वाढीव वीज बिल रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन... 

विष्णू मोहिते 
Tuesday, 11 August 2020

वाढीव वीज दर वाढ रद्द करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

सांगली : वाढीव वीज दर वाढ रद्द करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वीज बिल रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटना जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी वीज बिल माफीच्या घोषणा दिल्या. 

संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोनाचे संकट मोठे आहे. याचं काळात महावितरणने तेरा ते सोळा टक्के वीज दर वाढ केली आहे. या वीजदर वाढीमुळे सर्व सामन्याचे कंबरडे मोडले आहे. वाढीव वीजदर वाढ आणि एकत्रित तीन महिन्याचे वीज बिल आल्यामुळे सर्व सामान्यांना बिल भरणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे ही वीज दरवाढ मागे घेणे आवशक्‍य आहे. 

यापूर्वीही आंदोलने करण्यात आली आहेत मात्र, दरवाढ मागे घेण्यात आलेली नाही. पण आता दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघाड झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाची राहिल.

यावेळी संजय बेले, भागवत जाधव, पोपट मोरे, संदीप राजोबा, संजय खोळखुंबे, संतोष शेळके, सूरज शेख, पारस चौगुले, भैय्या पाटील, सुधाकर पाटील, देवेंद्र धस, रविकिरण माने, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, सुरेश पाचिब्रे, सर्जेराव पवार, रामराव मोडे उपस्थित होते. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intense agitation if increased electricity bill is not canceled ...