टिकटॉकच्या माध्यमातून झाली ओळख; महिलेकडून मुलाचे लैंगिक शोषण 

शैलेश पेटकर
Wednesday, 9 December 2020

नांदेड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाशी सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर त्याला सांगलीत बोलावून त्याचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार घडला आहे.

सांगली : नांदेड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाशी सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर त्याला सांगलीत बोलावून त्याचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार घडला आहे. जुलै ते सप्टेंबर 2019 दरम्यान ही घटना घडली.

याप्रकरणी माधवनगर येथील एका महिलेविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की जुलै 2019 मध्ये पीडित मुलाची संशयित महिलेशी टिकटॉक ऍपवरून ओळख झाली. महिलेने त्याच्याशी ओळख वाढवली.

त्यानंतर त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर त्याला माधवनगरला येण्याची गळ घातली. तो आला नाही तर जीव देण्याचीही धमकी दिली. त्यानंतर महिलेने जीव देण्याची धमकी दिल्यानंतर पीडित मुलगा तिला भेटण्यासाठी माधवनगर येथे आला.

त्यावेळी संशयित महिलेने त्याचे जबरदस्तीने लैंगिक शोषण केले. त्यानंतर आणखी दोनवेळा असा प्रकार घडला. याची माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलाचे वडील जाब विचारण्यासाठी आले होते. त्यावेळी संशयित महिलेने त्यांच्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी चौकशी केल्यानंतर काल रात्री संजयनगर पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी महिलेविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार महिलेविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: introduction through ticktalk; Sexual abuse of a child by a woman