video : इंदुरीकर महाराज म्हणतात, पवार साहेब देव माणूस...

आनंद गायकवाड
मंगळवार, 28 जानेवारी 2020

शनिवारी संगमनेर तालुक्‍यात ओझर बुद्रुक येथे इंदुरीकर महाराजांचा बर्थ डे (वाढदिवस) साजरा करण्यात आला. त्यावेळी सामाजिक, राजकीय, शिक्षण अशी सर्वच क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. त्यांच्यासमोर महाराजांनी आपल्या भावना व्यक्त करून पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी त्यांनी मोठे विधान केले आहे. 

संगमनेर : समाजप्रबोधनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर हे वारकरी सांप्रदायातील मोठे नाव आहे. समाजातील विकृतीवर ते कडक शब्दांत प्रहार करतात, तसेच ते राजकारणाचाही लसावी-मसावी काढतात.

.या या या बसा आमच्या...

नेत्यांमधील व्यंग दाखवताना त्यांच्यातील गुणांचीही वाहवा करतात. विधानसभा निवडणुकीत ".....या या या बसा आमच्या...' हे त्यांचे वाक्‍य संपादित करून "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' या मुख्यमंत्र्यांच्या वाक्‍याला जोडण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्रात प्रचारकाळात मोठाच गहजब झाला. त्यावर आता लोकगीतही बनविण्यात आले आहे.

मध्यंतरी इंदुरीकरमहाराजही राजकारणात येणार अशा वावड्या उठल्या होत्या. परंतु त्यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये त्याचा इन्कार केला.

इंदुरीकर महाराजांचा बर्थ डे ​
शनिवारी संगमनेर तालुक्‍यात ओझर बुद्रुक येथे इंदुरीकर महाराजांचा बर्थ डे (वाढदिवस) साजरा करण्यात आला. त्यावेळी सामाजिक, राजकीय, शिक्षण अशी सर्वच क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. त्यांच्यासमोर महाराजांनी आपल्या भावना व्यक्त करून पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी त्यांनी मोठे विधान केले आहे. 

तुम्ही जसे एक राहता तसे कार्यकर्त्यांनाही सांगा 
इंदुरीकरमहाराज म्हणाले, राजकारण आणि धार्मिकता या बाबी रक्तातच असाव्या लागतात. दुसऱ्याचे पाहून या गोष्टी जमत नाहीत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासठी आलेल्या सर्वपक्षीय राजकारण्यांचा सन्मान राखला. राजकारणाचे स्थानिक पातळीवर होणारे परिणाम यावर प्रत्येक किर्तनातून परखड व मार्मिक भाष्य करणाऱ्या इंदुरीकरांनी तुम्ही जसा तान्हाजी सिनेमा एका थिएटरात बसून एकत्र पाहिला, तसे तुमच्या कार्यकर्त्यांना गावात एकत्र बसायला सांगा, असा सल्लाही उपस्थित राज्यकर्त्यांना दिला. 

रोहित पवार काय म्हणाले... 
आपल्या खास शैलीतून समाजप्रबोधनाचे काम करणारे, हसता हसता चुकांवर नेमके बोट ठेवणारे, अंधश्रध्देवर प्रहार करुन, शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सक्रीय प्रयत्न करणारे महाराज समाजात प्रेम आपुलकी, एकोपा निर्माण करीत आहेत. मनातील द्वेषाची जळमटे दूर करण्याचे व केवळ उपदेश करून नाही, तर प्रत्यक्ष अनाथ, गरजू मुलांसाठी शिक्षण व निवासाची सोय त्यांनी केली आहे. ही आपणासाठी मोठी अभिमानाची गोष्ट असल्याची भावना युवा नेते आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. 

सर्वच नेते महाराजांचे फॅन 
वाढदिवसानिमित्त निवृत्ती महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत त्यांच्यासमवेत रथावर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, युवक कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आर.आर. पाटील यांनीही त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची माहिती जवळपास सर्वच युवा नेत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभही यावेळी झाला. 

रोहित व डॉ. सुजय यांच्यात आजोबांचे गुण 
""माझे विखे आणि थोरात घराण्यांवर सारखेच प्रेम आहे. मी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांना देव मानणारा माणूस आहे. आणि हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दिवंगत बाळासाहेब विखे यांचे सर्व गुण खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडे आले आहेत. तर शरद पवारांचे सर्व गुण आमदार रोहित पवारांनी घेतले आहेत, असे निरीक्षणही समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी नोंदवले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indurikar Maharaj said Pawar Saheb is God Man