कर्नाटकात मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय; कन्नड, इंग्रजीतून फक्‍त मार्गदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

कर्नाटकात दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना चंदन वाहिनी (डीडी नॅशनल) वरुन मार्गदर्शन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र कन्नड व इंग्रजीच्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांना फक्‍त मार्गदर्शन करण्यात येत असल्याने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.

बेळगाव : दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना चंदन वाहिनी (डीडी नॅशनल) वरुन मार्गदर्शन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र कन्नड व इंग्रजीच्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांना फक्‍त मार्गदर्शन करण्यात येत असल्याने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्‍त होत असुन सर्वच माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे. तसेच बेळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे पत्र लिहून मराठी विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. 

लॉकडाऊनमुळे दहावीची परीक्षा लवकर होणार नसल्याने विद्यार्थ्यावरील ताण कमी करण्यासाठी शिक्षण खात्याने दूरदर्शनच्या चंदन वाहिनीवर परीक्षार्थींसाठी उजळणी वर्ग सुरु केले आहेत. 28 एप्रिलपासून दररोज दुपारी 3.30 वाजल्यापासून तज्ज्ञ शिक्षकांकडून कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. तर दोन दिवसांपासून इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच हे उजळणीवर्ग विद्यार्थ्यांसाठी शिक्षण खात्याच्या मक्कळवाणी यूट्यूब चॅनेलवरही उपलब्ध आहेत. 

दहावी परीक्षेबाबत मुलांच्या मनात असलेल्या शंका दूर करणे तसेच विद्यार्थी व पालकांमध्ये परीक्षेबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी चंदन वाहिनीवरुन मार्गदर्शन केले जात आहे. याचा लाभ कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना होत आहे. मात्र मराठी माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली करण्यात आल्या नसल्याने शिक्षण खात्याचा दुट्टप्पीपणा दिसुन येत असल्याचे मत शिक्षक व विद्यार्थ्यांमधून व्यक्‍त होत आहे. 

बेळगाव, चिक्‍कोडी व बिदर शैक्षणिक जिल्ह्यात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीही चंदन वाहिनीवरुन मार्गदर्शन केल्यास त्यांना लाभ होणार असल्याने शिक्षण खात्याने याची दखल घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

शिक्षण खाते पुढाकार घेईल अशी अपेक्षा

परीक्षा पुढे गेल्याने सर्वच माध्यमाचे विद्यार्थी दडपणाखाली आहेत त्यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी शिक्षक प्रतिनिधी आमदार अरुण शहापूर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. याबाबत शहापूर यांनी शिक्षण मंत्र्याशी चर्चा केली असुन मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण खाते पुढाकार घेईल अशी अपेक्षा आहे. 
एकनाथ पाटील, अध्यक्ष, बेळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injustice on Marathi students in Karnataka; Guidance in Kannada, English only