इंदुरीकर महाराजांचे राजकीय 'किर्तन'; थोरातांना शह देण्यासाठी भाजपचा डाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

संगमनेर मतदारसंघ हा बाळासाहेब थोरात यांचा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पंचायत समिती, जि.प., नगरपालिका, अनेक ग्रामपंचायती आणि स्थानिक संस्थावर थोरातांचं वर्चस्व राहिले आहे. आजवरच्या विधानसभा निवडणुकींमध्ये थोरातांपुढे अद्याप एकाही उमेदवाराला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. ते 1982 पासून सलग 6 वेळा आमदार राहिले आहेत.

नगर : किर्तनाच्या मंचावरून नेहमीच राजकारण्यांची टर उडविणारे प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, भाजप त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यास सज्ज झाल्याचे बोलले जात आहे. 

संगमनेर मतदारसंघ हा बाळासाहेब थोरात यांचा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पंचायत समिती, जि.प., नगरपालिका, अनेक ग्रामपंचायती आणि स्थानिक संस्थावर थोरातांचं वर्चस्व राहिले आहे. आजवरच्या विधानसभा निवडणुकींमध्ये थोरातांपुढे अद्याप एकाही उमेदवाराला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. ते 1982 पासून सलग 6 वेळा आमदार राहिले आहेत. विरोधकांचं एकमत नसल्याने थोरात नेहमीच आघाडीवर राहिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही बाळासाहेब थोरात यांनी 1 लाख 03 हजार 564 एवढी मते घेऊन शिवसेनेचे जनार्दन आहेर यांचा 60 हजारांच्या फरकाने पराभव केला.

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. तिकडे विखे पाटील भाजपवासी झाले. थोरात आणि विखे पाटील यांच्यातील संघर्ष पाहता विखे पाटील थोरातांसमोर मोठे आव्हान उभ करु पाहत आहेत. राज्यातील सुप्रसिध्द किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे आता राजकीय मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ते संगमनेरमध्ये भाजपच्या महाजनादेश यात्रेत सहभागी झाले होते. भाजपकडून इंदुरीकर महाराजांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंदुरीकर महाराजांना संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु याबाबत भाजपा प्रवेश केल्याची किंवा आपली कुठलीही राजकीय भूमिका इंदुरीकर यांनी जाहीर केली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indurikar Maharaj may be contest assembly election with BJP