इंदोरीकरांमागे पोलिसांचं झेंगाट ः या तारखेला समागम केल्यास पोर, त्या तारखेला होणार पोरगी, अरे देवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

इंदुरीकरांवर गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे समजते

संगमनेर ः आपल्या बिनधास्त वक्तव्यामुळे राज्यात चर्चेत असलेले समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या विधानामुळे गर्भलिंग निदान कायद्याचा भंग होत असल्याच्या निष्कर्षावरून त्यांच्यावर या कायद्याचे कलम 22 नुसार गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे. 

शब्दांमुळे महाराज अडचणीत
समाजातील विकृतींवर आपल्या शाब्दिक आसुडाचे फटकारे ओढताना, महाराज न कळत कुटूंबव्यवस्थेवरही बोलतात. 

काय आहे तो व्हिडिअो
युवकांच्या वर्तनावर त्यांचा प्रत्येक कीर्तनात चांगलाच कटाक्ष असतो. या पार्श्वभूमीवर त्यांची समाजाच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या कीर्तनांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर धुमाकुळ घालीत आहेत. यू ट्यूब चॅनलवरील त्यांच्या क्‍लिप्स भलत्याच फेमस आहेत. नुकताच त्यांचा नवीन व्हिडिओ 4 फेब्रुवारी रोजी तेथे अपलोड करण्यात आला होता. 

असा होतो मुलगा, तशी होते मुलगी
यात त्यांनी पुत्रप्राप्तीच्या वेळेचे त्यांच्या शैलीत मार्गदर्शन केले आहे. सम तिथीला स्त्री संग झाल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला मुलगी होते. तर अशीव वेळेला संग झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी संतती पैदा होते, असे विधान आहे. यातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्याच्या 22 व्या कलमाचा भंग होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

समितीकडून चौकशी 
नगरचे जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी प्रदीप मुरंबीकर यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीने काढला आहे. त्यानुसार इंदुरीकरांवर गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे समजते. तसेच इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याबाबत पुरावे जमा करण्याचा निर्णयही समितीकडून घेण्यात आला आहे. 

पीसीपीएनडीटी ( प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा ) कायद्याचे कलम 22 
या अंतर्गत गर्भलिंग निदानासाठी छापील पत्रक, संवाद अगर एसएमएस, फोन, इंटरनेटद्वारे गर्भलिंग निदान आणि निवडीची जहिरात करण्यास बंदी आहे. कलम 22 ( 3 ), चा भंग झाल्यास संबंधितास तीन वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयाच्या दंडाची शिक्षेची तरतूद आहे. 

भक्त म्हणतात, हे कुभांड

इंदुरीकरमहाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी तो व्हिडिओ त्यांचाच आहे का त्यांना फसवण्यासाठी छेडछाड करण्यात आलेली आहे. हेही तपासले जाणार आहे. महाराजांना फसविण्यासाठीच हे कुभांड रचण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांचे भक्त आणि चाहते देत आहेत.  भिडे गुरूजीही संततीबाबत केलेल्या वक्तव्यावरून ते चांगलेच अडचणीत आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indorekar Maharaj will be charged