बेळगावातून आंतरराज्य बससेवा आता मध्यरात्रीपर्यंतही

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

बेळगाव स्थानकावरुन सध्या रात्री बारा वाजेपर्यंत पुणे आणि मुंबईसाठी बस धावत आहेत. 

बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा सुरु करण्यात महाराष्ट्र परिवहन मंडळ आपले पाऊल मागे घेतले असले, तरी कर्नाटक परिवहन महामंडळाने मात्र आपल्या सेवा आता मध्यरात्रीपर्यंतही उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यादरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आता कर्नाटक परिवहनची सेवाच उत्कृष्ट ठरली आहे. बेळगाव स्थानकावरुन सध्या रात्री बारा वाजेपर्यंत पुणे आणि मुंबईसाठी बस धावत आहेत. 

बेळगावमध्ये अद्यापही महाराष्ट्राच्या केवळ आजरा आणि चंदगडच्या दोनच बस येत आहेत. बेळगावसाठी बेळगाव-कोल्हापूर ही सेवाही महत्वाची आहे, पण अद्याप महाराष्ट्राकडून ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. कर्नाटकाने आपल्या सर्व राज्यातील आगारातून बसेस सुरु केल्या आहेत. सध्या बेळगावसह गुलबर्गा, हुबळी, शिमोगा येथूनही बसेस कार्यान्वित झाल्या आहेत. शिमोगा येथून सायंकाळी सव्वाचार वाजता शिमोगा-पुणे ही बस सुटत असून रात्री बारा वाजता ती बेळगावमार्गे पुण्याकडे धावत आहे. यासह हुबळी येथून दोन नॉन एसी स्लिपर बसेस रात्री साडेअकरा वाजता बेळगावमार्गे पुण्याकडे जात आहेत. सध्या सकाळच्या सत्रात बसेस कमी असून दुपारी दीड वाजल्यानंतर पुणे आणि मुंबईसाठी बसेस उपलब्ध आहेत. 

कर्नाटक परिवहनने आपल्या महाराष्ट्रातील सेवा वाढीवर भर दिला आहे. त्यामुळे केवळ बेळगावच नव्हे तर दांडेली, हुबळी, शिमोगा, सागर, गदग येथूनही बेळगावमार्गे पुणे आणि मुंबईकडे बसेस धावत आहेत. प्रवाशांनीही सकाळऐवजी रात्रीच्या बससेवेवर भर दिला असून या बससेवेला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. परिवहनकडून महाराष्ट्रात रोज 55 बसेस सोडल्या जात आहेत. 23 सप्टेंबरपासून दोन्ही राज्यांदरम्यान आंतरराज्य बससेवा सुरू झाली. परंतु, अद्याप महाराष्ट्राकडून बससेवेत भर पडलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना केवळ कर्नाटक परिवहनच्या बसेसवर विसंबून राहावे लागत आहे. 

"प्रवाशांचा महाराष्ट्र सेवेसाठी उत्तम प्रतिसाद लाभत आहे. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आंतरराज्य सेवेसह सर्वच बसेसचे नियमित निर्जंतुकीकरण केले जात असून प्रवाशांना मास्कची सक्ती केली आहे. त्यामुळे परिवहनचा प्रवास अगदी सुरक्षित असून प्रवाशांनाही भितीचे कोणतेच कारण नाही. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे परिवहनच्या महसूलातही वाढ होत असून स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.'' 

-महादेव मुंजी, नियंत्रक, बेळगाव परिवहन विभाग 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: interstate bus service provided by a karnataka government to travellers at midnight service also provide in belgaum