घरांसह महापालिकेच्या शाळांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना

शैलेश पेटकर 
Tuesday, 18 August 2020

कोरोनामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव घरगुती स्वरूपातच होणार आहे. ना देखावे, ना मंडप, ना बडेजाव असे यंदाच्या उत्सवात असेल.

सांगली : कोरोनामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव घरगुती स्वरूपातच होणार आहे. ना देखावे, ना मंडप, ना बडेजाव असे यंदाच्या उत्सवात असेल. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या आवाहनास शहरासह जिल्ह्यातील मंडळांनी प्रतिसाद दिला. सर्वाजनिक मंडळाची मूर्ती अध्यक्ष किंवा सदस्यांच्या घरीच बसवण्याचा निर्णय झाला. 

रस्त्यावर मंडप घालून उत्सव करता येणार नाही. सार्वजनिक मंडळाची मुर्ती अध्यक्ष किंवा सदस्याच्या घरीच बसवावी, असे आवाहनवजा सूचना श्री. शर्मा यांनी केली होती. महापालिका क्षेत्रात शाळांत मुर्ती बसवण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. पुढच्या वर्षीच्या उत्सव जल्लोषात करायचा असेल तर यंदा कोरोनापासून दूर राहण्यासाठी हे कटाक्षाने पाळा, असे आवाहनही केले होते. 

सांगली संस्थान आणि तासगावच्या मानाच्या गणपतीचीही मिरवणूक यंदा होणार नाही. साध्या पद्धतीने हे उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्यात कोणतीही मिरवणूक नसेल. शहरातील कापडपेठ, पटेल चौक, रणझुंजार, मोटार मालक संघ, सावकार, विश्रामबागसह मोठ्या मंडळांनी कोरोनाचे नियम पाळून आरती, पुजा करण्याचे निर्णय घेतलेत. महाप्रसादाचे कार्यक्रमही रद्द करण्यात आलेत. स्वागत किंवा विसर्जन मिरवणुका, वाजंत्री, नाचगाणे हे 100 टक्के टाळले आहे. कार्यकर्त्यांच्या घरांसह महापालिकेच्या शाळांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनीही सूचना केल्या आहेत. 

कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यंदा शाडूची एक फुटाची मुर्ती प्रतिष्ठापीत केली जाईल. मंडपासह मिरवणूक नाही. मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आरती व पूजा केली जाईल.'' 
- अविनाश देवळेकर, रणझुंजार 

कोरोनामुळे 62 वर्षांत प्रथमच उत्सव साध्यापद्धतीने केला जाणार आहे. देखावा, रोषणाईल फाटा देण्यात आला. सामाजिक बांधिलकीतून सॅनिटायझर वाटप, आरोग्य तपासणीसह कोरोना प्रतिबंधकात्मक गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे.'' 
- मोहन जोशी, मोटार मालक संघ 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Installation of Ganapati in municipal schools with houses