDEO : सांगलीतील या परिसरातील कंटेन्मेंट झोन उध्वस्त ; का झाले नागरिक संतप्त...?

शैलेश पेठकर
Saturday, 25 July 2020

कंटेन्मेंट झोनवरून या परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी कंटेन्मेंट झोनचे पत्रे उखडून टाकून आपला संताप व्यक्त केला.

सांगली - इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 25 रुग्ण सापडल्याने त्याठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आला होता. तो कंटेन्मेंट झोन मोठा असल्याने आणि नागरिकांना विश्‍वासात घेवून न केल्याने रात्रीत उध्वस्त करण्यात आला. तेथील पत्रे काढून टाकत नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावण निर्माण झाले. तेथे तातडीने पोलिसांचा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला. 

आयुक्त नितीन कापडणीस, पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी तत्काळ परिसरात भेट दिली. भयभीत झालेल्या इंदिरानगरवासीयांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी अन्य नागरिकांच्या रॅपिड टेस्ट सोमवारपासून करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच कंटेन्मेंट झोन लहान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दरम्यान, तणावाचे वातावरण असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे. 

व्हिडीओ पाहा...

कंटेन्मेंट झोनवरून या परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी कंटेन्मेंट झोनचे पत्रे उखडून टाकून आपला संताप व्यक्त केला. हा प्रकार समजताच तत्काळ विश्रामबाग पोलिस तेथे दाखल झाले. यानंतर सकाळी पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर, सहायक आयुक्त सावता खरात, पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी इंदिरानगरमध्ये फिरून सुधारित कंटेन्मेंट झोनचे नियोजन करीत ज्या भागात किंवा गल्लीत रुग्ण सापडला आहे, तेथेच कंटेन्मेंट झोन करण्याबाबत सूचित केले. यावेळी स्थानिक नगरसेवक बाळासाहेब सावंत आणि अभिजित भोसले उपस्थित होते. त्यांनी नागरिकांची समजूत काढत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

वाचा - कारखान्यामध्ये कोरोना रुग्ण सापडल्यास काय करावे...?

आयुक्त नितीन कापडणीस यांनीही दुपारी इंदिरानगर परिसराला भेट दिली. यावेळी आयुक्त कापडणीस यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करीत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रॅपिड टेस्ट आपल्या आणि आपल्या परिवारास महत्वाचे असल्याचे सांगितले. तसेच महापालिकेच्या टीमकडून केल्या जाणाऱ्या रॅपिड अँटिजेन टेस्टला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. यावेळी स्थानिक नागरिकांनी सोमवारपासून टेस्ट घेण्यास काही हरकत नाही अशी ग्वाही दिली.

रोग पसरण्यापासून रोखण्यास मदत करावी

वैद्यकीय पथकाच्या दोन टीमकडून इंदिरानगरच्या कंटेन्मेंट झोनमधील 50 वर्षावरील नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि याचबरोबर आर्टिपीसीआर टेस्टसुद्धा केल्या जाणार आहेत. याचबरोबर कोणीही नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आपली माहिती आमच्या वैद्यकीय टीमला द्यावी आणि हा रोग पसरण्यापासून रोखण्यास मदत करावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी शीतल धनवडे, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, स्थानिक कार्यकर्ते शेखर मोहिते, भारत चौगुले, छगन चौगुले, समशेर चौगुले, रंधवा गायकवाड, राहुल घाडगे, संतोष जावीर, सिद्धू घाडगे, बंडू केंगार, जगु पुजारी, सुखदेव केंगार, बाबू वाघमारे, संजय हदिमनी आणि जावेद मदारी उपस्थित होते. 

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Indiranagar sangali slum Containment zone demolished

Tags
टॉपिकस
Topic Tags: