वाळू माफियांच्या ठेक्‍यातही पिस्तुलाचा धाक ; कऱ्हाडला गुंडांच्या टोळ्यांचा हस्तक्षेप

वाळू माफियांच्या ठेक्‍यातही पिस्तुलाचा धाक ; कऱ्हाडला गुंडांच्या टोळ्यांचा हस्तक्षेप

कऱ्हाड ः कोटीच्या कोटी उड्डाणे घेत कऱ्हाड तालुक्‍यातील वाळू ठेक्‍यांचे लिलाव अनेकदा पार पडले आहेत. कृष्णा व कोयनेच्या वाळूला राज्यात सोन्याचा दर मिळतो. ती लुटणाऱ्या वाळू माफियांच्या टोळ्यांनी समाजाला वेठीस धरले आहे. वाळूच्या व्यवसायातही गुंडांच्या टोळ्या कार्यरत आहेत. ठेका कोणीही घेतला तरी ठेका घेणाऱ्यांच्या कानपट्टीवर पिस्तूल ठेवून ठेक्‍याचा हिस्सा गुंड घेतो. कोपर्डे हवेली, कालगाव, उंब्रज, रेठरे बुद्रुकसह मोठ्या भागात वाळू ठेक्‍यादांरासह गुंडांची दहशत आहे. 
गुंडांच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर पिस्तूल ठेवून वाळू वाहतूक करण्यासाठी लागणाऱ्या मळ्या नावावर केल्या आहेत. कृष्णा काठावर सर्रास होणाऱ्या वाळू तस्करीला गुंडांच्या टोळ्यांचे पाठबळ आहे. वाळू ठेक्‍यात वाढणारी गुंडगिरी वाळू ठेकेदारच पोसू लागले आहेत. जिल्ह्यातील कृष्णा काठावर निघालेल्या सगळ्या ठेक्‍यात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍याचे कनेक्‍शन आहे. शहरातील राजकीय लोकही त्या ठेक्‍यात सहभागीदार आहेत. ठेका कोणीही घेतला तरी वाळवा तालुक्‍याला त्या ठेक्‍यात भागीदारी मिळतेच मिळते. त्यामुळे वाळवा तालुक्‍यातील कनेक्‍ट असलेल्या कऱ्हाडच्या गुंडांनाही आपसूक त्या ठेक्‍यात घेतले जाते. त्यामुळेच कऱ्हाडच्या गुंडगिरीची पाळेमुळे वाळू ठेक्‍यातून मिळणाऱ्या पैशामुळे अधिक बळकट झाली आहेत. ती खणून काढण्यासाठी त्या पद्धतीने काम करावे लागणार आहे. कुख्यात गुंड सल्या चेप्याने वाळू ठेक्‍याच्या माध्यमातून तालुकाच नव्हे, तर पश्‍चिम महाराष्ट्रात वलय वाढविले. जिल्हाधिकारी कार्यालयालाही मॅनेज करण्याची पॉवर ठेवणाऱ्या गुंडांची पाळेमुळे पोलिसांना सापडत नाहीत. त्यामुळे वाळूच्या ठेक्‍यात शिरलेल्या गुंडांच्या टोळ्यांनीही समाजस्वास्थ्याला धोका पोचविला आहे. त्याचे परिणाम कोपर्डे हवेलीत पाहायला मिळाले. गुंड सल्या चेप्याची जेसीबी, वाहने गावकऱ्यांनी जाळली. त्यामुळे समाजमनातील दाहकता स्पष्ट झाली. त्यातून पुढे सल्या चेप्यावर गोळीबारही झाला. कालगावतही ठेकेदारांकडून खंडणी वसुली सुरू आहे. खून, जाळपोळीचे तणावाचे वातावरण आणि शेकड्यात मारामाऱ्या होवूनही वाळू ठेक्‍यात सहभागी होणाऱ्या गुंडांवर कारवाई नाही. आजही खंडणीबहाद्दर संशयित बिनधास्त फिरत आहेत. कालगाव, गोवारे, टेंभूमध्ये कृष्णा काठावरील अनेक गावांत त्या फुटकळ गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत. त्यातून सरकारी अधिकाऱ्यांवरही हल्ले होत आहेत. यापूर्वी तलाठ्यांना मारहाण झाल्याच्याही घटना आहेत. वातावरण गंभीर असताना पोलिस केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत. 
वाळू ठेक्‍यातून मारामारी कऱ्हाडला नवी नाही. सुमारे 20 वर्षांपासून येथे त्या कारणावरून गोळीबारही होत आहे. काही वर्षापूर्वी कुख्यात असूनही सल्या चेप्याची जेसीबीसह अन्य वाहने जाळल्याने त्याची दाहकता समाजसमोर आली. कोपर्डे हवेलीत घडलेली घटना क्षणात घडली नव्हती. तेथे वाळूचा ठेका घेतल्यानंतर सल्याच्या टोळीने गावकऱ्यांना वेठीस धरले होते. रोज रात्री मळी न देणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावले जात होते. अखेर त्याचा विद्रोह झाला. त्यातून सल्या चेप्याला संपविण्यासाठी स्वतंत्र टोळी तयार झाली. महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांनाही वाळूच्या ठेक्‍यामुळे अनेकांच्या वाईटपणाशी सामना करावा लागला. युवराज पाटील यांचा काही वर्षांपूर्वी गोवारे येथे खून झाला. त्यालाही वाळू ठेकाच कारणीभूत होता. काही महिन्यांपूर्वी मलकापुरात दोन टोळ्यांत धुमश्‍चक्री झाली होती. तीही वाळूच्या ठेक्‍यातूनच. कालगावसह उंब्रज परिसरात काही गुंड त्यांचे प्रस्थ वाढवत आहेत. त्यालाही वाळू ठेकाच कारणीभूत आहे. पिस्तुलाच्या टोकावर ग्रामीण भागात वाळू ठेक्‍यातील अनेक कामे गुंड करून घेत आहेत. अनेक वाळू ठेकेदारांनाही गुंडांनी वेठीस धरले आहे. त्यामुळे त्याच गुंडांना भागीदार म्हणून घेण्याची प्रवृत्ती बळावली. त्यातून पुन्हा संघर्षाचे वातावरण तयार होण्यास हातभार लागला. मटका, अवैध वाळूउपसा हेच व्यवसाय गुंडांना आर्थिक रसद पोचविणारे व्यवसाय आहेत. त्यावर घाव घालून गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे. 

...अशी आहे स्थिती 

 वाळू ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गुंडांचा वाढतोय उपद्रव 
 प्रत्येक ठेक्‍यात हिस्सा देण्यासाठी गुंडांची दडपशाही सुरूच 
 वाळू तस्कारीतून पैसा कमावल्याने वाढतेय दादागिरी 
 पजोरे, स्कोडा, वॅगनरसारख्या महागड्या वाहनांतून गुंडांचा वावर 
 कृष्णा काठावरील अनेक शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने घेतल्या जमिनी 
 मळी न देणाऱ्यांवर दबाव आणून केला जातोय व्यवहार 
 खंडणी मागणाऱ्या गुंडांना वाळू माफियांनीच घेतले व्यवसायात 

गाड्याही बदलल्या... 

वाळू ठेक्‍यातून गुंडांना अमाप पैसा मिळू लागला. त्यामुळे स्कॉर्पिओ घेऊन फिरणाऱ्या गुंडांना लाखात पैसे मिळू लागला आहे. गुंडांच्या गाड्याही बदलल्या आहेत. फॅन्सी नंबर घेऊन ऐटीत फिरणारा गुंड समाजात वेगळे स्थान करू पाहात आहे. हिरवा, भगवा व निळ्या रंगाशी दयावान दादा म्हणून नावही करू पाहत आहेत. समाजात मिसळू पाहणाऱ्या अशा गुंडांचा अन्य टोळ्यांशी त्यांचा संघर्ष वाढतो आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com